निमोणमध्ये घरात घुसून चौघांकडून तरुणाला मारहाण कुटुंब संपविण्याचीही धमकी; संगमनेर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील निमोण येथे चौघांनी एका तरुणास घरात घुसून मारहाण केली. तसेच वाद सोडविण्यास आलेल्या आई व भाऊ यांनाही धक्काबुक्की केल्याची घटना शुक्रवारी (ता.29) सकाळी 6 वाजता घडली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, निमोण येथील सागर निवृत्ती घुगे या तरुणाच्या घरात भाऊसाहेब बाळनाथ घुगे, मनोहर बाळनाथ घुगे, नितीन भाऊसाहेब घुगे व नीलेश मनोहर घुगे यांनी अनाधिकाराने प्रवेश करुन ‘तू कोर्टातून कसा काय सुटला? तुला जामीन कोणी दिला?’ असे विचारुन शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याशिवाय तुझा काटा काटा काढतो असा दम देवून वाद सोडविण्यास आलेल्या आई मीराबाई व भाऊ तुषार घुगे यांनाही धक्काबुक्की करुन आमच्या नादी लागला तर तुमचं आख्ख कुटुंब संपवून टाकू त्यासाठी 50 लाख रुपये लागले तरी चालेल पण तुमचा काटाच काढू, अशी धमकी दिली.

याबाबत सागर घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संगमनेर तालुका पोलिसांनी आरोपी भाऊसाहेब बाळनाथ घुगे, मनोहर बाळनाथ घुगे, नितीन भाऊसाहेब घुगे व नीलेश मनोहर घुगे या चौघांवर गुरनं. 415/2022 भादंवि कलम 452, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जाधव हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *