शहरातील रुग्ण संख्येतील घट आजही दिलासादायक..! मात्र ग्रामीणभागात संक्रमणाचा वेग काहीसा वाढल्याने रुग्णसंख्या किंचित फुगली..

नायक वृत्तसेवा संगमनेर

गेल्या आठवडाभरापासून कमी कमी होत चाललेल्या ग्रामीण रुग्णसंख्येत आज किंचित वाढ झाली आहे. मात्र ही वाढ एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त जणांना संक्रमण झाल्याने वाढल्याचे निरीक्षणही समोर आले आहे. आज बोटा समनापुर व आश्वी बुद्रुक या गावातून एकूण रुग्ण संख्येतील 12 रुग्ण समोर आले. खाजगी प्रयोगशाळा व रॅपिड  अँटीजेन  चाचणीच्या आज प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील अवघ्या तिघांसह तालुक्यातील एकूण 27 जणांना कोविडची बाधा झाली आहे. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या पुढे सरकताना 4 हजार 32 वर पोहोचली आहे.

ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून शहरवासीयांना दिलासा देणाऱ्या कोविडने नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी ग्रामीण क्षेत्रातील रुग्ण वाढीलाही मोठा ब्रेक लावला. त्यामुळे तालुक्यातील संक्रमण आटोक्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या बावीस दिवसांंत दररोज कमी-अधिक प्रमाणात रुग्ण समोर येत असले तरीही त्यांची संख्या एका मर्यादेत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील रुग्णवाढीला लागलेली ओहोटी संगमनेरकरांंना दिलासा देणारी ठरत आहे.

आज खासगी प्रयोगशाळेकडून नऊ जणांचे तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून 18 जणांचे स्राव चाचणी पॉझिटिव आली आहे. त्यात शहरातील पावबाकी रोड परिसरातील 57 वर्षीय इसमासह 24 वर्षीय तरुण व जनता नगर परिसरातील 58 वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यासोबत आज बोट्यातून पाच रुग्ण समोर आले असून त्यात एका तीन वर्षीय बालिकेसह 67, 65 व 49 वर्षीय महिला आणि 47 वर्षीय तरुणाचा समिवेश आहे. त्यासोबतच समनापुर येथून चार जणांचेही अहवाल संक्रमित आले असून त्यात 47 व 39 वर्षीय महिलेसह 23 व 20 वर्षीय तरुण,

आश्वी बुद्रुक येथील 52 वर्षीय इसमासह 42 वर्षीय महिला, 18 वर्षीय तरुणी, संगमनेर खुर्द येथील 12 वर्षीय दोन बालके, धांदरफळ बुद्रुक येथील 30 वर्षीय महिला, चिखली येथील 30 वर्षीय 30 वर्षीय महिलेसह पाच वर्षीय बालक, जोर्वे येथील 48 वर्षीय इसम, घुलेवाडी येथील 55 वर्षीय महिलेसह 39 वर्षीय तरुण, राजापूर येथील 64 वर्षीय जेष्ठ नागरिक, निमोण येथील 60 वर्षीय महिला, निमगाव टेंभी येथील 38 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी शिवारातील रहाणे मला परिसरातील 17 वर्षीय तरुण आदी 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. आजच्या रुग्ण वाढीने तालुक्यातील बाधितांची संख्या 4 हजार 32 वर पोहोचली आहे.

Visits: 110 Today: 5 Total: 1109854

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *