ऐन दीपावलीच्या दिनी ‘चिखली’ प्रकरणात पोलिसांचे अटकसत्र! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; तिघांना ताब्यात घेतले..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या शुक्रवारी डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या राजकीय मंचावरुन वसंत देशमुख नामक कथीत पुढाऱ्याने केलेल्या वक्तव्यावरुन चिखलीजवळ प्रवासी वाहन जाळण्यासह उड्डाणपुलाजवळ एका वाहनाची तोडफोड करण्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी निमोण येथील वाहनचालकाच्या फिर्यादीवरून माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू इंद्रजीत थोरात, त्यांचे स्वीय सहाय्यक भास्कर खेमनर, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, निखिल पापडेजा, गौरव डोंगरे अशा 25 जणांहून अधिकांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर दोन दिवसांनी भाजप-शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या वादा नंतर थेट पोलीस ठाण्यात पोचलेल्या महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दाखल प्रकरणातील आरोपी खुलेआम गावात फिरत असल्याची तक्रार पोलीस उपअधीक्षक समोर मांडली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. शाखेच्या पथकाने आज ऐन दिवाळीच्या दिवशी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्वच आरोपींमध्ये एकच खळबळ उडाली असून काही वेळापूर्वीपर्यंत संपर्कात असलेले आता नॉटरिचेबल’ झाले आहेत.
गेल्या आठवड्यात धांदरफळ येथे डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या युवासंकल्प मेळाव्याच्या मंचावरुन वसंत देशमुख नावाच्या कथित पुढाऱ्याने माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ.जयश्री यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केले होते. त्यांच्या त्या कृतीनंतर थोरात समर्थकांमध्ये रोष निर्माण झाला. त्यातून काही संतप्त कार्यकर्त्यांनी चिखलीजवळ सभेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांचे वाहन अडवून त्याची तोडफोड केली. प्रवाशांना वाहनातून हुसकून देत ते वाहन पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आले.
तर मालपाणी इस्टेट जवळील उड्डाणपुलाजवळ एका बोलेरो वाहनावर हल्ला करुन त्याची तोडफोड करीत मोठे नुकसान करण्यात आले. यावेळी गस्तीवर असलेले पोलीस वाहन वेळीच पोचल्याने मोठा अनर्थ टळला. या दोन्ही घटनांचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले असून यातील चिखली जवळ घडलेल्या घटनेत निमोण येथील वाहनचालक अशोक वालझाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे चुलतबंधू इंद्रजीत थोरात, खासगी स्वीय्य सहाय्यक भास्कर खेमनर, सुरेश थोरात, सुरेश सांगळे, शाबीर तांबोळी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अजय फटांगरे, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, वैष्णव मूर्तडक, सिद्धार्थ थोरात, गोरक्ष घुगे, शेखर सोसे, शरद पवार, सौरभ कडलग, हर्षल रहाणे, सचिन दिघे,
अनिल कांदळकर, विजय पवार, शुभम घुले, शुभम जाधव, शुभम पेंडभाजे, भगवान लहामगे, रावसाहेब थोरात, भरत कळसकर यांच्या 25 ते 30 अज्ञात इसमांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अत्यंत गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर या सर्वांवर अटकेची टांगती तलवार कायम होती. चिखलीतील जळीत प्रकरणानंतर थोरात आणि विखे यांच्यातील राजकीय वादाने मर्यादा ओलांडली. त्यामुळे दोन्ही बाजूने हा विषय अतिशय प्रतिष्ठेचा केला गेला. त्यातच या घटनेनंतर दोनच दिवसांनी नवीन नगर रस्त्यावर भाजप आणि उद्धव ठाकरे गटाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये हमरीतुमरी होऊन प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोलिस अधिकाऱ्यांना संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देत चिखली प्रकरणातील आरोपी खुलेआम गावात फिरत असतानाही पोलिसांना कसे आढळून येत नाही असा सवाल उपस्थित केला.
त्यानंतर सदर प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांसह समांतरपणे अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडेही देण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणातील सर्व आरोपींचा ठावठिकाणा घेण्यास सुरुवात केली असता, त्यातील सिद्धार्थ सुभाष थोरात, अनिल पाराजी भोर व भारत विठ्ठल शिंदे हे तिघे दिवाळीनिमित्त आज घरी आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्यांनी संबंधितांच्या घरांवर छापे घालीत त्यांना ताब्यात घेतले आहे. सद्यस्थितीत त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात असून त्यानंतर त्यांना अटक केली जाईल. या वृत्ताने या प्रकरणात आरोपी असलेल्या आणि अटकपूर्व जामिनासाठी अद्यापही प्रतिक्षेत असलेल्या उर्वरित सर्व आरोपीचे धाबे दणाणले असून काही वेळापूर्वी पर्यंत संपर्कात असलेले ‘ते’ सर्वचजण आता संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले आहेत.
Visits: 89 Today: 1 Total: 147786