अकोल्याच्या राजकारणात पुन्हा ‘नवा’ ट्विस्ट! पवारगटही पडला संभ्रमात; तळपाडेंची ‘प्रदेशाध्यक्षां’शी गुप्तगू..

श्याम तिवारी, संगमनेर
विधानसभा निवडणुकांची कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची दाट शक्यता गृहीत धरुन राज्यातील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अकोले मतदार संघातील हालचालीही वाढल्या आहेत. एकीकडे विद्यमान आमदार डॉ.किरण लहामटे यांनी आपल्या कामाच्या बळावर महायुतीचे उमेदवार म्हणून प्रचाराचा शंखही फुंकला आहे तर, दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश पाहून महाविकास आघाडीकडून त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून नशिब आजमावण्यासाठी इच्छुकांची संख्या दररोज वाढत आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या आयोजनातून अमित किंवा त्यांच्या मातोश्री सुनिता भांगरे यांना शरद पवार गटाकडून जवळजवळ उमेदवारी निश्‍चित मानली जात असतानाच अकोल्याच्या राजकारणात अचानक आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे. पिचड पिता-पूत्रांच्या पवार भेटीनंतर आता शिवसेनेकडून दोनवेळा पिचडांना कडवी झूंज देणार्‍या मधुकर तळपाडे यांची अकोल्याच्या राजकारणात ‘एन्ट्री’ झाली आहे. त्यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी ‘गुप्तगू’ केल्याने यावेळी खूद्द शरद पवारही ‘संभ्रमात’ पडले आहेत.


अकोल्यात पवार परिवाराला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे या मतदार संघात शरद पवार नावाचा नेहमीच दबदबा बघायला मिळाला. गेल्यावेळच्या निवडणुकीत राज्यात सर्वत्र महायुतीचे वारे असतानाही त्यांनी अकोल्यातील एका सभेने किमया साधली होती. तर, लोकसभा निवडणुकांपूर्वी पक्षात फूट पडून अजित पवार यांनी पक्षावर दावा ठोकल्याने शरद पवारांच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्‍न निर्माण झाला होता. मात्र त्यांनी फिनीक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळवून दिले. अकोल्यात झालेल्या त्यांच्या सभेलाही विक्रमी गर्दी झाली होती, त्याचा परिणाम आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना अकोल्यातून विजयी मताधिक्क्य मिळण्यात झाले.


लोकसभेसाठी उभे असलेले भाऊसाहेब वाकचौरेही मूळचे अकोले तालुक्यातीलच असल्याने त्याचाही त्यांना मोठा फायदा झाला. लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही मोठा जनाधार महाविकास आघाडीकडे जाईल याबाबत मात्र साशंकता आहे. अलिकडच्या काळात तरुण मतदारांची संख्याही वाढली असून बहुतांशी तरुण अजित पवारांचे समर्थक आहेत. अशातच विद्यमान आमदार डॉ.किरण लहामटे यांनी अकोले मतदार संघात अगदी दुर्गम वाडीवस्त्यांवरील आदिवासींना समोर ठेवून कामे केली आहेत. अनेक गावांमधील मंदिरांच्या सभामंडपांना त्यांनी लाखोंचा निधीही मिळवून दिला आहे. ज्या भागात आजवर कधीही जाण्यासाठी रस्ता नव्हता अशा भागात त्यांनी सिमेंटचे दीर्घकाळ टीकणारे रस्ते तयार केल्याने त्यांची अकोल्यात ‘क्रेझ’ निर्माण झाली आहे.


उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवारांशी असलेल्या संबंधांचा तालुक्याच्या विकासासाठी परिपूर्ण वापर करताना त्यांनी रस्ते, पाणी, वीज या मुलभूत गोष्टींसह पर्यटन सुविधा, सभामंडप अशा अनेक कामांसाठी कोट्यवधीचा निधी मिळवला. पाच वर्षातील भरीव कामांसह नुकत्याच मंजूर झालेल्या ‘लिंगदेव औद्योगिक वसाहती’च्या माध्यमातून अकोले तालुक्याचा कायापालट होणार आहे. हजारो आदिवासी तरुणांना रोजगार मिळण्यासह अकोले शहराच्या बाजारपेठेलाही अच्छे दिन येण्याची आशा आहे. लहामटेंच्या बलस्थानात ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे.


अकोले मतदार संघाचा विचार केल्यास कधीकाळी येथे डाव्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. मात्र जसा काळ पुढे सरकला, तसा त्यात बदलही होत गेला. तत्कालीन जिल्हाप्रमुख शिवाजीराजे धुमाळ यांच्यासह तेथील कडव्या शिवसैनिकांनी त्याकाळी खेडोपाडी जावून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार रुजवल्याने या मतदारसंघात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आजही आहे. त्याची प्रचिती दोनवेळा अनुभवायलाही मिळाली आहे. 2009 साली मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर अकोल्यात झालेल्या बहुरंगी लढतीत निवृत्त पोलीस अधिक्षक मधुकर तळपाडे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी करताना 50 हजार 964 मते मिळवली होती. त्यावेळी मधुकर पिचड यांच्याकडून त्यांचा अवघ्या 9079 मतांनी पराभव झाला. तर, 2014 साली वैभव पिचड यांच्या विरोधात पुन्हा रिंगणात उतरलेल्या तळपाडे यांना 47 हजार 634 मतं मिळाली. यावेळी मात्र त्यांच्या पराभवाचे अंतर दुप्पट होवून मतांची टक्केवारीही 37 वरुन 30 टक्क्यांवर आली.


मागील विधानसभा निवडणुकीतही त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यावेळी हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला असल्याने त्यांना यश आले नाही. गेल्यावेळी अकोल्यात चौरंगी लढत झाली, त्यात पिचडांच्या भाजप प्रवेशाने दुखावलेल्या डॉ.किरण लहामटे यांनी पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्या निवडणुकीत अकोलेकरांनी वैभव पिचड यांना साफ नाकारतांना डॉ.लहामटे यांना 1 लाख 13 हजार 414 मतं दिली. त्यामुळे पिचडांचा तब्बल 57 हजार 689 मतांनी दारुण पराभव झाला. त्यावेळी राज्यातील मतदारांनी भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत दिले. मात्र मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात रुसवा झाल्याने तीन दशकांची युती तुटली आणि राज्यात काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी अशी अशक्य वाटणारी आघाडी जन्माला येवून त्यांची सत्तास्थापना झाली.


मिळालेल्या संधीचा फायदा घेत डॉ.लहामटे यांनी मतदार संघाच्या विकासावर लक्ष केंद्रीत करुन भरीव निधी मिळवला. गाववाड्यांवर जाण्यासाठी रस्ते तयार करण्यासह पाणी, पर्यटन आणि रोजगार या विषयातही त्यांनी लक्ष घातले. राष्ट्रवादीच्या फूटीनंतर काहीकाळ ते कोणत्या दिशेला जावं यावरुन संभ्रमातही होते. मात्र सरतेशेवटी त्यांनी विकास करायचा असेल तर सत्ताधारी गट महत्त्वाचा मानून अजित पवारांना साथ दिली. गेल्या पाच वर्षात त्यांनी वाढवलेला जनसंपर्क आणि वाड्या-वस्त्यांपर्यंत केलेली कामं पाहता आजच्या स्थितीत त्यांचे पारडे खूप जड आहे. त्यामुळे साहजिकच त्यांच्यासमोर आघाडीला तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे. अशा स्थितीत दिवंगत नेते अशोक भांगरे यांच्या पत्नी सुनिता अथवा त्यांचे सुपूत्र अमित भांगरे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जवळजवळ उमेदवारी निश्‍चित मानली जात होती.


गेल्या आठवड्यात कोतुळमध्ये आलेल्या खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानेही या चर्चांना बळ मिळाले होते. मात्र त्यानंतर दुसर्‍याच दिवशी ज्येष्ठनेते मधुकर पिचड यांनी आपले सुपूत्र वैभव यांच्यासह मुंबईत जावून शरद पवारांची भेट घेतल्याने अकोल्याचे राजकारण ढवळून निघाले. त्यातून वेगवेगळ्या चर्चेचे धुमारे उसळत असतानाच अकोल्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आला आहे. आता 2009 आणि 2014 अशा सलग दोनवेळा पिचड पिता-पूत्रांसमोर दंड थोपटून संयुक्त शिवसेनेच्या तिकिटावर त्यांना कडवी झूंज देणार्‍या निवृत्त पोलीस अधिक्षक मधुकर तळपाडे यांचे नावही चर्चेत आले आहे.


त्याचे कारणही तसेच आहे. सद्यस्थितीत ठाकरेगटात असलेल्या तळपाडे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची खासगीत भेट घेवून त्यांच्याशी ‘गुप्तगू’ केली. दोघांमध्ये नेमकं काय आणि कोणत्या विषयावर बोलणं झाले हे गुलदस्त्यात असलं तरीही त्यांची ही भेट आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठीच असल्याचे मात्र स्पष्ट संकेत आहेत. तळपाडे-पाटील यांच्या भेटीचे वृत्त अकोल्यात धडकताच उमेदवारी निश्‍चित मानणार्‍या भांगरे मायलेकाने लागलीच मुंबई जवळ करुन पवारांना साकडे घातले. मात्र त्यांनी ‘योग्य निर्णय घेवू’ या एकाच शब्दात उत्तर दिल्याने तळपाडेंच्या प्रदेशाध्यक्षांशी झालेल्या चर्चेने पवारही अकोल्याबाबत संभ्रमात असल्याचे दिसून आले.


मधुकर तळपाडे सद्यस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी तळपाडे यांना कोणताही शब्द दिला नाही. मात्र महाविकास आघाडीने भाजपला हरवण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी ठेवल्याने शरद पवार अकोल्याची जागा शिवसेनेला देवून तळपाडेंना रिंगणात उतरवतात की ठाकरेंच्या अनुमतीने त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देवून उमेदवारी जाहीर करतात याकडे संपूर्ण अकोले मतदार संघाचे लक्ष लागले आहे.


असं म्हणतात की, गेल्या विधानसभेला भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल होताच डॉ.किरण लहामटे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. त्यामुळे त्यावेळी राष्ट्रवादीकडून दावेदार असलेले दिवंगत अशोक भांगरे नाराज झाले होते. त्यांची नाराजी लहामटेंना त्रासदायक ठरेल याची खात्री असल्याने त्यावेळी पवारांनी ‘पुढची टर्म तुमची’ असा शब्द दिल्याचीही जोरदार चर्चा झाली होती. तसे असेल तर, राजकीय धुरंधर मानल्या जाणार्‍या शरद पवारांनी यावेळी अकोले मतदार संघावरचा हक्कच सोडून तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिला तरीही आश्‍चर्य निर्माण होणार नाही.

Visits: 59 Today: 1 Total: 82267

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *