घारगाव ‘लव्ह जिहाद’मधील फरार आरोपी नेपाळमध्ये? अडीच महिन्यांपासून शोध; सूत्रधार मात्र अद्यापही कारागृहातच..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तीन महिन्यांपूर्वी तालुक्यातील घारगावमध्ये घडलेल्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील मुख्य आरोपी शादाब तांबोळीसह त्याला मदत करणार्‍या दोघांपर्यंत अद्यापही पोलिसांचे हात पोहोचलेले नाहीत. त्यांच्या शोधासाठी घारगाव पोलिसांनी आत्तापर्यंत राज्यातील अर्धा डझनहून अधिक शहरांसह थेट ओडिशामध्येही छापेमारी केली. मात्र प्रत्येकवेळी पोलिसांचे हात रिकामेच राहिले आहेत. आता या प्रकरणात मोठी माहिती हाती लागली असून फरार असलेल्या तांबोळीसह मुंबईतील त्याचा साथीदार आयाज पठाण पोलिसांना हुलकावण्या देत थेट नेपाळमध्ये पोहोचल्याचे वृत्त आहे. तर, पठारभागातील अन्य एका आरोपीचा मात्र घटनेपासूनच कोणताही मागमूस लागलेला नाही. या प्रकरणात आत्तापर्यंत मुख्य सूत्रधार युसुफ दादा चौघुलेसह तिघांना अटक झाली असून त्यातील दोघांना जामीनही मंजूर झाला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल केले आहे.


गेल्यावर्षी 6 जूनरोजी बजरंग दलाच्या वतीने संगमनेरात अभूतपूर्व हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी देशासह राज्यातील वाढत्या लव्ह जिहाद प्रकरणांविरोधात आवाजही उठवण्यात आला होता. या मोर्चाला जेमतेम वर्षभराचा कालावधी लोटला असतानाच गेल्या 7 जुलैरोजी पठारभागात अतिशय पद्धतशीरपणे नियोजन करुन युसुफ दादा चौगुले या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदच्युत पदाधिकार्‍याने शादाब तांबोळीचा वापर करुन तालुक्यात लव्ह जिहादचा पहिला प्रकार घडवून तालुक्यातील सामाजिक सौहार्दाच्या वातावरणात विष कालवण्याचे काम केले.


या घटनेत पठारभागातील एका 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला बोलण्याच्या बहाण्याने शादाब तांबोळीकरवी मंचरमध्ये बोलावून तिचे बळजबरीने अपहरण करुन तिला थेट मुंबईला नेण्यात आले. त्यासाठी पीडित तरुणीला युसुफ चौगुले याने गुंगीचे औषधही पाजले. त्यानंतर चाकण येथे गेल्यानंतर चौगुलेने गुंगीत असलेल्या पीडितेला अमर पटेल (रा.साकूर) या आरोपीच्या गाडीत बसवून शादाब तांबोळी आणि अन्य एका अनोळखी महिलेसह मुंबईला रवाना केले आणि तो मात्र तेथून माघारी घारगावला आला. 7 जुलैरोजी घडलेला हा प्रकार उघड होताच संगमनेरात प्रचंड तणाव निर्माण झाला. त्यातच त्यावेळी घारगाव पोलीस ठाण्यात संतोष खेडकरसारखे निष्क्रिय पोलीस निरीक्षक असल्याने लोकांच्या संतापात अधिकच भर पडली.


त्यामुळे पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून तपासाला वेग दिला. त्यातून या प्रकरणाचा सूत्रधार युसुफ दादा चौगुले असल्याचे समोर येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पीडितेसह शादाब तांबोळीला घारगाव पोलिसांसमोर हजर होण्यास भाग पाडले. त्यानुसार 10 जुलैरोजी शादाब तांबोळी पीडित 19 वर्षीय तरुणीसह पोलिसांसमोर हजर झाला. मात्र तत्पूर्वी आरोपीने तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यासह पोलिसांसमोर गेल्यानंतर, पीडितेच्या कुटुंबियांसमोर गेल्यानंतर काय बोलायचे याबाबत दमबाजी करीत कुटुंबासह सगळ्यांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. त्यामुळे पीडितेची प्रकृती ढासळल्याने पोलिसांनी तिला काहीकाळ महिला सुधारगृहात पाठवले होते.


त्यातून बरी झाल्यानंतर 26 जुलैरोजी पीडितेने घारगाव पोलीस ठाण्यात हजर होवून ती अवघ्या पंधरा वर्ष वयाची असतानाच आरोपी युसुफ दादा चौगुले याने शादाब तांबोळीशी कशापद्धतीने दबाव टाकून प्रेमसंबंध निर्माण करण्यास भाग पाडले इथपासून ते अपहरण, शारीरिक अत्याचार, निकाह आणि पोलिसांसमोर आणताना झालेली दमबाजी इथपर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. सदरचा प्रकार बळजबरीने आणि दमबाजी व धमक्या देवून करण्यात आल्याचाही तक्रारीत स्पष्ट उल्लेख असल्याने पोलिसांनी पोस्कोसह अपहरण व अत्याचाराच्या कलमांसह सुरुवातीला चौघांवर गुन्हा दाखल करीत तत्काळ या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार युसुफ दादा चौगुले याला श्रीरामपूरात जावून बेड्या ठोकल्या.


त्यानंतर मुंबईत आरोपी शादाबची ठेप ठेवणार्‍या आदिल शब्बीर सय्यद याच्यासह चाकणपासून मुंबईतील साकीनाक्यात पीडितेसह शादाबला पोहोचवणार्‍या साकूरच्या अमर पटेल याच्याही मुसक्या आवळण्यात आल्या. या तिघांच्या पोलीस कोठडीतून पोलिसांना या प्रकरणाचा उलगडा तर झाला, मात्र गुन्हा दाखल झाल्यापासूनच पसार झालेला मुख्य आरोपी शादाब तांबोळी, त्याचा पठारावरील साथीदार कुणाल शिरोळे व मुंबईत बडदास्त ठेवणारा आयाज अजिम पठाण या तिघांचा मात्र कोणताही मागमूस लावता आला नाही. या दरम्यान पोलिसांनी मुंबई, धुळे, मालेगाव, श्रीरामपूरसह राज्यातील अनेक ठिकाणी छापे घातले. एकवेळ तर शादाब आणि आयाज हे दोघेही ओडिशामध्ये असल्याचे ‘कन्फर्म इनपूट’ मिळाल्यानंतर पोलिसांनी लागलीच ओडिशाही गाठले, मात्र त्या दोघांनी पोलिसांना चकवा दिला.


एकीकडे फरार आरोपींचा माग काढीत असतानाच दुसरीकडे दीर्घकाळ कारागृहात असलेल्या सूत्रधार युसुफ चौगुलेसह आदिल सय्यद व अमर पटेल यांनी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केले. त्यावर सविस्तर सुनावणी झाल्यानंतर गेल्या महिन्याच्या सुरुवातीला आदिल सय्यद व अमर पटेल यांना सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने युसुफ दादा चौगुले याचा जामीन मात्र फेटाळला. त्याने त्या विरोधात छत्रपती संभाजीनगरच्या खंठपीठात दाद मागितली असून त्यावर अद्याप सुनावणी झालेली नाही. मात्र दरम्यानच्या कालावधीत पोलिसांनी अटक केलेल्या तिघाही आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे.


पीडित मुलीला ती अल्पवयीन असताना प्रेमपाशात अडकावणारा व त्यानंतर प्रेमसंबंध कायम ठेवण्यासाठी घारगाव, संगमनेर व नंतर जुन्नर तालुक्यातील शिक्षण संस्थेत जावून दबाव निर्माण करणारा शादाब तांबोळी, त्याला वेळोवेळी साथ देणारा कुणाल शिरोळे आणि पीडितेचे अपहरण करुन मुंबईत नेल्यानंतर तेथे त्यांना मदत करणारा आयाज पठाण हे तिघेही पसार असून त्यातील तांबोळी व पठाण हे दोघेही सोबत आहेत, तर शिरोळेचा मात्र कोणताही मागमूस नाही. पोलिसांना मिळालेल्या विश्‍वासार्ह माहितीनुसार मुख्यआरोपीसह दोघेही आता नेपाळमध्ये दडून बसले आहेत. पोलीस त्यांच्यावर नजर ठेवून असून संधी मिळताच कधीही त्यांना बेड्या ठोकल्या जावू शकतात.


संगमनेर तालुक्याच्या सामाजिक वातावरणाला गढुळ करणार्‍या या प्रकरणानंतर मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी जलदगतीने हालचाल करीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ग्रंथालय विभागाचा त्यावेळी पदाधिकारी असलेला या प्रकरणाचा सूत्रधार युसुफ दादा चौगुले याला तत्काळ ताब्यात घेत अटक केल्याने अनर्थ टळला. आता या प्रकरणातील मुख्य आरोपीला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरु असून आत्तापर्यंत त्याच्यासाठी राज्यासह ओडिशा व गुजरातमध्येही छापेमारी करण्यात आली आहे. लवकरच फरार आरोपींनाही गजाआड केले जाईल असा विश्‍वास घारगाव पोलिसांना आहे.

Visits: 39 Today: 1 Total: 79393

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *