‘व्हॉट्सअॅप’ने घडविले तरुणांच्या दोन गटांत जीवघेणे हल्ले!
‘व्हॉट्सअॅप’ने घडविले तरुणांच्या दोन गटांत जीवघेणे हल्ले!
दोन्ही बाजूने तक्रारी झाल्याने पोलिसांनी केले दहा जणांवर गुन्हे दाखल
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सामाजिक माध्यमातून एकमेकांवर चिखलफेक करणारे संदेश प्रसारित केल्याच्या कारणावरुन शहरातील तरुणांच्या दोन गटात बुधवारी रात्री फ्री-स्टाईल झाली. या वादाची पार्श्वभूमी वेगळी असली तरीही दोन्ही बाजूने एकमेकांची जिरवण्यासाठी प्राणघातक शस्त्रांचा वापर झाल्याने शहर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या प्रत्येकी पाच जणांवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर शहरात विविध चर्चांना उधाण आले असून पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी (ता.21) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी अमित रहातेकर, धिरज रहातेकर (दोघेही रा.इंदिरानगर), सूरज गाडे व इतर दोघे अशा पाच जणांनी योगेश सोमनाथ पोगुल (रा.इंदिरानगर) याने त्याच्या मोबाईलवरुन समाज माध्यमात वादग्रस्त स्टेटस् ठेवल्याने त्याचा जाब विचारीत यातील आरोपी नंबर एक याने रसाळ हॉस्पिटलजवळ त्याच्या हातातील लाकडी दांड्याने फिर्यादीच्या डोक्यावर व चेहर्यावर घाव घालून त्याला जखमी केले. यावेळी त्याच्या बचावासाठी आलेल्या अन्य लोकांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत दमदाटी व शिवीगाळ केल्याचा आरोप ठेवण्यात आला. यातील जखमींवर शहरातील कुटे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर अमित सुरेश रहातेकर याने दिलेल्या फिर्यादीतही समाज माध्यमातील स्टेटस्वर ठेवलेल्या वादग्रस्त मजकुरावरुन संशययित आरोपी योगेश पोगुल, कल्पेश पोगुल, सोनू गोफणे, पोगुल याची आई व पत्नी यांनी लाकडी दांडक्याने डोक्यात व चेहर्यावर प्रहार करीत सोडवण्यासाठी मधे पडलेल्या अन्य लोकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत दमदाटी व शिवीगाळ केल्याचे म्हंटले आहे. यातील जखमींवर शहरातील तांबे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोन्ही गटाच्या परस्पर विरोधी तक्रारीवरुन शहर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या प्रत्येकी पाच जणांवर भारतीय दंड संहितेचे कलम 324, 323, 143, 149, 148, 504 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही.
मोठ्या कालावधीनंतर संगमनेर शहरात दोन गटांमध्ये धुमश्चक्री उडाल्याचे समोर आले आहे. अर्थात यामागे मोबाईलवरील समाज माध्यमातील मजकूर कारणीभूत असल्याचे सांगितले जात असले तरीही खरा वाद नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी काढण्यात आलेल्या देवीच्या माळेवरुन झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे दोन गटांना एकमेकांच्या समोर उभे करणार्या समाज माध्यमातील ‘त्या’ वादग्रस्त संदेशचा आशयही भलत्याविषयी होता, मात्र तो ओढून घेण्यात आल्याने बुधवारी एकमेकांवर जीवघेणा हल्ला झाल्याचेही बोलले जात आहे.
‘व्हॉट्सअॅप’च्या संदेशावरुन मोठ्या कालावधीनंतर शहरातील तरुणांचे दोन गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. मात्र त्यामागील पार्श्वभूमी वेगळीच असल्याची चर्चा आहे. यातील पहिल्या फिर्यादीने नवरात्रौत्सवात निघणार्या माळीच्या मिरवणुकीच्या निमित्ताने घडलेल्या घटनेवरुन आपल्या ‘स्टेटस्’वर वादग्रस्त संदेश टाकला होता, त्यावरुन दुसर्या गटाशी त्याचे मेाबाईल वॉर सुरू झाले व एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान देत दोन्ही बाजूने लाकडी दांड्याचा वापर करुन एकमेकांना रक्तबंबाळ केले गेले. विशेष म्हणजे रात्री नऊच्या सुमारास घडलेल्या या प्रकरणाची तक्रार आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास दाखल झाली, तेव्हाही पोलीस ठाण्यात मोठा गदारोळ उडाल्याची मोठी चर्चा आहे.