देवळाली प्रवरात थरार; प्रेमास नकार दिल्याने तरुणीवर गोळीबार
देवळाली प्रवरात थरार; प्रेमास नकार दिल्याने तरुणीवर गोळीबार
सुदैवानी तरुणी बचावली; तरुणावर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील 25 वर्षीय तरुणीच्या घरामध्ये आज (मंगळवार ता.15) पहाटेच्या सुमारास घुसून तीस वर्षीय तरुणाने तरुणीवर गोळी झाडून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपविण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु सुदैवाने तरुणीच्या डोक्याला गोळी घासून गेल्यामुळे ती किरकोळ जखमी झाली आहे. तर तरुणावर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
आज (मंगळवारी ता.15) पहाटे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास तरुणीच्या मागील बंगल्याच्या दरवाजामधून विक्रम रमेश मुसमाडे याने त्याच्या अन्य एका साथीदारासह प्रवेश केला. यावेळी स्वयंपाक गृहामध्ये ही तरुणी झाडलोट करत होती. यावेळी विक्रम याने तिला विचारले की, ‘तू माझ्यावर प्रेम करते का?’ याबात तरुणीने माझे तुझ्यावरती प्रेम नाही असे सांगताच विक्रम याने कमरेला लावलेली बंदूक काढून एक गोळी झाडली. यावेळी बंदुकीमधून गोळी सुटली होती. ती या तरुणीच्या डोक्याला घासून गेली. जखमी अवस्थेत तिने आपल्या चुलत्यास मोबाईलवरून संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तोपर्यंत विक्रम मुसमाडे याने स्वतःच्या डोक्याला बंदूक लावून गोळी झाडली आणि त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला.
यावेळी स्वयंपाक गृहामध्ये रक्ताचे थारोळे साचले होते. बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकून आसपासच्या शेजारी राहणार्या नागरिकांनी याठिकाणी धाव घेतली. विक्रम मुसमाडे यांच्या मित्रांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने विक्रम याला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल, सहाय्यक फौजदार पोपट टिकल, पोलीस नाईक वाल्मिक पारधी, पोलीस शिपाई गणेश फाटक आदिंनी भेट दिली. या धक्कादायक घटनेने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.