संगमनेरचा काँग्रेस पक्ष पकडणार हिंदुत्त्वाची कास? हिंदू मोर्चानंतर आता मुंडे जयंतीही साजरी; तालुक्यात वेगवेगळ्या चर्चा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात यांना धक्कादायक पद्धतीने पराभवाचा सामना करावा लागला. त्याशिवाय निवडणुकीपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्यासारखी स्थिती असतानाही ऐनवेळी प्रचारात आलेल्या धर्माने निवडणूक निकाल पालटवण्यासह आघाडीच्या स्वप्नांचाही चुराडा केला. त्यामागे योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक है तो सेफ है’ या घोषणांची ताकद असल्याचे आता ठळकपणे समोर आले आहे. देशात पहिल्यांदाच हिंदू मतदारांनी ‘धर्म’ म्हणून मतदान केल्याने त्याचे भारतीय राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने निवडणुकीनंतर विरोधी पक्षांमध्ये चलबिचल वाढलेली दिसत आहे. संगमनेरात झालेला पराभवही बाळासाहेब थोरात समर्थकांच्या जिव्हारी लागल्याचे चित्र निर्माण झालेले असताना आता त्यांच्याकडूनही जय श्रीरामचा घोष दिला जावू लागल्याने संगमनेरची काँग्रेस धर्मनिरपेक्षता सोडून हिंदुत्त्वाची कास पकडणार काय? अशी स्थिती निर्माण झाल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.


गेल्या अडीच वर्षांपूर्वी राज्यात घडलेले राजकीय नाट्य, त्यानंतर वर्षभरातच ज्येष्ठनेते शरद पवार यांच्या एकसंघ पक्षात पडलेली फूट, वेगवेगवळ्या मुद्द्यांवरुन विरोधकांनी उठवलेली आरोपांची राळ, मोठ्या प्रमाणात घडलेले पक्षांतर आणि त्यातून मतदारांच्या मनात निर्माण झाला रोष, मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन दीर्घकाळ चाललेले आंदोलन, त्यातून थेट सरकारवर साधला गेलेला निशाणा. या सगळ्या गोष्टींमुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीची मोठी पीछेहाट झाल्याचे बघायला मिळाले. राज्यातील 48 मतदारसंघातील तब्बल 30 जागा पटकावणार्‍या महाविकास आघाडीने त्यावेळी एकूण 180 विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतल्याने विधानसभा निवडणुकीत जनतेचा कौल आपल्याच बाजुने असल्याचे मानून राज्यात हमखास सत्तांतर घडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.


मात्र राज्यात प्रचाराचा कालावधी सुरु होताच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशातील कट्टरवादी मुस्लिमांकडून सुरु असलेला धार्मिक उन्माद समोर करुन ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा दिला. त्याचा तत्काळ परिणाम दिसू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्या घोषणेला सालंकृत करीत ‘एक है तो सेफ है’चा घोष केला. त्यामुळे राजकीय घडामोडी, आरक्षण, बेरोजगारी, महागाई, वीज, पाणी आणि विकास या निवडणुकीतील पारंपरिक मुद्द्यांना छेद मिळण्यासह यावेळची निवडणूक ‘धर्मावर’ केंद्रीत होवू लागली. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वाहत्या वार्‍याचा झोत ओळखून मुस्लिम धर्मगुरु सज्जाद नोमाणी यांचा ‘व्होट जिहाद’ हा शब्द पकडून जाहीर सभेतच तो मतदारांना ऐकवला आणि त्यांच्याकडून ‘जिहाद’ होणार असेल तर, आपणही धर्मयुद्धासाठी सज्ज राहण्याचे आवाहन करीत मनामनातील हिंदुत्त्वाला हवा दिली.


त्यामुळे निवडणुकीपूर्वी राज्यात सत्तांतर घडण्यासारखी स्थिती असतानाही देशात संविधान लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक धर्माच्या दिशेने झुकली. त्यातच निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणलेली ‘लाडकी बहिण योजना’ महिलांमध्ये तुफान लोकप्रिय ठरल्याने त्याचा थेट फायदा मतांच्या रुपाने महायुतीला होणार असल्याचा अंदाज येवू लागला होता. प्रत्यक्ष निकालांनी तो ठळकपणे समोरही आणला आहे. यावेळी निवडणुकांपूर्वी राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन अक्षरशः रान पेटले होते. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी तर, थेट महायुतीलाच टोकावर घेत देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेवरही हल्ला चढवण्यास सुरुवात केल्याने राज्यातील राजकीय वातावरण जातीय समिकरणांमध्ये गुरफटून महायुतीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागणार अशी स्थिती निर्माण झाली.


मात्र प्रत्यक्ष मतदानापर्यंत महायुतीकडून ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ आणि ‘लाडकी बहिण’ या तीन विषयांवरच फोकस ठेवला गेला. त्यातून निर्माण झालेल्या सुप्तलाटेने राज्यात सत्ता स्थापण्याचे महाविकास आघाडीचे मनसुबे धुळीस मिळवण्यासह भावी मुख्यमंत्री म्हणून संबोधल्या जाणार्‍या माजीमंत्री बाळासाहेब थोरात व पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराभवासह काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा अवघ्या दोनशे मतांनी निसटता विजय झाला. याच निवडणुकीत आघाडीच्या स्वप्नांची धुळधाण उडवत महायुतीने ऐतिहासिक बहुमत प्राप्त केल्याने विरोधी पक्षांना त्याचा जोरदार धक्का बसला.


त्यातून काही पक्ष सावरण्याचा प्रयत्न करीत असतानाच संगमनेरचे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी मात्र पुढील राजकारणाची दिशा ओळखून आपल्या राजकीय प्रवासाच्या मार्गात बदल केल्याचे चित्र दिसू लागले आहे. गेल्या मंगळवारी शहरातील विविध हिंदुत्त्वादी संघटनांनी बांग्लादेशातील हिंदू बांधवांच्या सुरक्षेसाठी सकल हिंदू समाज या बॅनरखाली मोर्चा काढला होता. या मोर्चापूर्वीच माजीमंत्री थोरात यांच्या कन्या डॉ.जयश्री यांनी प्रांताधिकार्‍यांची भेट घेत या विषयावर त्यांना निवेदन सोपवले. विशेष म्हणजे बांग्लादेशबाबत काँग्रेसकडून अशाप्रकारे करण्यात आलेले देशातील बहुधा हे पहिलेच आंदोलन ठरले असावे. त्यामुळे हा प्रकार अनेकांसाठी आश्‍चर्याचा धक्का देणाराच ठरला.


हिंदू संघटनांच्या आधीच काँग्रेसने केलेल्या या कृतीची चर्चा सुरु असतानाच त्यांच्याकडून निवेदन प्रसिद्ध करीत त्यातून संगमनेरात निघणार्‍या हिंदू मोर्चास काँग्रेसचा पाठींबा असल्याचे सांगण्यात आले. शिवाय या मोर्चात थोरात कन्येसह पक्षाचे कार्यकर्ते, त्यांच्या विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी होणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आले. प्रत्यक्ष मोर्चाच्या दिनीही डॉ.जयश्री थोरात यांनी हजेरी लावल्याने अनेकांच्या भुंवया उंचावल्या होत्या. गुरुवारीही माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे ज्येष्ठनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त आपल्या यशोधन कार्यालयात त्यांच्या अभिवादन कार्यक्रमासह तालुक्यातील काही गावांमध्ये सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहांना भेटी देत कीर्तनाचा लाभ घेतला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर संगमनेरच्या स्थानिक राजकारणात होत असलेला हा बदल खूप बोलका असून स्थानिक काँग्रेसने आपले पारंपरिक धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व सोडून हिंदुत्त्वाची कास धरल्याची चर्चाही सुरु झाली आहे.


गेल्यावर्षी सकल हिंदू समाज या बॅनरखाली स्थानिक हिंदुत्त्ववादी संघटनांनी मोर्चा काढला होता. त्यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोर्चापूर्वी पत्रक काढून काही असामाजिक तत्त्व संगमनेरचे सामाजिक सौहार्द नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोपही केला होता. त्यांच्या ‘त्या’ पत्रातून त्यांची विचारधारा काँग्रेसला समर्पित असल्याचेही त्यावेळी स्पष्टपणे दिसून आले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासह महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर ही किमया ‘हिंदुत्त्वाने’ साधल्याचेही आता समोर आल्याने आणि त्याचा परिणाम दीर्घकाळ कायम राहण्याचीही दाट शक्यता असल्याने बाळासाहेब थोरात यांनी आपल्या राजकारणाची दिशा बदलल्याचे बोलले जावू लागले आहे.

Visits: 14 Today: 1 Total: 153127

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *