संगमनेर तालुक्यात बोगस डॉक्टर आणि बेकायदा रुग्णालयांचा सुळसुळाट! वैद्यकीय अधिकार्यांसह राजकीय नेत्यांच्या संपर्कातील व्यक्तिंकडूनच आरोग्य यंत्रणेचा ‘खैला होबे’..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविडच्या वाढत्या संक्रमणात तालुक्यातील बोगस डॉक्टर्स व बेकायदा कोविड रुग्णालयांची संख्याही हळुहळु समोर येवू लागली आहे. विशेष म्हणजे साकूरच्या ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातच ‘खुलेआम’ बोगसगिरीचा हा धंदा सुरु असूनही तेथील वैद्यकीय अधिकार्यांची खोटी प्रतिज्ञापत्रे आणि या संपूर्ण प्रकरणावरील मुगगिळी तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेचाच ‘खैला होबे’ राबवित असल्याचे धक्कादायक वास्तवही समोर आले आहे. रुग्णांच्या जीवाशी उघड खेळणार्या अशाप्रकारच्या बेकायदा ‘वैद्यकीय धंद्याला’ काही राजकीय नेत्यांच्या संपर्कातील व्यक्तिंचाही पाठींबा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच चार दिवसांपूर्वी शिबलापूरमध्ये ‘बोगस डॉक्टर’ पकडूनही त्यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेतील हा सावळा गोंधळ महामारीच्या काळात मात्र सामान्य नागरिकांच्या जीवावर उठला असून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीच आता या ‘गंभीर’ प्रकरात लक्ष घालण्याची गरज आहे.

संगमनेर तालुक्यात कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येसह त्यांच्यावर बेकायदा पद्धतीने उपचार करणारी रुग्णालये आणि वैद्यकीय पदवी नसतांनाही चक्क कोविड रुग्ण हाताळणारे ‘बोगस डॉक्टर’ समोर येवू लागले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून स्थिरस्थावर झालेल्या अशा रुग्णालयांवर अथवा बोगस डॉक्टरांवर ज्यांनी कारवाई करायला हवी त्यांच्याकडून मात्र या गंभीर गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे वास्तवही गेल्या आठ दिवसांतील चार कारवायांवरुन सहज लक्षात येते. विशेष म्हणजे शहरी भागातील बोगस डॉक्टर शोधण्याची कायदेशीर जबाबदारी पालिकेच्या मुख्याधिकार्यांची तर ग्रामीणभागाची जबाबदारी पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांसह तालुका वैद्यकीय अधिकारी व प्रत्येक ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकार्यांची आहे. मात्र गेली अनेक वर्षे एकाच ठिकाणी ‘नांदणार्या’ अशाकाही अधिकार्यांनी या बेकायदा वैद्यकीय व्यावसायिकांशीच हातमिळवणी केल्याने महामारीच्या काळात सामान्यांचे जीव वाचवण्यासाठी संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्यांसह तहसीलदारांनाच धावपळ करावी लागत आहे. हा प्रकार अत्यंत धक्कादायक आणि रुग्णांचे जीव घेणारा असून संगमनेरच्या नेतृत्त्वाने याची गांभिर्याने दखल घेण्याची गरज आहे.

गेल्या 27 एप्रिल रोजी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे कोविडच्या काळातील तालुक्याची आरोग्य व्यवस्था ठिकठाक आहे की नाही हे पाहण्यासाठी दौर्यावर होते. यावेळी या दोन्ही वरीश्ठ अधिकार्यांनी जवळे कडलग प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात तपासणी केली असता निमगाव भोजापूर येथे शैलेश किसन कडलग हा ‘मुन्नाभाई’ चक्क कोविड रुग्णालय चालवित असल्याचा धक्कादायक प्रकार त्यांना समजला. अधिकार्यांनी त्याचे दुकान बंद करुन संबंधितावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश बजावले. मात्र त्यानंतरही जवळे कडलग येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.उषा नंदकर यांनी त्या आदेशाला हवेतच उडवल्याचा खळबळजनक प्रकारही समोर आला, अखेर मध्यरात्रीनंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप यांनाच गुन्हा दाखल करावा लागला. तालुक्यातील या पहिल्याच प्रकाराने आरोग्य व्यवस्थेचे धिंदवडे निघण्यास सुरुवात झाली.

त्यानंतर दोन दिवसांनी प्रांताधिकारी डॉ.मंगरुळे आणि गटविकास अधिकारी शिंदे यांनी शिबलापूर येथेही छापा घातला व तेथील एका मुन्नाभाईचा पडदा फार्श केला. या प्रकरणी सविस्तर चौकशी करुन संबंधित डॉक्टरवर तत्काळ गुन्हा दाखल करावा असे स्पष्ट आदेश प्रांताधिकार्यांनी आश्वीचे वैद्यकीय अधिकारी के.ए.मदने यांना दिले. मात्र या घटनेला चार दिवसांचा कालावधी लोटूनही अद्यापपर्यंत आश्वी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. सदरचा मुन्नाभाई पठारावरील एका राजकीय हस्तकाचा नातेवाईक असल्याची माहिती दैनिक नायकच्या हाती लागली आहे. ‘त्या’ मुन्नाभाईला वाचवण्यासाठी पठारावरील संबंधित हस्तकासह तालुक्यातील ‘मोठ्या’ नेत्याच्या ‘एका’ सहाय्यकाने संबंधितावर दबाव आणल्यानेच अद्यापपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होवू शकलेला नाही हे विशेष. म्हणजे सर्वसामान्य जनता अशा मुन्नाभाईंच्या उपचारांनी मेली तरी चालेल, पण राजकीय आशीर्वाद लाभलेले कोणतेही बेकायदा ‘धंदे’ बंद होणार नाहीत असेच चित्र या घटनेतून स्पष्टपणे दिसून आले, जे तालुक्याच्या आरोग्यासाठी अजिबातच योग्य नाही.

बुधवारी (ता.5) प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम व गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी जनतेच्या काळजीपोटी तालुक्याच्या पठारभागातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी त्या भागाचा दौरा केला. यावेळी साकूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रातील कोविड स्थिती आणि त्यावरील उपचार व विलगीकरण केंद्रांची पाहणी करीत असतांनाच त्यांना डॉ.अविनाश रासने या आयुर्वेदाचार्याच्या श्री समर्थ हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली. अधिकार्यांनी तेथे जावून पाहणी केली असता संबंधिताकडे कोविड रुग्णालय चालविण्याची परवानगी नसतांना व कोविड रुग्णांवर उपचार करण्याचाच अधिकार नसतांनाही डॉ.रासने नावाचे वैद्यकीय व्यावसायिक साकूरच्या ‘वैद्यकीय अधीक्षकांच्या’ चक्क नाकाखालीच टिच्चून ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर’ चालवित असल्याचे अत्यंत धक्कादायक वास्तव त्यांच्यासमोर उभे राहीले.

हा प्रकार कमी होता की काय देव जाणे. परंतु अधिकार्यांनी त्या जवळच असलेल्या डॉ.संजय टेकुडे यांच्या ओमसाई हॉस्पिटलमध्ये तपासणी केली असता तेथील दृष्य पाहून अधिकारीच चक्रावले. होमिओपॅथीक उपचारांची पदवी धारण केलेले डॉ.टेकुडे महाशय आपल्या रुग्णालयात कोविड संशयित रुग्णांची चक्क ‘रॅपीड अँटीजेन चाचणी’ करीत असल्याचे अधिकार्यांना आढळले. त्यांच्या रुग्णालयात रॅपीड चाचणीसाठी लागणार्या किटस् आणि कोविड उपचारांवरील अन्य साहित्य व औषधे आढळून आली. सदरचे दोन्ही डॉक्टर शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता व मूळात कोविड रुग्णांवर उपचार करण्याचा अधिकारच नसतांना गोरगरीब व अज्ञानी नागरिकांच्या भावनांशी खेळून शासनापासून लपवून परस्पर त्यांची ‘रॅपीड’ चाचणी करीत होते, आणि निष्कर्ष सकारात्मक (पॉझिटिव्ह) आल्यानंतर तेथेच त्यांच्यावर उपचार करीत होते. हा प्रकार सामान्य रुग्णांच्या जीवाशी खेळण्यासारखाच असून डॉ.अविनाश रासने यांच्या उपचारांनी गंभीर अवस्थेत पोहोचलेल्या व नंतर अत्यवस्थ अवस्थेत संगमनेरातील खासगी रुग्णालयात आणतांनाच पठारावरील दोघा रुग्णांचा बळीही गेला आहे.

सामान्य रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु असलेला इतका भयंकर प्रकार समोर येवूनही ज्या राजकीय हस्तकाने शिबलापूर प्रकरणातील मुन्नाभाईला पाठीशी घालण्यासाठी ‘शर्थ’ केली तोच राजकीय हस्तक आता या दोन डॉक्टरांनाही धीर देत असून ‘दोन दिवस जावू द्या, मुतच्या रुग्णालयाचे ‘सील’ खोलायला लावू..’ असे सांगत महामारीच्या या भयानक संकटात मोठ्या प्रमाणात नागरिक मृत्यूमुखी पडत असतांनाही त्याकडे दुर्लक्ष करुन तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेचाच ‘खैला होबे’ राबवित असल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. याप्रकरणी प्रांताधिकारी डॉ.मंगरुळे यांनी साकूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.वैरागर यांना बुधवारी दुपारीच संबंधित रुग्णालयांची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या घटनेला 24 तासांहून अधिक कालावधी लोटूनही अद्यापही घारगाव पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. या प्रकरणातही ‘त्या’ राजकीय हस्तकासह तालुक्यातील मोठ्या नेत्यासोबत सतत वावरणार्या त्यांच्या सहाय्यकाने अधिकार्यांवर दबाव आणल्याची दबकी चर्चा कानावर येत आहे.

सध्या तालुक्यात कोविडचा मोठा उद्रेक सुरु आहे. सामान्य नागरिक उपचार आणि औषधांसाठी त्राही करीत आहे. अशा स्थितीत त्यांना उपचारांचे अमिष दाखवून काय उपचार द्यावेत याचे ज्ञान नसतांनाही त्यांच्या जीवाशी खेळण्याचे एकामागून एक प्रकार समोर येत आहेत. प्रामाणिक अधिकारी जनतेच्या स्वास्थासाठी अशांवर कारवाईचा बडगा उगारीत असतांना राजकीय दिग्गजांशी केवळ जवळीक असलेले काहीजण इतके भयानक प्रकारही पाठीत घालण्याचे षडयंत्र रचित आहेत. हा प्रकार म्हणजे सामान्य रुग्णांच्या जीवाशी खेळच आहे. यासोबतच तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेतही मनमानी सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. जवळे कडलगच्या वैद्यकीय अधिकारी उषा नंदकर गटविकास अधिकार्यांचे आदेश मानायला तयार नाहीत, तर आश्वीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.के.ए.मदने प्रांताधिकार्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देवून चार दिवस झाले तरी कारवाई करायला तयार नाहीत. साकूरला तर ग्रामीण रुग्णालय आणि वैद्यकीय अधीक्षक दर्जाचा अधिकारी लाभला आहे. पण तेथेही रुग्णांच्या जीवाशीच खेळ सुरु आहे. यावरुन काही राजकीय हस्तक आणि वैद्यकीय अधिकार्यांनी तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेचाच ‘खैला होबे’ केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

