संगमनेरच्या सार्वजनिक उत्सवांवर चढतोय राजकीय रंग! मोठ्या उत्सवांवर नेत्यांची पकड; परंपरेला बाधा उत्पन्न होण्याचीही शक्यता..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
विविध सण-उत्सवांची परंपरा लाभलेल्या संगमनेरातील बहुतेक सार्वजनिक उत्सवांवर राजकीय तर काहींवर खासगी पकड निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ज्या उत्सवावर आपली पकड निर्माण होवू शकत नाही, अशा उत्सवांचे महत्त्व कमी करण्यासाठी त्यांचे विकेंद्रीकरण करण्याचेही प्रकार वाढीस लागले आहेत. त्यातून कधीकाळी संपूर्ण शहराच्या एकीचे प्रतीक ठरणारे गाव उत्सव संकुचित होत असून या माध्यमातून सर्वसामान्य माणूस मात्र त्यापासून दुरावत चालला आहे. मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेल्या संगमनेरच्या सामाजिक स्वास्थासाठी हा प्रकार पोषक नसून सार्वजनिक उत्सवांचे होत असलेले राजकीय व खासगीकरण वेळीच थोपविण्याची गरज निर्माण झाली आहे, अन्यथा भविष्यात गावचा वारसा सांगणारे हे उत्सव इतिहासाच्या पानात दडून जाण्याचीही भीती निर्माण झाली आहे.

ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक अशा सगळ्याच क्षेत्रात संगमनेर आघाडीवर आहे. इतिहासात डोकावतांना अगदी कसबा पेठेतील देवीच्या उत्सवापासून ते पालिकेच्या प्रांगणातील ग्रामदैवत लक्ष्मणबाबांच्या यात्रौत्सवापर्यंत विविध गावउत्सवांच्या कथा आणि दंतकथा आजही ऐकल्या व सांगितल्या जातात. मात्र मागील काही वर्षात या उत्सवांमध्ये सहभागी होणार्‍यांमधील प्रत्येकाची महत्त्वकांक्षा वाढल्याने त्यातून राजकारणाचा जन्म झाला. त्यामुळे शहरातील अपवाद वगळता उर्वरीत सर्वच गाव उत्सवांचे भवितव्य राजकीय अथवा खासगी व्यक्तिंच्या दावणीला बांधले जात असून शहराच्या परंपरेसाठी आणि पर्यायाने सामाजिक स्वास्थासाठी ते नक्कीच पोषक नाही.

गावपातळीवर साजर्‍या होणार्‍या शहरातील प्रमुख उत्सवांमध्ये नवरात्रौत्सवातील कसबापेठेतील देवीचा उत्सव, रंगारगल्लीतून वाजतगाजत नेली जाणार माळ, श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने निघणारा रथोत्सव, पारंपरिक पद्धतीने तीथीनुसार साजरी होणारी छत्रपती शिवरायांची जयंती, होलमराजाचे प्रतिक असलेल्या मानाच्या काठीचा माघी उत्सव, श्रीराम नवमी उत्सव, पालिका प्रांगणातील लक्ष्मणबाबांची यात्रा वाणगी दाखल विचारात घेता येतील. संगमनेरच्या सप्तश्रृंगी देवीचे मंदिर अतिशय पुरातन समजले जाते. राष्ट्रमाता जिजाऊसाहेब, मराठा सरदार महादजी शिंदे यांच्या पत्नी भवानीबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अशा इतिहासातील अनेक विभूतींनी येथील देवीच्या मंदिरात येवून सप्तश्रृंगी मातेचा जागर केला आहे. गावची देवी म्हणून दरवर्षीच्या नवरात्रीत येथे गावाच्यावतीने मोठा उत्सव होत, मात्र ही परंपरा आता मागे पडली असून कसबापेठेतील ठराविक मंडळींनी तयार केलेल्या विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून आता हा उत्सव साजरा होतो. त्यामुळे पूर्वीचे त्याचे व्यापक स्वरुप आता संकुचित झाले आहे.

या उत्सवादरम्यान नऊ दिवस रंगारगल्लीतून वाजतगाजत माळ नेवून ती देवीला अर्पण करण्याची गेल्या सात-आठ दशकांची परंपरा आहे. ही परंपरा सुरु होण्यामागची कथा आणि माणसंही वेगळी आहेत. आजच्या स्थितीत मात्र या परंपरेला केवळ रंगारगल्ली मंडळाचे कार्यकर्ते वाहत असून या उत्सवातील गावपण हरविले आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी निघणार्‍या रथोत्सवालाही खुप मोठा आणि पराक्रमी इतिहास आहे. सशस्त्र ब्रिटीश पोलिसांशी लढणार्‍या संगमनेरी महिलांनी 1929 साली घडविलेल्या इतिहासातून संपूर्ण देशातील महिलांना आजही प्रेरणा मिळते. मात्र कालानुरुपे हा उत्सवही आता संकुचित होत आहे. चंद्रशेखर चौकातील मारुतीरायाला शहराचे ग्रामदैवत समजले जाते, त्यामुळे साहजिकच तेथील उत्सव गावचाच असायचा. मात्र आता या उत्सवाच्या संकुचीकरणासह यंदा त्याला राजकीय किनारही लाभणार असल्याने त्याचेही स्वरुप आता राजकीय झाले आहे.

