डॉक्टरांनी मृत्यूच्या दाढेतून वाचवले, आता मदतीची गरज! माळवाडी येथील आदिवासी गरीब कुटुंबातील पूजा खंडागळेला झाला सर्पदंश
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातील बोटा गावांतर्गत असलेल्या माळवाडी येथील आदिवासी गरीब कुटुंबातील पूजा खंडागळे हिला अतिविषारी मण्यार सापाने दंश केल्याने तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन तिला मृत्यूच्या दाढेतून वाचवले. मात्र तिची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने सध्या तिला आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी, असे आवाहन माळवाडीचे पोलीस पाटील संजय जठार यांनी केले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, माळवाडी परिसरात चिमाजी खंडागळे हे आदिवासी कुटुंब वास्तव्यास आहे. चिमाजी व पत्नी सुशिला हे दाम्पत्य मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना तीन अपत्य असून, यातील पूजा ही अकरा वर्षांची आहे. मंगळवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दिवसभर काबाडकष्ट करुन संध्याकाळचे जेवण करुन हे कुटुंब झोपले होते. त्याचवेळी छपराच्या कुडातून रात्रीच्या वेळेस अतिविषारी मण्यार साप घरात आला व झोपेत असलेल्या पुजाच्या हाताला दंश केला. तिला त्रास होवू लागल्याने कुटुंबीय झोपेतून जागे झाले आणि आजूबाजूला बघितले असता जवळच साप दिसला. त्यानंतर पुजाला तत्काळ बोटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.
जास्त त्रास सुरु झाल्याने तिला पुणे जिल्ह्यातील नारायणगावचे प्रसिद्ध असलेले विषबाधा व सर्पदंश तज्ज्ञ डॉ.सदानंद राऊत यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता माणुसकीची भावना म्हणून पुजावर मोफत उपचार करत तिला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. मात्र औषधी व इतर खर्च जास्त असल्याने माळवाडी येथील ग्रामस्थांनी व श्री नाथाबाबा माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी या गरीब कुटुंबाला हातभार लावण्यासाठी काही रक्कम गोळा केली. पंरतु अजूनही मदतीची गरज आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी. तसेच ज्यांना मदत करायची आहे त्यांनी विशाल मुसळे (मो.क्र.9689538333) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस पाटील संजय जठार यांनी केले.