अधिकार्यांना आणखी किती बळी हवेत! राजकारण्यांचे बाहुले की जनसेवक?; शहरी बेशिस्तीचा आणखी एक बळी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातंर्गत व्यवस्थेतील प्रत्येक गोष्टीत राजकीय हस्तक्षेप वाढतच असल्याने वैभवशालीची टिमकी बडवणारे संगमनेर शहर बेशिस्तीच्या दिशेने धावत आहे. त्याचे परिणामही समाजाला भोगावे लागत आहेत. बेकायदा रिक्षाथांबे, हातगाड्या, दुकाने मनमानी लावण्यासाठी समर्थन देण्याच्या राजकीय वृत्तीमुळे संगमनेरची रया जात असून सामान्यांचे जीवही धोक्यात आले आहेत. या सगळ्यांचा परिपाक आज पुन्हा शहरातील लहान-मोठ्या सगळ्यांचाच वावर असलेल्या रस्त्यावरील अपघातात झाला. आपल्या मोपेडवरुन रस्ता ओलांडणार्या ३७ वर्षीय गृहिणीला पाठीमागून आलेल्या मालट्रकने उडवल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने एका हसत्या-खेळत्या कुटुंबावर आभाळ कोसळले, शहरातून हळहळही व्यक्त झाली. मात्र प्रश्न कायम राहिला, हे सगळं कधी थांबणार?
दूरदृष्टीचा अभाव असल्याने विकसित झालेल्या आणि होत असलेल्या शहरी भागांना मुलभूत गोष्टींचा सामना करावा लागण्याचे प्रकार संगमनेरला नवीन नाहीत. दीर्घकाळ आपले शासन राहावे यासाठी मतपेटी तयार करण्याच्या एकसूत्री प्रयोगामुळे शहरात अतिक्रमणं म्हणजे कायदेशीर बनली आहेत. ज्याला वाटेल तेथे त्याने हातगाड्या, दुकाने उभी करावी. फूटपाथ पादचार्यांसाठी असले तरीही त्याची त्यांना गरज नसते असे परस्पर समजून तुम्ही दुकानं लावू शकता, रिक्षांचे काय, भंगारातून दहा-वीस हजारांत घेवून यायची आणि आधीच बोळकांड बनलेल्या रस्त्यांवर, चौकात, भररस्त्यात तुम्हाला वाट्टेल तेथे उभ्या करुन परस्पर रिक्षा थांबाही निर्माण करण्याची पूर्ण परवानगी संगमनेरात आहे.
या सगळ्यांचा परिणाम आज सकाळी मोपेडवरुन (क्र.एम.एच.१७ सी.एस.४१९२) आपल्या घराकडे निघालेल्या नीतू सोमनाथ परदेशी (वय ३७, रा.पानसरे गल्ली, नेहरु चौक) या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ रस्ता ओलांडत असताना पाठीमागून बसस्थानकाकडून आलेल्या मालट्रकची (क्र.एम.एच.२०/ए.५८५८) त्यांच्या मोपेडला धडक बसली व ती चाकाखाली दाबली गेली. तर, नीतू परदेशी यांच्या पोटावरुन ट्रकचे चाक पुढे गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर आसपासच्या नागरिकांनी लागलीच त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेत एका निष्पाप गृहिणीचा बळी गेला आणि एका हसत्या कुटुंबावर आभाळ कोसळले.
हॉटेल काश्मिर समोरील रस्ताही असाच धोकादायक आहे. या भागात असंख्य वाहने वळणं घेत असल्याने नेहमीच अपघाताची शक्यता असते. वारंवार वाहतुकीची कोंडी होणार्या आणि वाहनचालकांना नकोसा वाटणार्या या रस्त्यावर रिक्षाथांबा आहे. या थांब्यामुळेच या रस्त्यावर वारंवार वाहतुकीची समस्या निर्माण होते. पोलिसांनाही ही गोष्ट मान्य आहे. मात्र सदरील रिक्षाचालकांनी शहरातील राजकीय पक्षाच्या नेत्याचा पदर धरलेला असल्याने पोलिसांनी हालचाल करण्यापूर्वीच त्यांना शांत राहण्यास सांगण्याचे प्रकारही कानावर आले आहेत. त्यामुळे या रिक्षाचालकांची मग्रुरी वाढली असून हा रस्ता आपल्याला आंदण मिळाल्यागत त्यांचा वावर वाढू लागला आहे.
आजच्या अपघाताला शहरातील बेशिस्त वाहतूक आणि अतिक्रमणं कारणीभूत आहेत. या दोन्ही गोष्टी अधिकार्यांशी निगडीत असून त्यांनी आजच्या घटनेतून बोध घेवून आपण जनसेवक असल्याच्या कर्तव्याची जाणीव करुन घेण्याची गरज आहे. कोणाच्या रोजीरोटीसाठी कोणाचा बळी घेतला जावू शकत नाही याचे भान ठेवून किमान रहदारीच्या अशा ठिकाणांवर अपघात घडणार नाहीत याचे उपाय शोधण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महारांच्या स्मारकाजवळ आजवर अनेक अपघात होवून त्यात असंख्य बळी गेले आहेत, मात्र आजही असले प्रकार थांबलेले नाही. नागरी सेवेची शपथ घेवून आलेले अधिकारी कर्तव्य पथावर येण्यासाठी अजून अशा किती बळींची वाट बघणार आहेत असा प्रश्न आहे.