वैभवशाली शहराला बेशिस्त वाहतूक व्यवस्थेचा कलंक! क्षणाक्षणाला होतोय खोळंबा; मात्र, पोलीस आणि पालीका आपल्याच धुंदीत मस्त..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अमृतवाहिनी प्रवरेच्या पाण्याने समृद्ध झालेल्या आणि जिल्ह्यात ‘वैभवशाली शहरा’ची टिमकी बडवणार्या संगमनेर शहराला लागलेला बेशिस्तीचा कलंक पुसता पुसण्याचे नाव घेईना. दूरदृष्टीच्या अभावातून बकाल पद्धतीने वाढलेले शहर, आधीच निमुळत्या असलेल्या रस्त्यांचे मालक बनलेले फेरीविक्रेते, त्यात बेकायदा रिक्षांची दाटी, वाहतूक नियमन करण्याचे सोडून केवळ दंड वसुलीतच धन्यता मानणारे पोलीस, पालिकेच्या मोकळ्या भूखंडांबाबतचे धोरण आणि पार्किंगचा अभाव अशा अनेक कारणांनी या ऐतिहासिक शहराच्या अंतर्गत व्यवस्थेला बट्टा लागला आहे. मात्र ज्यांनी आपल्या कर्तव्याला जागून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची गरज आहे, त्यांनाच या गोष्टींचे सोयरसुतक नसल्याने संगमनेरातील सामान्य पादचारी आणि दुचाकीस्वारांवर तोंड दाबून बुक्क्यांचा मारा सुरुच आहे.
अगदी प्रागैतिहासापासून आपले अस्तित्त्व सांगणार्या संगमनेर शहराला मोठा इतिहास आहे. रामायणकाळात प्रभु श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दंडकारण्यातील या भूप्रदेशातून अमृतवाहिनी खळाळत गोदामाईच्या भेटीला जात असल्याने या नदीच्या काठावरील जमीनी सुपिक बनल्या असून त्यांनी घराघरात समृद्धीची पावलं उमटवली आहेत. साहजिकच कष्टकरी, शेतकरी आणि त्यावर अवलंबून असलेल्यांच्या हाती पैसा आल्याने संगमनेरातील व्यापार उदीमाचीही भरभराट होवून येथील बाजारपेठ जिल्ह्यात समृद्ध बनली आहे. अलिकडच्या काळात याच समृद्धीने घराघरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचीही संख्या वाढवली. मात्र वाहनं खरेदी करताना घेणार्याने ती उभी करण्यासाठीही (पार्किंग) जागा लागते याचा विचारच केलेला नाही.
त्यातही कहर म्हणजे गेल्या चार दशकांत समृद्धीच्या माध्यमातून होत असलेला बदल विचारात घेता स्थानिक स्वराज्य संस्थेने शहरातंर्गत हद्दित आजूबाजूला वाढणार्या नवनवीन मानवी वस्त्यांची रचना करताना रस्त्यांचा विचारच केला नाही. परिणाम आज अगदी शहरालगत वाढलेल्या अशा वसाहतींमधील अंतर्गत रस्ते निमुळते झालेच शिवाय शहराला जोडणार्या रस्त्यांबाबतही असाच प्रकार घडल्याने आजच्या स्थितीत रस्त्यांमध्ये वाढलेल्या वाहनांना धारण करण्याची क्षमताच शिल्लक राहीली नाही. बाजारपेठेसारख्या अतिशय चिवळ रस्त्यावर राहणार्या व्यापार्यांकडे पैसा आला, त्यातून त्यांनी दुचाकी व नंतर चारचाकीही घेतल्या. पण त्या ठेवायच्या कोठे? याचा विचार करायलाच ही मंडळी विसरली. त्यामुळे अशा लोकांनी शासकीय अथवा खासगी मोकळ्या जागा, परिसरातील चौक, गल्ल्यांच्या बोळा अथवा भररस्त्याच्या कडेलाच आश्रय घेतलाय.
संगमनेरच्या वाहतूक व्यवस्थेची वाट लावणार्यांमध्ये बेसुमार अतिक्रमणं, फेरीविक्रेते आणि बेकायदा रिक्षांसह उभे राहिलेले असंख्य बेकायदा रिक्षाथांबे यांचे परिश्रम अधिक आहेत. फेरीकरुन कुटुंब पोसणार्यांची सोय व्हावी असे सर्वांचेच मत आहे, त्याला विरोध असण्याचे कारण नाही. पण म्हणून कोणी पोटं पुढे करुन रस्त्यावरच दुकान मांडून बसणार असेल तर त्याचे समर्थन कसे होवू शकेल?. अशा फेरीविक्रेत्यांसाठी सुस्पष्ट धोरणाची गरज असते. मात्र धोरण, नियोजन आणि व्यवस्थापन या गोष्टींचा आजवर पालिकेशी सामनाच झाला नसल्याने संगमनेरात फेरीवाला धोरणाची सूत्रे फेरीवाल्यांकडेच आहेत.
महानगरात नसतील इतके रिक्षाथांबे संगमनेर शहरात आहेत, त्याला कारणही तसेच आहे. कोणीही उठावं, इकडून तिकडून दहा-पंधरा हजारांचा जुगाड जमवावा आणि थेट पुणे, पिंपरी चिंचवड किंवा नाशकातील भंगाराच्या दुकानांमध्ये जावून, त्या शहरांमधून बाद ठरलेली प्रवाशी रिक्षा घ्यावी आणि संगमनेर शहरात येवून बिनधास्त कोणत्याही चौकात, गल्लीत अथवा भररस्त्यात ती उभी करुन प्रवाशी हुडकण्याचा धंदा सुरु करावा अशी या व्यवसायाची अवस्था आहे. दोन-चार वर्षांपूर्वी अतिशय गर्दीच्या अशोक चौकात अधिकृत नसतांनाही अनधिकृत रिक्षा घेवून दोघांनी महादेव मंदिरालगतची जागा बळकावली. अशीच स्थिती चावडी चौकातही घडली. सुरुवातीला दोघांनी सुरु केलेल्या या व्यवसाय केंद्रावर आज तेथील जागेच्या कित्येक पटीने अधिक रिक्षा उभ्या असतात. धक्कादायक म्हणजे यातील 90 टक्के रिक्षा बेकायदा असतात हे विशेष.
कोविडच्या काळात संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने काही उपनगर अथवा गल्ल्यांना मिळून एखाद्या चौकात अथवा मोकळ्या जागेत भाजीबाजारची परवानगी दिली. कोविड जावून आज चार वर्ष उलटली, मात्र त्यावेळी केवळ तात्पुूरती व्यवस्था म्हणून सुरु झालेले भाजीबाजार आजही तेथेच असून तेथील त्यांचा विस्तार चौपट वाढून त्याच भाजी व्यापार्यांच्या मुलाबाळांनी आसपासच्या गल्ल्यांमध्येही प्रवेश केले आहेत. या सगळ्या गोष्टी प्रचंड रहदारीच्या रस्त्यांसह सर्वच अंतर्गत रस्त्यांवर असल्याने शहराचा कोणताही भाग वाहतूकीच्या समस्येपासून मुक्त नाही.
आता विषय कर्तव्याचा. सामान्य करदात्यांना व प्रवाशांना त्रासदायक ठरतील अशाप्रकारचे अनधिकृत अडथळे व अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची असते. मात्र टेंडर आणि त्यातून मिळणारा चिक्कार पैसा या पलिकडे पाहण्यास त्यांना वेळच नाही. त्यामुळे बाजारपेठेतील जूना कटारिया कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, जोर्वेनाका, ज्ञानमाता विद्यालय ते सह्याद्री महाविद्यालय, गवंडीपूरा ते अकोले नाका, लखमीपूरा ते नगरपालिका, ईदगाह मैदानाचा परिसर, बी.एड् कॉलेज परिसर, वाघोलीकर हॉस्पिटल ते हॉटेल काश्मिर अशा सगळ्याच रस्त्यांचे नवे मालक जन्माला आले आहेत. रस्त्यावरुन जाणारा पादचारी, विद्यार्थी अथवा वयस्क त्यांच्या या बेशिस्तीमुळे जीवाने गेला तरी यांना काहीच घेणंदेणं नाही अशी एकंदरीत अवस्था निर्माण झाली आहे, यामागे पालिकेला कर्तव्याचा पडलेला विसर हे एकमेव कारण.
संगमनेर शहरातून पुणे-नाशिक हा राष्ट्रीय तर कोल्हार-घोटी हा राज्यमार्ग जातो. या दोन्ही महामार्गावर प्रचंड वाहतूक असते. अर्थात बाह्यवळण रस्त्यामुळे काही प्रमाणात फरक पडला असला तरीही तो नगन्य आहे. त्यामुळे दिवसभर या दोन्ही रस्त्यांसह शहरातंर्गत सगळेच रस्ते वाहनांच्या दाटीत हरवलेले असतात. त्यावरुन सुरळीत वाहतूक चालावी याची संपूर्ण जबाबदारी पोलिसांची आहे. मात्र जेव्हापासून वाहतूक शाखा बंद होवून कर्मचार्यांचे विलीनीकरण झाले तेव्हापासून शहर पोलिसांना वाहतूक सांभाळण्याचे काम आपलेच असते याचा विसर पडलेला आहे. शासकीय पगार खात्यात जमा झाल्यानंतर अचानक काही दिवस कर्तव्याला जाग येत असल्याने अधुनमधून वाहतूक पोलिसांकडून वाहन क्रमांकाची छायाचित्रे घेवून ‘शासकीय वसुली’ राबवली जाते. पण, ती देखील नियमित नसते. यातून संगमनेर शहराला कलंक लावणार्या या सगळ्या गोष्टी कधी व्यवस्थित होतील याची कोणतीही शाश्वती नसल्याचेच दिसून येत आहे.
हॉटेल काश्मिर समोर असलेला बहुसंख्य ‘बेकायदा’ रिक्षांचा ‘अनधिकृत’ रिक्षाथांबा संगमनेरच्या वाहतूक व्यवस्थेत सर्वात मोठी अडचण आहे. युवराजांच्या आशीर्वादाने अतिशय मुजोर बनलेल्या येथील या रिक्षाचालकांना आजवर कोणताही पोलीस अधिकारी तेथून हटवू शकला नाही. नियंत्रण कक्षात नितीन चव्हाण, नंदकुमार दुधाळ यांच्यासारखे खमके अधिकारी असतांनाही पोलीस अधिक्षकांनी पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना संगमनेरला धाडले. त्यावरुन महाजन काहीतरी करुन दाखवतील अशी पुसटशी आशा भाबड्या संगमनेरकरांच्या मनात निर्माण झाली आहे, ती किती सत्यात उतरते हे येत्या काही दिवासांतच स्पष्ट होईल.