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा वाद काही वर्षांपूर्वी राजकीय हेतूने मोठा केला गेला. तोपर्यंत राज्यात सर्वत्र तिथीनुसारच शिवरायांची जयंती साजरी केली जात होती. मात्र तिथीनुसार की तारखेनुसार या घोळात राज्यात दोन शिवजयंत्या साजर्‍या होवू लागल्या. परंतु शिवसेनेने पारंपरिक पद्धतीने छत्रपतींचा जन्मोत्सव साजरा करण्याची आपली परंपरा कायम राखल्याने आज राज्यात तारखेनुसार शासकीय तर तिथीनुसार शिवसेनेसह हिंदुत्त्ववाद्यांची शिवजयंती साजरी होते. काही वर्षांपूर्वी शिवजयंती उत्सव समितीची स्थापना होवून त्यात विविध राजकीय पक्षांच्या स्थानिक पुढार्‍यांना स्थान देण्यात आले. शिवजयंतीच्या दिनी मुख्य मिरवणूक वगळता उत्सव समितीकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन होते. यंदाच्या त्यांच्या कार्यक्रमात राजकीय व्यक्तिंचा समावेश आणि शिवसेनेच्या पारंपरिक मिरवणूकीत समितीचा वरचष्मा यातून हा उत्सवही राजकीय दिशेने झुकू लागला आहे.

तेलीखुंटावरील होलमराजाचा इतिहास अनेकांना आजही ज्ञात नाही. यथावकाश योग्यवेळी त्यावरही सविस्तर प्रकाश टाकला जाणार आहे. मात्र या उत्सवाचे तर चक्क खासगीकरण झाल्याने संगमनेरातील अनेक होलमभक्त त्यामुळे दुखावले गेले आहेत. जेजुरीत दरवर्षीच्या माघी उत्सवात होलमराजाच्या काठी-पटक्याला मोठा मान आहे. त्यासाठी यात्रेच्या सप्ताहाआधीच संगमनेरातून ही मानाची काठी वाजतगाजत जेजुरीकडे निघते. काठीच्या मार्गात व मुक्कामाच्या ठिकाणी यात्रा-जत्रांसह मोठे उत्सव साजरे होतात. संगमनेरकर होलमभक्त या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होतात. मात्र गेल्या काही वर्षात काहींनी ही विश्वस्त संस्थाच ताब्यात घेतल्याचे चित्र असून त्या माध्यमातून मोठी अनागोंदी सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या आहेत. त्यामुळे एकप्रकारे सद्यस्थितीत ही परंपराही खासगी झाल्याचे दिसू लागले आहे.

पालिकेच्या प्रांगणातील लक्ष्मणबाबांना संगमनेरचे ग्रामदैवत मानले जाते. दरवर्षी अक्षय्यतृतीयेला येथे मोठी यात्राही भरते. पूर्वी या यात्रौत्सवासाठी गावची कमिटी तयार केली जात व त्या माध्यमातून उत्सवाचे स्वरुप तयार करुन यात्रेचे आयोजन होत. मात्र जसजसा काळ लोटत गेला, तसतसे या उत्सवालाही एकाच भागाची मर्यादा पडली. यामागील कारणे वेगळी असली तरीही कधीकाळी गावचा उत्सव म्हणून या यात्रेत असणारा सार्वजनिक सहभाग आज केवळ माळीवाड्यापुरताच मर्यादीत राहीला आहे. त्यामुळे हा उत्सवही संकुचित होत गला आहे. नुकत्याच झालेल्या श्रीराम नवमी उत्सवातही याच गोष्टींचे दर्शन घडले. गेल्या दीड दशकांपासून संगमनेरात श्रीराम नवमीच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद व त्या संलग्न संघटना शोभायात्रा काढतात. या यात्रेत शहरातील विविध हिंदुत्त्ववादी संघटनांचे कार्यकर्ते व रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात. दिवसोंदिवस वाढत चाललेल्या या उत्सवाचे महत्त्व कमी करण्याचेही प्रयत्न गेल्याकाही वर्षात समोर येत असून त्यासाठी विविध कार्यक्रमांचेच विक्रेंद्रीकरण करण्याचा घाट घातला जात असल्याचेही यावेळी प्रकर्षाने समोर आले आहे. याशिवाय अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांना आता राजकारणाचे ग्रहण लागले आहे.

कोणत्याही सार्वजनिक उत्सवात राजकीय हस्तक्षेप अथवा सहभाग वाढला की सामान्य माणसं त्यापासून दुरावली जातात. शहरातील काही उत्सवांची स्थितीही अशीच झाली असून कधीकाळी गावाचे स्वरुप असलेले हे उत्सव आज एखाद्या चौकाचे अथवा संघटनांचे समजले जावू लागले आहेत. अनेक दशकांची परंपरा लाभलेले असे उत्सव भविष्यात निरंतर साजरे होण्यासाठी अशा उत्सवांच्या आयोजनात शिरु पाहणारे राजकारण अथवा व्यक्तिगत महत्त्वकांक्षा वेळीच ओळखून त्या दूर सारण्याची गरज आहे. सार्वजनिक प्रयोजनात शिरलेल्या अशा गोष्टींमुळे उत्सवांच्या परंपरेलाच बाधा निर्माण होण्याची शक्यता़ नाकारता येणार नाही.संगमनेरकर म्हणून प्रत्येकाने याचा गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.

Visits: 43 Today: 2 Total: 115869

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *