संगमनेरातील जमीन घोटाळ्याची व्याप्ती अपार! बड्या माशांच्या नावाचीही चर्चा; सखोल चौकशीसह कारवाईची गरज..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आठ दशकांपासून पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या कूळावर अचानक मूळमालकाचे ‘भूत’ उभे राहीले आणि जमीनीचा ताबाच मागू लागले. त्यामुळे घाबरलेला शेतकरी सैरभैर झाला आणि मदतीच्या आशेने या कार्यालयातून त्या कार्यालयात धावू लागला. पण, शेवटी त्याच्या हाती निराशाच लागली. पर्यायच संपल्याने शेवटी त्याने टोकाचा निर्णय घेतला आणि आठशे वर्षांची गुलामी संपवून स्वातंत्र्य मिळवलेल्या देशातील एका सामान्य नागरिकाला आत्मदाह करण्याचा इशारा द्यावा लागला. त्यावर यंत्रणांनीही ‘असं करु नका, मार्ग काढू’ अशा आशयाचे सरकारी उत्तर देवून आपली हतबलता दर्शवली. मात्र दैनिक नायकने पीडित शेतकर्‍याची बाजू ठामपणे समोर आणली. या वृत्तानंतर संपूर्ण संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून असे अनेक प्रकार तालुक्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सर्रास घडल्याच्या आणि त्यात अनेक पांढरपेशांचा थेट संबंध असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.


संगमनेर खुर्दमधील अशोक नवले नावाच्या शेतकर्‍याने या संदर्भात स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्याच्याकडे कूळहक्काने आलेली जमीन असून अचानक साठेखताद्वारे त्याचे मालक झालेले दोघे त्याच्यासमोर अवतरले आणि जमीन खाली करण्यासाठी दबाव आणू लागले. त्यासाठी दमबाजी, स्वतःची उंची, रुबाब यांचाही जोरकसपणे वापर केला गेला. धमक्या देवून उध्वस्थ करण्याचे इशारेही दिले गेले. धमक्या भरताना मोठ्या नावांचा वापर केल्याने पीडित शेतकरी आधीच दबावात आला, त्यात मार्गातील कार्यालयेही ‘माग’च्या कारनाम्यांमूळे ‘हतबल’ असल्याने दाद देईनात म्हंटल्यावर हा सामान्य पूरता ढासळला होता. आता न्यायच मिळणार नसेल तर काय करणार? असा प्रश्‍न निर्माण होवून त्याने आपलं म्हणणं ऐकून घेण्यासाठी ‘आत्मदाह’ करण्याचा इशारा दिला.


यंत्रणा जागली, पण केवळ आश्‍वासनांचे पत्र देवून त्याची बोळवण करण्यापूरतीच. त्यामागे कारणंही खूप मोठे आहे. हा उद्योग एखाद् दुसर्‍या घटनेपर्यंत मर्यादीत नसून त्याची व्याप्ती संपूर्ण तालुक्यात आहे. अनेक गावांमध्ये अशाचप्रकारची उदाहरणे असल्याच्या चर्चा आता दैनिक नायकच्या मंगळवारच्या वृत्तानंतर समोर येवू लागल्या आहेत. त्याची सत्यता पडताळून यथावकाश त्या वाचकांच्या समोर  मांडण्याचा आमचा प्रयत्न असेलच. इतके मात्र खरे की, संगमनेर खुर्दच्या प्रकरणाने तालुक्यात गेल्या चार वर्षात घडलेला मोठा जमीन घोटाळा चर्चेत आणला आहे. शहर व तालुक्यातील काहींनी आपले पद आणि उंचीचा वापर करुन, प्रसंगी ‘काही’ नावांचा, त्यांच्या ‘संमती’ शिवाय परस्पर वापर करुन असे अनेक उद्योग केल्याचे आता बोलले जावू लागले आहे.


चलाखीचा वापर करुन वर्ग दोनच्या जमीनींचे करार, इतर हक्कात नोंदी आणि नंतर थेट जमीनीचे मालकच होण्याची ही साखळी खूप मोठी आहे. कूळ कायद्याने पूर्वापार चालत आलेल्या जमीनींचे मूळमालक अचानक जिवंत होत आहेत, त्यांची भूतं नोंदणी कार्यालयात जावून जमीनींचे व्यवहार करीत आहेत. आणि, त्यांच्याशी झालेल्या व्यवहारातून मालक झालेल्या कूळ मालकालाच टोकावर धरुन जमीन खाली करण्यास धमकावत आहेत. खरेतर हा प्रकार खूप गंभीर आणि दखलपात्र स्वरुपाचा आहे. या प्रकरणातील पीडित अशोक नवले या तरुण शेतकर्‍याने स्वातंत्र्यदिनी आत्मदाह करण्याच्या निवेदनात त्याच्यासोबत घडलेला आणि घडत असलेला प्रसंग इत्यंभूतपणे मांडला आहे. त्याच्या प्रति अगदी गृहमंत्रालयापासून पोलीस उपअधिक्षकांपर्यंत आणि महसूलमंत्र्यांपासून ते तहसीलदारांपर्यंत सर्वांना पाठवल्या आहेत.


त्याचे आत्मदाह करण्याचे निवेदन हिच त्याची फिर्याद मानून या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास संगमनेरात गेल्याकाही कालावधीत भरभराटीला आलेला हा ‘महाउद्योग’ उजेडात येवून अनेकांच्या चेहर्‍यावरील बुरखे फाटण्याची दाट शक्यता आहे. पीडित शेतकर्‍याने त्याला दमबाजी करणारे, धमक्या देणारे आणि साठेखत करुन मालक झालेल्या सर्वांचीच नावे आणि त्यांच्याकडून घडलेला प्रकार कथन केला आहे. मध्यंतरी धांदरफळ, गुंजाळवाडी आणि आता संगमनेर खुर्दसह कासारवाडी शिवारातील एका जमीनीबाबतही उलटसुलट चर्चा समोर येत आहेत. त्यामुळे संगमनेर खुर्दच्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतल्यास संगमनेर तालुक्यात सूप्तपणे घडलेला मोठा जमीन घोटाळा उघड होण्याची दाट शक्यता आहे.


संगमनेर तालुक्यात गेल्या काही वर्षात जमीनी लाटण्याच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ झाल्याचे बोलले जाते. वर्ग दोनच्या जमीनींचा व्यवहार होत नसल्याने मूळमालक उभा करुन त्याच्यासोबत 99 वर्षांचा करार केला जातो, त्यातून इतर हक्कात नावाची नोंद करुन नंतर साठेखतावर परस्पर व्यवहार आणि ताबा मिळवण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जातो. त्यासाठी काही ‘विशेष’ नावांचाही परस्पर वापर होतो, असे अनेक प्रकार तालुक्याच्या वेगवेगळ्या भागातून आता कानावर येवू लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाच्या माध्यमातून सखोल तपास करुन ‘सत्य’ समोर आणण्याची गरज आहे.   

Visits: 9 Today: 2 Total: 29786

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *