‘धर्म’ आणि ‘जाती’च्या नावावर निवडणूक झाल्याने पराभव : डॉ.सुजय विखे पा. तळेगावंमध्ये जोरदार फटकेबाजी; संगमनेरची जागा भाजपच्या वाट्याला?..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय’ अशा घोषणेने भाषणाची सुरुवात करणार्या माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे शुक्रवारी सायंकाळी जोरदार फटकेबाजी करीत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. तालुक्यातील चाळीस वर्षांची दहशत मोडून काढण्यासाठीच आजची सभा होत असून ही कोणती यात्राही नाही किंवा सुपारी देवून गोळा केलेली माणसंही नाहीत तर, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी तरुणांनी केलेली गर्दी असून आगामी विधानसभा निवडणुकीत संगमनेर तालुका तुमची दहशत मोडल्याशिवाय राहणार नाही असा घणाघाती प्रहारही त्यांनी केला.
शुक्रवारी (ता.18) सायंकाळी तळेगांव दिघे येथे माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचा ‘युवा संकल्प मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी लोणीहून तळेगावकडे जाताना लोहारे, कासारे आणि वडझरी येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. वंजारी समाजाच्यावतीने भल्यामोठ्या क्रेनचा वापर करुन डॉ.विखे यांना हार घालण्यात आला. तर, तळेगावमध्ये पोहोचल्यानंतर फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीत वाजतगाजत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती.
यावेळी डॉ.विखे-पाटील यांनी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे थेट नाव न घेता त्यांच्यावर चौफेर हल्ला चढवला. वर्षानुवर्ष या भागातील महीलांच्या डोक्यावरील हांडाही उतरवू शकले नाहीत ते आज नेमक्या कोणत्या विकासाची भाषा करीत आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला. संगमनेर तालुक्यात फक्त नातेवााईकांसाठीच राजकारण चालते. नातेगोते, ठेकेदार आणि जमीनीचा ताबा मिळवणारे या पात्रतेवरच पदांची खैरात वाटली जाते. परंतु, तळेगाव व निमोण परिसरातील तरुणांनी या मातीची शान राखून परीवर्तन केले आहे. तसेच परीवर्तन आता येणार्या विधानसभा निवडणुकीतही करायचे असून दोन दिवसांत पक्षाचा निर्णय होवून संगमनेर विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपाच्या वाट्याला येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आजची तळेगावमधील सभा फक्त ट्रेलर आहे. या तालुक्यात परीवर्तन अटळ असून त्यात महीलांचा वाटा मोठा असेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. युवकांनीही मागे न राहाता तालुक्यातील दहशत झुगारुन परीवर्तनासाठी पुढे आले पाहीजे. ठेकेदार संस्कृती कधीही तालुक्याचा विकास करु शकत नाही अशा शब्दात त्यांनी माजीमंत्री थोरात यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी ज्यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडत आहेत, प्रत्यक्षात ते यावेळी आमदारही होणार नसल्याचा जोरदार टोलाही त्यांनी लगावला.
मागील 40 वर्षे संगमनेर तालुक्याला अनेक मोठी पदं मिळाली. पण यांना निधी आणता आला नाही. नामदार विखे-पाटील यांच्या माध्यमातून तळेगावच्या विकासासाठी 44 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला, निळवंडे धरणाचे पाणी शिवारात आले. यांनी फक्त विखे पाटलांच्या परिवारावर टीका करण्याचे काम केले. मात्र, साईबाबांच्या आशीर्वादाने विखे पाटीलांचा मुलगाच या जिल्ह्याचा पालकमंत्री झाला आणि त्यांनीच निळवंड्याचे पाणी देखील आणून दाखवले. आता भोजापूर चारीचे पाणीही विखे-पाटीलच आणतील असा दावा करीत पुढची चाळीस वर्षे तालुक्यातील युवकांच्या उज्वल भविष्याची असतील अशी ग्वाही डॉ.विखे-पाटील यांनी दिली.
अनेक वर्ष एकाच घरात सत्ता असल्याने आता तुमची मनमानी बस्स झाली. आजची सभा तालुक्यातील परीवर्तनाची नांदी आहे. आमचा कार्यकर्ता शिवरायांचा मावळा आहे. पाकीट संस्कृतीत वाढलेला नाही अशा शब्दात त्यांनी थोरातांवर कोरडे ओढले. यावेळी त्यांनी संगमनेरची उमेदवारी नाकारल्याच्या बातम्यांचाही समाचार घेतला. अशा प्रकारच्या बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जात असून दोन दिवसांत संगमनेरची जागा भाजपच्या पारड्यात येईल असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला तळेगाव गटातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
गेल्याकाही दिवसांपासून संगमनेर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडून भाजपकडे जावून डॉ.सुजय विखे-पाटील यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यातच दोन दिवसांपूर्वी डॉ.विखे यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याची आवई उठवण्यात आली. त्याचाही डॉ.सुजय विखे-पाटील यांनी खरपूस समाचार घेतला. विखेंना तिकिटं नाकारल्याच्या बातम्या जाणीवपूर्वक पेरण्यात आल्या असून ‘यशोधन’च्या सूत्रांवर भरवसा ठेवू नका असा हल्ला चढवत येत्या दोन दिवसांत संगमनेर मतदारसंघ भाजपसाठी सोडल्याचे वृत्त येईल असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.