नेवाशातील माऊलींच्या यात्रेत पाच कोटींची उलाढाल ग्रंथ, माऊलींच्या मूर्ती, मिठाई, तुळशीमाळांची मोठ्या प्रमाणात विक्री

नायक वृत्तसेवा, नेवासा
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात वद्य एकादशीनिमित्त रविवारी (ता. 24) भरलेल्या यात्रेत एका दिवसात पाच कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल झाली आहे. ग्रंथ, माऊलींच्या मूर्ती, मिठाई, तुळशीमाळांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.


माऊलींच्या यात्रेत खेळणी, मिठाई, ग्रंथ, तुळशीच्या माळा, अष्टगंध, बुक्का, माऊली व विठ्ठलाच्या मूर्ती, संसारोपयोगी वस्तू, तसेच फळे, फुले व तुळशीची रोपे विक्रीस आली होती. रविवारी (ता. 24) दिवसभरात सहा लाखांहून अधिक वारकरी व भक्तांनी भेट देऊन दर्शनाचा लाभ घेतला. पायी दिंड्या व भक्तांची गर्दी लक्षात घेता, मंदिर परिसर व रस्त्यांवर विविध वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती.

बांगड्या व खेळण्यांच्या तीनशे दुकानांतून अंदाजे पन्नास लाखांची उलाढाल झाल्याचे संतोष डांगरे यांनी सांगितले. फळे व खाद्यपदार्थांचे स्टॉल सर्वच रस्त्यावर होते. पाट, लाटणे, चाटू व पोळपाटांच्या पंचवीस दुकानात अंदाजे चार लाखांची उलाढाल झाल्याचे दीपक गायकवाड यांनी सांगितले. नेवासा फाटा, श्रीरामपूर रस्ता, खुपटी, देवगड रस्त्यावर तसेच वाहनतळ असलेल्या भागात लाखो रुपयांची उलाढाल झाली. परिवहन मंडळाने पैठण, शेवगाव, प्रवरासंगम, श्रीरामपूर, घोडेगावसाठी 72 जादा बस फेर्‍या केल्याचे आगार व्यवस्थापक किशोर अहिरराव यांनी सांगितले.

कोरोनामुळे दोन वर्षे यात्रा रद्द झाल्याने यंदा आषाढ वद्य एकादशी यात्रेला विक्रमी गर्दी झाली. मंदिर परिसर व गावात येणार्‍या सर्व रस्त्यांवर हजारो दुकाने, हॉटेले, बसस्थानक, वाहनतळांवर अंदाजे चार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.
– जालिंदर गवळी (सामाजिक कार्यकर्ते, नेवासा)

Visits: 11 Today: 1 Total: 115584

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *