शिर्डीच्या शिवसेना खासदारांसह पत्नी व मुलाला कोरोनाची लागण
शिर्डीच्या शिवसेना खासदारांसह पत्नी व मुलाला कोरोनाची लागण
उपचारार्थ मुंबईला हलविले; संपर्कातील आणखी दोघेही पॉझिटिव्ह
नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह त्यांची पत्नी व मुलालाही कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांना उपचारार्थ मुंबईला हलविण्यात आले आहे.
खासदार सदाशिव लोखंडे श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव येथे वास्तव्यास आहे. त्यांच्या वाहनचालकाला त्रास जाणवू लागल्याने त्याची कोरोनाची चाचणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं. त्यानंतर लोखंडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची आणि चालकाच्या संपर्कात आलेल्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यावेळी लोखंडे, त्यांची पत्नी आणि मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच लोखंडे यांच्या संपर्कातील आणखी दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून पुढील उपचारार्थ त्यांना मुंबईला नेले आहे. दरम्यान, लोखंडे गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात दौरे करीत होते. अलीकडेच श्रीरामपूर शहरातील एका मोठ्या कार्यक्रमातही ते इतर नेत्यांसमवेत उपस्थित होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांना आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावरही मुंबईत उपचार करण्यात आले. ते आता ठणठणीत होऊन पुन्हा कामालाही लागले आहेत. तर, शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलाचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वी आमदार प्रकाश आवाडे, ऋतुराज पाटील व चंद्रकांत जाधव यांना कोरोनाची लागण झाली आहे. या तिघांवरही सध्या उपचार सुरू आहेत. त्यातच आता मंडलिक यांना करोनाने गाठले आहे.