महायुती सरकारकडून ‘पुणे-नाशिक’ रेल्वेमार्गाला गती! प्रस्तावित की नवीन याबाबत संभ्रम; मात्र प्रचारात दिले होते आश्‍वासन..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात मंजूर होवून गती मिळालेल्या ‘पुणे-नाशिक’ या देशातील पहिल्या सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाला गेल्या वर्षभरापासून ब्रेक लागला आहे. नारायणगाव जवळील खगोलीय दुर्बिणीचा अडसर निर्माण झाल्याने मध्यंतरी व्हाया संगमनेर जाणारा हा रेल्वेमार्ग शिर्डीकडे वळवण्याचा घाट घातला जात होता. त्यातून संगमनेर व सिन्नर तालुक्यात नाराजी व्यक्त होत असतानाच विधानसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान फडणवीस यांनी प्रस्तावित मार्गात बदल होणार नसल्याचे आश्‍वासन दिले होते. आता राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्यासह देवेंद्र फडणवीस तिसर्‍यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाल्याने त्यांनी नाशिकमध्ये दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता करावी अशी अपेक्षा व्यक्त होवू लागली आहे.


गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून पुणे-नाशिक रेल्वेमार्गाची मागणी होत आहे. त्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह समीर भुजबळ, डॉ.अमोल कोल्हे व हेमंत गोडसे यांनी वेळोवेळी पाठपुरावाही केला. त्यातून केंद्रीय रेल्वेबोर्डाकडून मान्यता मिळालेल्या 232 किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गाला अखेर मंजूरी मिळाली आणि अहिल्यानगरसह नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील अनेक भागात त्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनींचे संपादनही सुरु झाले होते. मात्र वर्षभरापूर्वी अचानक या रेल्वेमार्गासाठी सुरु असलेल्या भूसंपादनाचे काम थांबवण्यात आले. त्याबाबतची अधिक माहिती घेतली असता नारायणगाव जवळील खोडद येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय खगोल दुर्बिणीला या मार्गाचा अडथळा येण्याची शक्यता निर्माण झाल्याची बाब समोर आली.


त्यामुळे शासनाने प्रस्तावित असलेल्या पुणे-आळेफाटा-संगमनेर-सिन्नर-नाशिक अशा मूळ रेल्वेमार्गात बदल करुन तो चाकण-खेडपासून वळवून व्हाया शिर्डी नेण्याचा घाट घालण्यास सुरुवात केली होती. लोकसभा निवडणुकीच्यावेळी हा विषय चर्चेत आला असताना त्यावेळी तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रस्तावित मार्गात बदल होणार नसल्याचे सांगत दोडीजवळ जंक्शन उभारुन शिर्डीलाईन स्वतंत्र जोडण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र त्यानंतर प्रस्तावित असलेल्या मार्गात नेमका कशामुळे बदल केला जात आहे त्याचे कारण समोर आल्यानंतर हा रेल्वेमार्ग बांसनात जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्या कारणाने समृद्धीचे स्वप्नं पाहणार्‍या पुणे जिल्ह्यातील नारायणगाव, जुन्नर व आळेफाट्यासह संगमनेर व सिन्नर तालुक्यात मोठी नाराजी निर्माण झाली होती.


या दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाचा विषय चर्चेत आल्याने नाशिकमध्ये झालेल्या जाहीर सभेत तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती पुन्हा सत्तेत आल्यास या रेल्वेमार्गाच्या कामाला गती देण्यासह पूर्वी प्रस्तावित असलेल्या व्हाया संगमनेर-सिन्नर या मार्गानेच देशातील पहिली सेमी हायस्पीड रेल्वे धावेल असे आश्‍वासनही दिले होते. आता राज्यात ऐतिहासिक बहुमतासह महायुतीचे सरकार स्थापन झाले असून देवेंद्र फडणवीस तिसर्‍यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. यावेळी अहिल्यानगरसह नाशिक व पुणे जिल्ह्यांनी महायुतीच्या बाजुने भरभरुन मतदान केल्याने या तिनही जिल्ह्यातील नागरिकांच्या अपेक्षा दुणावल्या आहेत.


खरेतर बहुउद्देशीय ठरणार्‍या पुणे-नाशिक रेल्वेमार्गाने अहिल्यानगर, पुणे व नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांचा विकास दृष्टीपथात ठेवून या मार्गाची रचना केली गेली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या 2014 ते 2019 या पहिल्या कारकीर्दीत या कामाला गती मिळाल्याने हा प्रकल्प त्यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असल्याचेही मानले गेले होते. मात्र 2019 मध्ये महायुतीला बहुमत मिळाल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी वेगळी वाट धरल्याने राज्यात सत्तांतर घडले आणि उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार आणि काँग्रेसने मिळून महाविकास आघाडी जन्माला घातली. त्यामुळे पूर्वीच्या सरकारचे महत्त्वकांक्षी प्रकल्प ठप्प झाले होते. त्यानंतर अडीच वर्षांनी शिवसेना फुटून राज्यात पुन्हा सत्तांतर झाल्यानंतर काही महिन्यांनी राष्ट्रवादीतही मोठी फूट पडून अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली 40 आमदारांनी महायुतीच्या सत्तेत सहभाग घेतला.


त्यातून उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या अजित पवार यांनी या रेल्वेमार्गात जातीने लक्ष घालण्यास सुरुवात केल्याने हा प्रकल्प दृष्टीपथात येत असल्याचे वाटत असतानाच चाकण-खेडपासून त्याची दिशा बदलून तो शिर्डीकडे वळवण्याची चर्चा सुरु झाली. त्यामागे नारायणगाव जवळील दुर्बिणीचा अडसर असल्याचे समोर आल्यानंतर हा प्रकल्प जवळजवळ बांसनात गेल्यातच जमा होता. मात्र संगमनेर, सिन्नरसह नाशिककरांची आग्रही मागणी विचारात घेवून विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेले आश्‍वासन, त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील पंधरा जागांमधील तब्बल चौदा तर, अहिल्यानगर जिल्ह्यातील बारामधील दहा जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आल्याने या दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.


गेल्या सात दशकांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात यावेळी परिवर्तन घडून शिवसेनेचे अमोल खताळ विजयी झाले आहेत. आंदोलनातून तयार झालेल्या कार्यकर्त्यांला यावेळी संगमनेरकरांनी पसंदी दिल्याने त्यांच्याकडून थंड पडलेल्या पुणे-नाशिक या बहुउद्देशीय सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या कामाला गती मिळण्यासाठी पाठपुरावा होईल अशी संगमनेरकरांना अपेक्षा आहे. याशिवाय अहिल्यानगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यातील 27 जागांमधील तब्बल 24 ठिकाणी महायुतीचा विजय झाल्याने या रेल्वेमार्गाबाबतच्या आशा पुन्हा एकदा जिवंत झाल्या आहेत.

Visits: 40 Today: 2 Total: 153505

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *