काहींनी फक्त फ्लेक्स लावले, आम्ही थेट रेल्वे घेऊन येवू : राधाकृष्ण विखे-पाटील नागपूरला जाण्यापूर्वी निझर्णेश्वराचे दर्शन; आमदार अमोल खताळ यांचीही उपस्थिती..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील जनतेने महायुती सरकारला मोठे पाठबळ दिले आहे. त्यामुळे जनतेच्या मनातील अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आमचे प्रथम प्राधान्य असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट आम्ही पूर्ण करणार असल्याचा विश्वास माजीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज निझर्णेश्वर येथे व्यक्त केला.
सोमवारपासून नागपूर येथे सुरु होत असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी रवाना होण्यापूर्वी त्यांनी आज निझर्णेश्वर येथे महादेवाचे दर्शन घेतले, यावेळी ते बोलत होते. संगमनेरचे आमदार अमोल खताळ, प्रवरा बँकेचे व्हा.चेअरमन मच्छिंद्र थेटे, संचालक रामभाऊ भुसाळ, तहसिलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, पोलीस उपअधिक्षक कुणाल सोनवणे आदि यावेळी उपस्थित होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना विखे-पाटील म्हणाले की, राज्यातील जनतेने महायुतीला मोठा प्रतिसाद दिला याचे एकमेव कारण म्हणजे मागील अडीच वर्षात सरकारने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्या नंतर राज्याला पुढे कसे घेवून जायचे याबबात निर्णय घेण्यास प्रारंभ केला आहे. प्रत्येक विभागासाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या असून तोच आमचा प्राधान्यक्रम असल्याचे ते म्हणाले.
अहील्यानगर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये नवे उद्योग आणून युवकांना रोजगार निर्माण करून देणे याला आपले प्राधान्य असणार आहे. त्यासाठी जिल्ह्याचा औद्योगिक विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्यावर काम सुरू करायचे असल्याची माहिती त्यांनी दिली.
पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनाला यंदा तिनशे वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांचे राष्ट्रीय स्मारक उभारायचे उद्दीष्ट्य पूर्ण करायचे असून केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने स्मारक उभारले जाणार असून त्याचा आराखडा तयार कराण्यात आल्याची माहितीही विखे-पाटील यांनी दिली.
श्रीक्षेत्र नेवासा येथे ज्ञानेश्वरसृष्टीची उभारणी, गोदावरी कालव्याचे नूतनीकरण आणि निळवंडे कालव्याची राहीलेले कामे पूर्णत्वास नेणे हाच आपला पुढील काही दिवसांचा कार्यक्रम असेल असेही विखे-पाटील यांनी सांगितले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी झालेल्या महीलांच्या अर्जाची पडताळणी कुठेही सुरू नसल्याचे स्पष्ट करून महायुतीने जाहीरनाम्यात या योजनेचे अनुदान २१०० रुपये करण्याची ग्वाही दिली आहे, त्याची पूर्तता निश्चीत होईल अशी अशी ग्वाही विखे-पाटलांनी ठामपणे दिली.  
नासिक-पुणे रेल्वेबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना विखे-पाटील म्हणाले की, अनेकांनी या प्रश्नाचे सुध्दा फ्लेक्स बोर्ड लावून अनेक निवडणुका केल्या. आम्ही मात्र थेट रेल्वे आणून दाखविणार असल्याचा टोला थोरात यांचे नाव न घेता त्यांनी लगावला.
Visits: 36 Today: 4 Total: 152890

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *