लहामटेंना विकास तारणार की बहुरंगी लढत खेळ बिघडवणार! अकोल्यातील राजकारण संभ्रमित; विद्यमान आमदारांना मात्र विजयाचा विश्‍वास..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
ज्येष्ठनेते मधुकरराव पिचड यांच्या अकोल्यातील निर्विवाद सत्तेला सुरुंग लावून संयुक्त राष्ट्रवादीच्या चिन्हावर विधानसभा गाठणार्‍या डॉ.किरण लहामटे यांनी गेल्या पाच वर्षात आपल्या मतदारसंघाचा चेहरा बदण्याचा कसून प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर विकासासाठी निधी सर्वोच्च मानून त्यांनी अजित पवारांचा हात धरुन सत्तेच्या प्रवाहात उडी घेतली. या अडीच वर्षात त्यांनी तालुक्यातील अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्पांना चालना देत पारंपरिक आदिवासीबहुल असलेल्या अकोले तालुक्यात भरीव कामे केली. त्या जोरावर आपला सहज विजय असल्याचे मानून ते बिनधास्त असतानाच अकोला मतदारसंघातील लढत अनपेक्षितपणे बहुरंगी झाल्याने मतांचे विभाजन अटळ आहे. अशा स्थितीत लहामटेंच्या विजयाचा पाया असलेला आदिवासी घटक विभागला गेल्यास त्याचा त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत विद्यमान आमदारांना त्यांनी केलेला विकास तारणार की बहुरंगी लढतीने त्यांचा खेळ बिघडणार अशी स्थिती अकोल्यात बघायला मिळत आहे.


लोकसभा निवडणुकीत स्थानिक उमेदवाराकडे दुर्लक्ष करुन महाविकास आघाडीला जवळजवळ एकतर्फी साथ देत विजयापर्यंत पोहोचवणार्‍या आणि ज्येष्ठनेते मधुकरराव पिचड यांच्या माध्यमातून सुरुवातीला काँग्रेस आणि नंतर शरद पवार यांच्या विचारांशी बांधिल राहिलेल्या अकोले तालुक्याने गेल्या पंचवार्षिकपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा पिचड पिता-पुत्राचा निर्णय अमान्य ठरवताना भाजपसोडून राष्ट्रवादीत गेलेल्या डॉ.किरण लहामटे यांना विक्रमी मताधिक्क्य देत पिचडांच्या चार दशकांच्या सत्तास्थानाला सुरुंग लावला. त्या निवडणुकीत पिचडपूत्र वैभव यांचा जवळपास 58 हजार मतांनी पराभव झाला होता.


मात्र अडीच वर्षांपूर्वी राज्यात राजकीय भूकंप होवून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदारांचा मोठा गट घेवून भाजपशी संधान साधले. त्यानंतर वर्षभरातच अजित पवार यांनी बंडाचे निशाण फडकावून राष्ट्रवादीला सुरुंग लावला आणि ते देखील सत्तेत सहभागी झाले. त्यावेळी अकोल्याचे आमदार डॉ.किरण लहामटे काय निर्णय घेतात याकडे अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. गेल्या निवडणुकीत मतदारांना दिलेली आश्‍वासने तडीस न्यायची असतील, विकासासाठी निधी मिळवायचे असेल तर अजित पवारांसोबत जाण्याशिवाय पर्याय नसल्याने त्यांनी शरद पवारांची साथ सोडली.


यंदाच्या निवडणुकीत आघाडीत राष्ट्रवादी आणि महायुतीत भाजपकडे असलेल्या अकोले मतदारसंघात चारही पक्षांकडून इच्छुकांची भाऊगर्दी होती. आघाडी धर्मानुसार विद्यमान असलेली जागा त्याच पक्षाची असल्याने नैसर्गिक तत्त्वाने महायुतीकडून अकोल्याची जागा अजित पवार गटाकडे जाणे स्वाभाविकच होते. त्यातून वैभव पिचड यांची कोंडी होण्यासह त्यांच्या राजकीय भवितव्याचाही प्रश्‍न निर्माण झाला होता. शरद पवार यांनी गेल्यावेळी उमेदवारीसाठी प्रचंड आग्रही असलेल्या दिवंगत अशोक भांगरे यांना ‘एक टर्म लहामटेंची आणि दुसरी तुमची’ असा शब्द दिलेला असल्याने त्यांच्या गटाकडून सुनिता भांगरे अथवा अमित भांगरे यांच्या नावावर एकमत होण्याची सुरुवातीपासूनच शक्यता होती. जागा वाटपातही हा मतदार संघ शरद पवारांच्या वाट्याला गेला.


त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून मतदार संघाचे सिंचन करणार्‍या आणि यापूर्वी दोनवेळा शिवसेनेच्या तिकिटावर मधुकरराव पिचड यांना कडवी झूंज देणार्‍या मधुकर तळपाडे यांच्यासह आदिवासी तरुणांचा चेहरा मानल्या जाणार्‍या मारुती मेंगाळ यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर ज्येष्ठनेते मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका बसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यामुळे माजी आमदार वैभव पिचड ऐन निवडणुकीच्या काळात रुग्णालयात अडकले. पिचडांच्या अस्वास्थाच्या कारणाने भावनिक झालेल्या त्यांच्या समर्थकांनी वैभव पिचड यांना अपक्ष उमेदवारी दाखल करण्यास भाग पाडले. यासर्व घटनाक्रमातून येथील निवडणूक अतिशय रोमांचक झाली आहे.


