महायुतीच्या अमोल खताळ यांचा संगमनेर मतदार संघात ऐतिहासिक विजय! माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव; चार दशकांचा बुरुज ढासळला..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या संगमनेर विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला असून गेल्या चार दशकांपासून या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व गाजवणार्या माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना यावेळी पराभवाचा धक्का बसला आहे. आचारसंहिता लागल्यापासूनच आजी-माजी महसूलमंत्र्यांमधील राजकीय वैर उफाळून आले होते. त्यातून दोघांनीही एकमेकांच्या मतदारसंघात जावून कुरघोड्या करण्यासह एकमेकांविरोधात प्रबळ उमेदवार उभे करुन त्यांना बळही दिल्याने शेवटीशेवटी संगमनेर व शिर्डीतील निवडणूक लक्षवेधी ठरली होती. मात्र त्यात सरशी मिळवत विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपला बालेकिल्ला शाबूत ठेवून महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या करवी आजवर अभेद्य मानल्या गेलेल्या संगमनेरच्या बुरुजावरही फत्ते मिळवली असून माजीमंत्री थोरात यांच्या चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीला विराम दिला आहे. निवडणुकीपूर्वी थोरात यांच्याकडे राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणूनही बघितले जात होते. मात्र या निवडणुकीने महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापण्याच्या स्वप्नांसह थोरात यांच्या मुख्यमंत्रीपदावरही पाणी फेरले आहे.
राज्यात महायुती सरकारबाबत असंतोष असल्याचे वातावरण निर्माण करुन महाविकास आघाडीने राज्यभरात प्रचाराची राळ उठवली होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही बाजूच्या राजकीय पक्षांनी वारंवार अंतर्गत सर्व्हेक्षण केले. त्यातून सुरुवातीला महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण असल्याचे निष्कर्ष समोर आल्यानंतर आघाडीने अधिक आक्रमक होत सरकारच्या धोरणांवर टीकेची झोड उठवली. मात्र या दरम्यान राज्यात मध्यप्रदेशच्या धर्तीवर ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ कार्यान्वित झाल्याने सरकारबाबत निर्माण झालेले नकारात्मक वातावरण निवळण्यास मोठी मदत झाली. त्यातच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात दिलेला ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नाराही तुफान यशस्वी झाला आणि त्यातून मोठ्या प्रमाणात मतांचे ध्रुवीकरण होवून राज्यात पहिल्यांदाच हिंदू व्होटबँकही निर्माण झाली आहे.
या दरम्यान माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी मतदारसंघाकडे लक्ष केंद्रीत करताना शिर्डीचे दिवंगत माजी आमदार चंद्रभान घोगरे यांच्या स्नुषा आणि लोणी खुर्दच्या सरपंच प्रभावती घोगरे यांच्या पंखात बळ भरण्यास सुरुवात केली. त्याला शह देण्यासाठी विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही आपले संपूर्ण लक्ष संगमनेर मतदारसंघावर केंद्रीत केले. त्यांचे सुपूत्र डॉ.सुजय यांनी थोरात कन्या डॉ.जयश्री यांच्या ‘युवासंवाद’ यात्रेला उत्तर म्हणून तळेगावपासून संगमनेरात ‘युवासंकल्प’ यात्रा सुरु करुन निवडणुकीचे रणशिंग फुंकले. त्यामुळे संगमनेर तालुक्यात डॉ.सुजय विखे-पाटीलच महायुतीचे उमेदवार असतील असेही चित्र निर्माण झाले होते.
मात्र धांदरफळ येथील त्यांच्या सभेच्या मंचावरुन वसंत देशमुख नावाच्या कथीत पुढार्याने डॉ.जयश्री थोरात यांच्या नावाने गरळ ओकली आणि त्याचे पडसाद धांदरफळ ते संगमनेर रस्त्यावरुन जाणार्या विखे समर्थकांच्या गाड्या फोडण्यातून उमटले. या वक्तव्याचा निषेध म्हणून गुन्हा दाखल करण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यात रात्रभर ठिय्या, दुसर्या दिवशी महिलांचा मूकमोर्चा, निवेदनं अशा वेगवेगळ्या कारणांनी संगमनेरची निवडणूक राज्यात चर्चेत आली. या संपूर्ण प्रकाराला डॉ.सुजय विखे-पाटीलच जबाबदार असल्याचे वातावरण थोरात समर्थकांनी निर्माण केले. त्यामुळे ऐनवेळी डॉ.विखे यांना संगमनेरच्या उमेदवारीचा दावा सोडावा लागला. मात्र त्यांनी आपले विश्वासू आणि लाडकी बहिण योजनेचे तालुक्यात प्रभावी काम करणार्या अमोल खताळ यांना पुढे करुन त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळवून दिली.
सुरुवातीला अमोल खताळ यांच्या उमेदवारीने निश्चिंत झालेल्या माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपला विजय सहज असल्याचे मानून संगमनेरऐवजी शिर्डीतच लक्ष केंद्रीत ठेवले. मात्र खताळ यांनी तालुक्याच्या ग्रामीणभागापर्यंत जावून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासह आपले नाव पोहोचवण्यास सुरुवात केल्यानंतर अवघ्या आठवड्यातच सुरुवातीला एकतर्फी वाटणार्या संगमनेरच्या निवडणुकीत चुरस निर्माण होवू लागली. निवडणुकीच्या शेवटच्या आठवड्यात तर निश्चिंत असलेल्या बाळासाहेब थोरात यांना ग्रामीणभागात सभा घेण्यासह शहरातील विविध घटकांशी संवाद साधावा लागला. मात्र त्याचा मतदारांवर कोणताही प्रभाव झाला नसल्याचे निवडणुकीच्या प्रत्यक्ष निकालातून समोर आले असून चार दशकांपासून संगमनेर विधानसभा मतदारसंघावर एकहाती वर्चस्व गाजवणार्या माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय कारकीर्दीला अमोल खताळसारख्या नवख्या आणि सर्वसामान्य तरुणाने ‘ब्रेक’ लावला आहे.
संगमनेर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा विजय झाल्याची वार्ता तालुक्यात पसरताच गावागावांतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते संगमनेरमध्ये दाखल झाले. माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनीही शिर्डीची विजयी मिरवणूक सोडून संगमनेर जवळ करीत महायुतीचे ‘किलर’ उमेदवार अमोल खताळ यांचे अभिनंदन करीत त्यांच्यासह शहरातून विजयी मिरवणूक काढली. या मिरवणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार), आरपीआय यासह महायुतीच्या सर्व घटकपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, विविध हिंदुत्त्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
- माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची कारकीर्द :
1985 साली अपक्ष म्हणून पहिली उमेदवारी करणार्या बाळासाहेब थोरात यांनी स्वपक्षाच्या शकुंतला थोरात यांचा 10 हजार 159 मतांनी पराभव केला. 1990 साली भाजप-शिवसेना युतीने त्यांच्या विरोधात वसंतराव गुंजाळ यांना भाजपच्या चिन्हावर उभे केले. त्यावेळी अतिशय अतितटीच्या लढतीत थोरात यांचा अवघ्या 4 हजार 862 मतांनी विजय झाला. 1995 साली बापूसाहेब गुळवे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करीत 58 हजार 957 (40.82 टक्के) मतं मिळवली. मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही. 1999 साली बापूसाहेब गुळवे यांना शिवसेना तर, दिलीप शिंदे यांना नव्याने जन्माला आलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसने उमेदवारी देत रिंगणात उतरवले. त्यावेळी गुळवे आणि शिंदे यांना थोरातांपेक्षा 11 हजार 348 अधिक मतं मिळाली होती. 2004 च्या निवडणुकीपासून मात्र त्यांचा जनाधार वाढत गेला. त्यावेळच्या निवडणुकीत शिवसेनेच्या संभाजीराव थोरात यांचा 75 हजार 757 मतांनी पराभव झाला.
2009 साली शिवसेनेने बाबासाहेब कुटे यांना उमेदवारी दिली. मात्र त्यांचाही 55 हजार 376 मतांनी पराभव झाला. 2014 साली शिवसेना व भाजपमध्ये मतभेद निर्माण झाल्याने राज्यात अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. संगमनेरात शिवसेनेकडून जनार्दन आहेर यांनी 44 हजार 759 व भाजपकडून राजेश चौधरी यांनी 25 हजार 7 अशी एकूण 69 हजार 765 मतं मिळवली. मात्र त्यावेळी थोरात यांच्या मतांनी लाखाचा आकडा ओलांडला होता. गेल्यावेळी शिवसेनेने उद्योजक साहेबराव नवले यांना उमेदवारी देत मैदानात उतरवले. मात्र बाळासाहेब थोरात यांच्यासमोर त्यांचाही निभाव लागला नाही आणि त्यांना 62 हजार 252 मतांनी पराभव पत्करावा लागला. यावेळी मात्र सामान्य शेतकरी कुटुंबातील अमोल खताळ या तरुण उमेदवाराने शांतपणे प्रचार करीत माजीमंत्री, महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांच्या चार दशकांच्या सत्तेला सुरुंग लावीत त्यांचा पराभव करीत साडेतीन दशकांपासून सुरु असलेल्या राजकीय लढ्यात घवघवीत यश मिळवले.