अकोले शहरासह तालुक्यात अवकाळी पाऊस व्यापार्यांसह नागरिकांची उडाली एकच धांदल
नायक वृत्तसेवा, अकोले
शहरासह तालुक्यात बहुतांश भागात सोमवारी (ता.5) सायंकाळी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. व्यापार्यांसह नागरिकांची पावसाने एकच धांदल उडाली. सुमारे एक तास पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.
सध्या थंडी सुरू आहे. अशातच रविवारपासून अचानक थंडी कमी होऊन आभाळ आले होते. सोमवारी दिवसभर ढगाळ व उकाडा असे वातावरण होते. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अचानक जोराचा पाऊस सुरु झाला. यावेळी एक तास पावसाचा जोर कायम होता. अचानक आलेल्या या पावसाने शेतकरी व व्यापार्याची धांदल उडाली.
शेतकर्यांच्या शेतात काढून ठेवलेल्या कांदा पिकासह अन्य शेतीमालाचे नुकसान झाले. शेतकरी अतिवृष्टीने हैराण झालेले आहे. मागील एक महिन्यापासून पाऊस थांबलेला असताना सोमवारी पुन्हा अचानक पाऊस सुरु झाला. हा पाऊस सुरु असताना अकोले शहरातील वीज पुरवठाही खंडित झाला होता. एक तासानंतर पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. दरम्यान वीरगाव, देवठाण, सुगाव, रेडे, कुंभेफळ, कळस, उंचखडक, ढोकरी, गर्दणी, इंदोरी, रुंभोडी आदी गावांतही पाऊस पडला. दिवसभर वातावरणात उकाडा जाणवत होता. त्यामुळे कमालीचा गारवा निर्माण झाला आहे.