विद्यमान आमदार डॉ.किरण लहामटे यांनी लिंगदेव येथे औद्योगिक वसाहत मंजूर करुन घेतल्याने अकोल्याच्या विकासात तो मैलाचा दगड ठरण्याची शक्यता आहे. याशिवाय तालुक्यातील दुर्गम भागांमध्ये पहिल्यांदाच झालेले रस्ते, पिण्याच्या पाण्याचे प्रश्‍न, तीर्थक्षेत्र निधीच्या माध्यमातून गावोगावच्या देवस्थानांचा विकास, पर्यटनाच्या दृष्टीने तालुक्याचा विकास आराखडा अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या आहेत. त्या जोरावरच ते प्रचंड आत्मविश्‍वास बाळगून असून आपला विजय निश्‍चित असल्याचे ठामपणे सांगत आहेत. दुसरीकडे या मतदारसंघावर शरद पवार यांच्या विचारांचा प्रभाव नेहमीच बघायला मिळाला आहे.


राष्ट्रवादीच्या फूटीनंतर काका-पुतण्याच्या पक्षात त्यांना मानणार्‍या वर्गाचे किती प्रमाणात विभाजन होते ही गोष्ट यावेळी महत्वाची ठरणार आहे. त्याशिवाय या मतदारसंघावर मधुकरराव पिचड यांचा प्रदीर्घकाळ वरचष्मा राहीला आहे. सध्या प्रकृती अस्वास्थाच्या कारणाने ते रुग्णालयात असल्याने कधीकाळी त्यांना साथ देणार्‍या वर्गामध्ये सहानुभूती निर्माण होवून अपक्ष उमेदवारी करणार्‍या वैभव पिचड यांच्या पारड्यातील मतं वाढण्याचीही शक्यता आहे. निवृत्त पोलीस अधिकारी मधुकर तळपाडे यांनी यापूर्वी 2009 साली मधुकर पिचड यांच्या विरोधात शिवसेनेकडून निवडणूक लढवताना 50 हजार 964 (37.2 टक्के) मतं मिळवली होती. त्यावेळी त्यांचा अवघ्या 9 हजार 79 मतांनी पराभव झाला होता. तर, 2014 साली वैभव पिचड यांच्या विरोधात उमेदवारी करताना त्यांनी 47 हजार 634 (29.6 टक्के) मतं मिळवली, त्यावेळी त्यांचा 20 हजार 62 मतांनी पराभव झाला होता.


पंचायत समितीचे माजी सभापती आणि आदिवासी तरुणांमध्ये चांगला प्रभाव असलेले ठाकरे गटाचे मारुती मेंगाळही बंडखोरी करीत नशिब आजमावत आहेत. त्यांनी कोणताही डामडौल न करता आदिवासी पाड्यांवर पायीयात्रा करुन गाठीभेटी देण्यावर भर देत आदिवासी मतदारांवर चांगलाच प्रभाव टाकला आहे. दिवसभर डोंगरदर्‍यातून पायपीट करीत मतदारांना भेटायचं आणि रात्री शेवटच्या गावातच एखाद्याच्या घरी मुक्काम ठोकायचा या त्यांच्या अनोख्या प्रचार पद्धतीने तरुणवर्ग त्यांच्याकडे आकर्षित होत आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करता गेल्या पाच वर्षात सलग सत्तेचा हात पकडून विद्यमान आमदार डॉ.किरण लहामटे यांनी आदिवासीबहुल असलेल्या या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी कसोशिने प्रयत्न केले.


वर्षोनुवर्ष ज्या गोष्टी झाल्या नाहीत, त्या त्यांनी घडवून दाखवल्या. गावखेड्यापर्यंत सिमेंटचे रस्ते नेले. मात्र या मतदारसंघात यंदा त्यांना तुल्यबळ असलेल्या चार उमेदवारांचा मुकाबला करावा लागणार असल्याने मोठ्या प्रमाणात मतविभाजन होण्याची दाट शक्यता आहे. अकोले तालुक्यातील मतदार यावेळी नेत्याच्या मागे विभागतो कि विकासाची कास धरतो हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. यावेळी राजकीय पार्श्‍वभूमीसह जनाधार बाळगणारे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने अकोल्याचा निकाल राज्याचे लक्ष वेधणारा ठरेल हे मात्र निश्‍चित आहे.


डॉ.किरण लहामटे यांची पार्श्‍वभूमी अतिशय साधारण आहे. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांची पूर्वीची राजकीय ओळख. सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या लहामटे यांनी 2019 साली पिचडांच्या चाळीस वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला. गेल्या पाच वर्षात त्यांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव कामही केले. मात्र यावेळी त्यांच्यासमोर माजी आमदार वैभव पिचड यांच्यासह शरद पवार गटाचे अमित भांगरे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बंडखोर मधुकर तळपाडे व मारुती मेंगाळ यांचे तगडे आव्हान आहे. त्यामुळे या मतदारसंघातील मतदार त्यांना विकासाच्या मुद्द्यावर तारतात की आपाल्या नेत्यांच्या मागे भरकटतात हे पाहण्यासाठी 23 नोव्हेंबरपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Visits: 19 Today: 1 Total: 113614

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *