‘पवार’ काका-पुतण्याच्या भांडणात ‘पिचड’ पिता-पुत्राची गोची! दोघेही अडकले चक्रव्यूहात; कोणता झेंडा हाती घ्यावा अशी द्विधास्थिती..
श्याम तिवारी, संगमनेर
कधीकाळी मुंबईतून निघणार्या एका डरकाळीचा अवघ्या हिंदूस्थानात कंप जाणवायचा. मात्र तो काळ संपला आणि राज्याच्या राजकारणाने अगदीच शेवटची पातळी गाठली. सत्तेच्या लालसेने आणि कारवाईच्या भीतीने मोठ्या प्रमाणात पक्षांतर घडण्यासह शिवसेनेसारखा बुलंदीवर असलेला पक्ष एका रात्रीत फूटला. त्यातून उठलेला धुरळा बसण्यापूर्वीच देशाच्या राजकारणातील चाणक्य मानल्या गेलेल्या शरद पवारांना त्यांनीच स्थापन केलेल्या पक्षापासून वंचित व्हावे लागले. यासर्व पार्श्वभूमीवर पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात मोठे यश मिळाले. त्यामुळे बॅकफूटवर गेलेल्या सत्ताधारी गटात गेलेल्यांची आता घरवापसीसाठी धडपड सुरु झाली आहे. माजीमंत्री मधुकर पिचड यांनी बुधवारी आपल्या सुपूत्रासह केलेली मुंबई वारी त्याचे बोलके उदाहरण आहे. मात्र त्याचवेळी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची कोतुळमधील अमित भांगरेंच्या कार्यक्रमात उपस्थिती त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करणारी ठरली आहे. अशा स्थितीत पिचडांसमोर राजकीय पर्यायच नसल्याने काका-पुतण्याच्या भांडणात पिचड पिता-पुत्राची मात्र गोची झाल्याचे चित्र अकोले मतदार संघात दिसत आहे.
राज्यासाठी मागील पाच वर्षांचा काळ मोठ्या राजकीय उलथापालथ घडवणारा ठरला. एकत्रित निवडणूका लढवून बहुमत मिळाल्यानंतरही बंद दाराआड दिलेला ‘शब्द’ पुढे करुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत असलेला अडीच दशकांचा राजकीय संसार मोडला. त्यातून राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचा जन्म झाला. त्यामुळे 105 जागा मिळवून राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरुनही भाजपला विरोधी बाकांवर बसावे लागले. तत्पूर्वी 2014 ते 2019 या काळात भाजपने महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात काँग्रेससह विविध प्रादेशिक पक्षातील नेत्यांना सत्तेचे आमिष किंवा यंत्रणांची भीती दाखवित गळाला लावून पक्षविस्ताराला सुरुवात केली.
गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अशाच पद्धतीने भाजपवासी झालेल्यांमध्ये अकोल्याचे ज्येष्ठनेते, माजीमंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे सुपूत्र वैभव एक होते. पिचडांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याने त्यावेळी नाराज झालेल्या डॉ.किरण लहामटे यांनी पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला. पक्षानेही त्यांना पिचडांच्या विरोधात तिकिटं देत शरद पवार, अजित पवार यांच्या सभा लावून राजकीय बळ दिले. त्यावेळी शरद पवारांच्या अकोल्यातील सभेला मिळालेला प्रतिसाद पाहता तेव्हाच पिचडांचा पराभव दृष्टीस पडत होता. तेव्हापासूनच भाजपमध्ये त्यांची घुसमट सुरु झालेली असताना राज्यात शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीच्या एकसंघतेलाही अजित पवारांच्या रुपाने सुरुंग लागला आणि या पक्षाच्या संस्थापकांनाच त्यांच्या पक्षापासून वेगळे व्हावे लागले. राज्यातील या राजकीय घडामोडीचा थेट परिणाम अकोल्यातील राजकीय स्थितीवर झाला असून आजच्या स्थितीत पिचड पिता-पूत्र राजकीय चक्रव्यूहात अडकले आहेत.
आघाडी व महायुतीच्या सूत्रानुसार सद्यस्थितीत ज्या मतदार संघात ज्याचे नेतृत्त्व आहे, ती जागा त्याच पक्षाच्या वाट्याला जाणार आहे. त्यानंतर शिल्लक राहणार्या उर्वरीत जागांसाठीच वाटाघाटी होतील. त्यानुसार अकोल्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे असलेले डॉ.किरण लहामटे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे महायुतीच्या दृष्टीने ही जागा आपोआपच राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली आहे. आघाडीचा विचार करता लहामटे संयुक्त राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले असल्याने विरोधकांकडून या जागेवर शरद पवार गटाचा हक्क आहे. त्यासाठी दिवंगत नेते अशोक भांगरे यांचे सुपूत्र अमित भांगरे गेल्या वर्षांपासून परिश्रम घेत आहेत. या दरम्यान त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना दस्तूरखुद्द शरद पवारांनीही विशेष उपस्थिती लावली आहे. त्यामुळे अकोले विधानसभा मतदार संघात लहामटे विरुद्ध भांगरे अशीच लढत होणार असे कयास लावले जात आहेत.
माजीमंत्री मधुकर पिचड यांना आपले सुपूत्र वैभव यांच्या माध्यमातून राजकीय पुनरागमन करायचे ठरल्यास त्यांच्यासमोर काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उबाठा) असे तीन पर्याय आहेत. मात्र राज्यात हे तीनही पक्ष एकत्रित असल्याने व त्यातच अकोले मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याचा असल्याने यातील कोणत्याही पक्षात जावूनही त्यांना तिकिटं मिळण्याची शक्यता फारच विरळ आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मिळालेली नगण्य मतं पाहता विधानसभेपूर्वी त्यांचा गट महायुतीच्या बाहेर पडेल असा काहींचा अंदाज होता. मात्र बुधवारपासून राज्याच्या दौर्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांशी जागा वाटपावर चर्चा करताना राज्यात भाजप 150 ते 160 जागा लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यावरुन भाजप किमान 155 जागा लढवणार असे गृहीत धरल्यास मागे 133 जागा शिल्लक राहातात. पक्ष फूटीनंतर शिंदे आणि पवार यांच्या सोबत आलेल्या आमदारांची एकूण संख्या 90 आहे. त्यातील सर्व विद्यमान आमदारांना उमेदवारी दिल्यानंतरही 43 जागा शिल्लक राहातात. त्यावरच पुढील वाटाघाटी होणार असल्याने एकप्रकारे महायुतीकडून अकोले मतदार संघाच्या जागेचा फैसला झाला आहे. तर, दुसरीकडे गेल्या मोठ्या कालावधीपासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी सलगी करुन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सतत चर्चेत असलेल्या अमित भांगरे यांना पाठबळ देण्यासाठी यापूर्वी खूद्द शरद पवार आणि आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही अकोल्यात येवून गेल्याने पवारांच्या राष्ट्रवादीकडून भांगरेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे जवळजवळ निश्चित मानले जात आहे.
यासर्व पार्श्वभूमीवर ज्येष्ठनेते मधुकर पिचड यांनी बुधवारी (ता.25) आपले सुपूत्र, माजी आमदार वैभव पिचड यांच्यासह मुंबईतील सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्यातील माध्यमांनी त्यांच्या घरवापसीची आवई उठवली आहे. मात्र गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत राज्यातील दोन पक्षांच्या फूटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय चक्रव्यूहात अनेकांसह जिल्ह्यातील दिग्गज नेते, माजीमंत्री आणि राष्ट्रवादीच्या संस्थापकांमधील एक असलेले मधुकर पिचडही अडकले आहेत याकडे मात्र कोणाचेही लक्ष गेले नाही. आपला प्रदीर्घ राजकीय अनुभव वापरुन मधुकर पिचड हा चक्रव्यूह कशाप्रकारे भेदतात की त्यात अडकून आपल्या राजकीय महत्त्वकांक्षावर तुळशीपत्र ठेवतात हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
कधीकाळी पिचडांचा बालेकिल्ला..
अतिशय दुर्गमभागात पसरलेल्या अकोले मतदार संघात 1978 पासून आजवर झालेल्या दहा विधानसभा निवडणुकांमध्ये सातवेळा मधुकर पिचड व आठव्यांदा 2014 साली त्यांचे सुपूत्र वैभव पिचड निवडून आले आहेत. 1978 सालच्या निवडणुकीत अमित भांगरे यांचे आजोबा यशवंत भांगरे यांनी जनता पार्टीच्या एकनाथ देशमुख यांचा 11 हजार 918 मतांनी पराभव केला होता. बहुरंगी ठरलेल्या त्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसकडून लढणार्या मधुकर पिचड यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. मात्र त्यानंतर अवघ्या दोन वर्षांनी 1980 साली झालेल्या निवडणुकीत मधुकर पिचड यांनी तब्बल 44.7 टक्के मते मिळवताना कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (एम) सक्रू मेंगाळ यांचा पराभव करीत विधानसभा गाठली तेव्हापासून 2019 पर्यंत अकोल्याचे नेतृत्त्व त्यांच्याकडे होते. त्यावेळी काँग्रेस (यू) कडून निवडणूक लढवणार्या यशवंत भांगरे यांना अवघी 18.7 टक्के मतं मिळाली होती.
अशोक भांगरेंना दोनवेळा हुलकावणी..
अमित भांगरे यांचे वडिल दिवंगत नेते अशोक भांगरे यांनी 1990 ते 2014 अशी सलग सहावेळा मधुकर पिचड यांना थेट लढत दिली. 1990 मध्ये जनता दलाकडून लढताना त्यांना 34.4 टक्के मिळून 22 हजार 907 मतांनी त्यांचा पराभव झाला. 1995 साली अपक्ष असताना 31.6 टक्के मतांसह 33 हजार 32 मतांनी, 1999 साली राष्ट्रवादीच्या जन्मानंतर काँग्रेसकडून लढतांना विजयाने त्यांना अवघ्या 2 हजार 310 मतांनी हुलकावणी दिली. तर, त्यानंतर 2004 साली झालेल्या निवडणुकीतही शिवसेनेकडून उमेदवारी करताना त्यांचा अवघ्या 4 हजार 920 मतांनी पराभव झाला. 2009 मध्ये पुन्हा अपक्ष आणि 2014 मध्ये भाजपकडून लढताना मात्र त्यांना मिळणार्या मतांमध्ये मोठी तफावत झाली. 2019 च्या निवडणुकीपूर्वी ज्येष्ठनेते शरद पवार यांनी त्यांना पुढच्या वेळचा ‘शब्द’ दिल्याने त्यावेळी ते डॉ.किरण लहामटे यांच्या पाठीशी उभे राहिले, त्यामुळेच वैभव पिचड यांचा पराभव झाला.
आदिवासी बहुल असलेल्या अकोले मतदार संघातील दहामधील अवघ्या दोन निवडणुकांमध्ये मधुकर पिचडांना पराभव पहावा लागला. 1978 मध्ये यशवंत भांगरे यांच्याकडून त्यांचा तर, 2019 मध्ये डॉ.किरण लहामटे यांच्याकडून त्यांचे सुपूत्र वैभव यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पिचड राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहिले. मात्र 2019 च्या विधानसभेपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यावेळी त्यांचे सुपूत्र वैभव पिचड यांचाही पराभव झाला. नंतरच्या कालावधीत राष्ट्रवादीचे दोन भाग होवून अजित पवार महायुतीत सामील झाल्याने अकोले मतदार संघ त्यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी गेल्यावेळी लहामटेंसाठी भांगरेंना शब्द देवून थांबवल्याने त्याची पूर्तता यावेळी केली जाण्याची शक्यता आहे. अशास्थितीत पिचड पिता-पुत्रासमोर पक्षातच थांबावे की अन्य कोणता झेंडा हाती घ्यावा अशी द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे.
मागील निवडणुकीपूर्वी पिचडांच्या पक्षांतराने अकोल्यात ‘पेच’ निर्माण झाल्यानंतर शरद पवार यांनी डॉ.किरण लहामटे यांना उमेदवारी दिल्याने दिवंगत नेते अशोक भांगरे नाराज झाले होते. त्यांची नाराजी पक्षाच्या उमेदवारासाठी बाधक ठरेल या विचारातून खूद्द पवारांनी त्यांची मनधरणी करताना ‘पुढची टर्म तुमची..’ असा शब्द दिल्याची चर्चाही त्यावेळी रंगली होती. तसे असेल तर, गेल्या वर्षभरापासून अकोल्यात जय्यत तयारी करणार्या अमित भांगरे यांना शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे तिकिटं निश्चित मानले जात आहे. गुरुवारी शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने कोतुळमध्ये आलेल्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ.अमोल कोल्हे, नीलेश लंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासमोर भांगरे समर्थकांनी केलेली घोषणाबाजीही खूप सूचक आहे.