संभाजीनगरच्या अपक्ष उमेदवाराचे कुटुंबासह संगमनेरातून अपहरण! शिर्डीपासून सुरु होता पाठलाग; उबाठा शिवसेनेच्या उमेदवारावर संशय..

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राज्यभरात राजकीय उलथापालथ सुरु झाल्याचे चित्र दिसत असताना बहुतेक राजकीय पक्षांना बंडखोरांनी नाकात दम आणला आहे. मराठा आरक्षण, अंतर्गत बंडखोरी अशा वेगवेगळ्या कारणांनी उमेदवारांना मतविभाजनाची भीती असतानाच एकाच नावाच्या दोन उमेदवारांमुळेही काही मतदारसंघात मातब्बर उमेदवारांसमोर संकट उभे ठाकल्याचे दिसत आहे. त्यातीलच औरंगाबाद पश्चिम (अ.जा) मतदार संघाचाही समावेश आहे. या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार असून शिंदेसेनेकडून संजय शिरसाट तर उद्धव ठाकरे गटाकडून राजू शिंदे त्यांच्यात लढत होणार असल्याचे दिसत असताना या मतदारसंघातील राजू धर्माजी शिंदे या अपक्ष उमेदवाराचे त्याची पत्नी दाजी व बहिणीसह चौघांचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदरील उमेदवार शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. आजचे संगमनेर मार्गे नाशिकला जात होते यावेळी आपला पाठलाग होत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अपहरणकर्त्यांना हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र अपहरणकर्त्यांनी समनापूरनजीक त्यांना गाठले. या प्रकरणात एकमेकांच्या नावात साधर्म्य हे एकमेव कारण असल्याचे समोर येत असून उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी करणाऱ्या राजू रामराव शिंदे यांचा या अपहरणाशी संबंध जोडला जात आहे. याप्रकरणी संगमनेर पोलिसांनी शून्य नंबरने गुन्हा दाखल करुन तो शिर्डीकडे वर्ग केला आहे. या वृत्ताने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार आज (ता.३) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समनापूरनजीक घडला. छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदार संघातून अपक्ष उमेदवारी दाखल करणारे उमेदवार राजू धर्माजी शिंदे हे त्यांची पत्नी चंद्रकला, बहीण ताराबाई, दाजी किशोर तुपे आणि सहकारी मंगेश जाधव, स्वप्निल शिरसाठ व चालक सुहास बागुल यांच्यासह शुक्रवारी (ता.1) शिर्डीत आले होते. शनिवारी (ता.2) पाडव्याच्या दिवशी साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर दिवसभर ते शिर्डीतच थांबले. त्यानंतर रात्रीचा मुक्काम शिर्डी येथे केल्यानंतर आज (ता.3) दुपारी अडीच वाजता ते सर्वजण आपल्या एरटिगा गाडीतून क्रमांक (एम.एच.04/ जी.एच. 4041) या वाहनातून नाशिकला जाण्यासाठी संगमनेरमार्गे निघाले. 
मात्र, काही वेळातच त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या काळ्या रंगाच्या हुंदई क्रेटासह पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा व अन्य एका वाहनातून आपला पाठलाग होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आपल्या वाहनाची गती वाढवली. मात्र त्यांच्या मागावर असलेल्या त्या वाहनांनी त्यांना संगमनेर तालुक्यातील समनापूरनजीक गाठले. यावेळी तीनही वाहनातून आलेल्या आठ ते दहा इसमांनी त्यांचे वाहन अडवून तुम्ही उमेदवारी मागे घेणार आहात की नाही? असा खडा सवाल केला. त्यावर संबंधित उमेदवाराने ‘हो’ घेणार आहे असे प्रत्युत्तर दिले. मात्र त्यानंतरही काळ्या रंगाच्या क्रेटा वाहनातून आलेल्या इसमांनी अपक्ष उमेदवार राजू धर्माजी शिंदे यांच्यासह त्यांची पत्नी चंद्रकला, बहिण ताराबाई व मेहुणे किशोर तुपे यांना बळजबरीने त्यांच्या वाहनातून खाली उतरवून काळा रंगाच्या क्रेटा गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले.
याप्रकरणी अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांचे सहकारी मंगेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलिसांनी शून्य नंबरने गुन्हा दाखल केला असून सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी शिर्डी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या घटनेत केवळ दोन उमेदवारांच्या नावांमधील साधर्म्य हे एकमेव कारण असल्याचे समोर येत असून संभाजीनगर पश्चिम मतदार संघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्यावतीने अधिकृत उमेदवारी करणाऱ्या उमेदवाराचे नावही राजू रामराव शिंदे असे असल्याने त्यांचाच या प्रकरणात हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात शिर्डीसह संगमनेर पोलीसही अधिक तपास करीत आहेत. या वृत्ताने संपूर्ण राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
Visits: 77 Today: 1 Total: 147740

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *