नान्नज दुमाला येथे सार्वजनिक रस्ता खोदल्याने रहिवाशांचा रास्ता रोको मंडलाधिकारी व तलाठ्यांची शिष्टाई; रस्ता पूर्ववत केल्याने आंदोलन घेतले मागे
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील नान्नज दुमाला येथे मोठेबाबा वाडीकडे जाणारा रस्ता काही व्यक्तींनी रात्रीच्या वेळी जेसीबीच्या सहाय्याने खोदून बंद केला. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी हा सार्वजनिक रस्ता पूर्ववत करावा, या मागणीसाठी शुक्रवारी (ता.21) सकाळी 9 वाजता लोणी-नांदूर शिंगोटे रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन छेडले. सुमारे एक तास सुरु असलेल्या रोकोमुळे वाहतूक ठप्प झाली होती. अखेर रस्ता पूर्ववत केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
नान्नजदुमाला येथील लोणी-नांदूर शिंगोटे रस्ता ते मोठेबाबा वाडीकडे जाणारा रस्ता काही व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने खोदून बंद केला होता. तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी चर मारले. त्यामुळे मोठेबाबावाडी व चत्तर वस्ती परिसरात राहणार्या रहिवाशांची मोठी गैरसोय झाली होती. याबाबत रहिवाशांनी तहसीलदारांना निवेदन देत तक्रार केली होती. मात्र तक्रारीची दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी सार्वजनिक रस्ता पूर्ववत करावा, या मागणीसाठी शुक्रवारी सरपंच भीमराज चत्तर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन छेडले.
या आंदोलनात दिनकर चत्तर, कैलास चत्तर, भानुदास चत्तर, खंडू चत्तर, शंकर चत्तर, संजय चत्तर, सुनील चत्तर, किसन चत्तर, अनिल चत्तर, सोमनाथ चत्तर, पंढरीनाथ चत्तर, पांडुरंग चत्तर, समाधान चत्तर, सौरभ चत्तर, मनोज चत्तर, भाऊसाहेब चत्तर, राजू चत्तर, अशोक चत्तर, सुखदेव चत्तर यांसह रहिवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करीत आंदोलकांना रस्त्यावरून बाजूला घेतले. मंडलाधिकारी नांदूरकर व कामगार तलाठी अमोल गडाख यांनी रस्ता सुरळीत करण्याची ग्वाही दिली. अखेर तातडीने खोदलेला रस्ता बुजवून सुरळीत करण्यात आल्याने आंदोलक रहिवाशांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.