निळ्या भातशेतीचा प्रयोग शेतकर्यांसाठी दिशादर्शक ठरेल ः मुख्यमंत्री
निळ्या भातशेतीचा प्रयोग शेतकर्यांसाठी दिशादर्शक ठरेल ः मुख्यमंत्री
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील मेहेंदुरी येथील अनिता व विकास देवराम आरोटे या शेतकरी दाम्पत्याचा निळ्या भातशेतीचा अभिनव प्रयोग राज्यातील शेतकर्यांसाठी दिशादर्शक ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच काढले.
अनिता व विकास आरोटे या शेतकरी दाम्पत्याने इंडोनेशिया, आसाम व मेहेंदुरी असा प्रवास करणार्या निळ्या भाताची तीन किलो बियाण्यांपासून दहा एकर शेती फुलविली. या अभिनव प्रयोगाची कृषी विभागाने दखल घेऊन ‘विकेल ते पिकेल’ या योजनेत समावेश करण्यात आला. या योजनेत राज्यातील दहा शेतकर्यांच्या नाविन्यपूर्ण म्हणून समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा ऑनलाईन शुभारंभ गुरुवारी (ता.10) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दुपारी एक वाजता मुख्यमंत्र्यांसह कृषीमंत्री दादा भुसे यांनीही शेतकर्यांशी संवाद साधला. दरम्यान, या भात शेतीला आमदार डॉ.किरण लहामटे यांनी भेट देऊन आरोटे दाम्पत्याचे कौतुक केले आहे. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी शिवाजी जगताप, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, मंडलाधिकारी भाऊसाहेब बांबळे, राजाराम साबळे, हरीभाऊ जाधव, संतू वराडे व कृषी विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
मूळ इंडोनेशियाचा निळा भात व्यापार संबंधामुळे आसाम मध्ये आला. हा सटायव्हा जातीच्या उपजातीत मोडतो. याची साळ निळी -जांभळी व तांदूळ गर्द जांभळा असून शिजविल्यानंतर गर्द जांभळा होतो. यात फायबर, लोह, तांबे व नटी कसीडेंटचे प्रमाण जास्त असल्याने कॅन्सरवर गुणकारी, पोट साफ करणारा व रोग प्रतिकार शक्ती वाढविणारा असल्याची वैशिष्ट्ये आहेत.