अत्याधुनिक सुविधांमधून संगमनेर ‘हायटेक’ होणार ः थोरात सीसीटीव्ही सुरक्षारक्षक प्रणाली व नियंत्रण कक्षाचे लोकार्पण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सततच्या पायाभूत विकासकामांमधून संगमनेर शहर हे राज्यात अग्रगण्य ठरले आहे. येत्या काळात संगमनेर शहरात फ्री वायफाय झोन, स्मार्ट स्ट्रीट प्रकल्प, नवीन पोलीस ठाणे, शहरातील मुख्य चार रस्त्यांचे चौपदरीकरण तसेच पुढील टप्प्यात 60 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांबरोबर अत्याधुनिक बदलांसह संगमनेर शहर अधिक हायटेक होणार असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

नामदार थोरात यांच्या स्थानिक विकास निधीतून संगमनेर शहरात 39 सीसीटीव्ही कॅमेरा व नियंत्रण कक्षाचे लोकार्पण नुकतेच संपन्न झाले. यावेळी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, सभापती सुनंदा जोर्वेकर, काँग्रेस शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक, उपसभापती नवनाथ अरगडे, प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, प्रमिला अभंग, सुनंदा दिघे, सुमित्रा दिड्डी, सुभाष सांगळे, निखील पापडेजा, अ‍ॅड. सुहास आहेर, ढोले गुरुजी, नायब तहसीलदार उमाकांत कडनोर, साईटेक कॉर्पोरेशनच्या काजल राऊत, नूरमोहम्मद शेख, नितीन अभंग, किशोर टोकसे, जावेद शेख, श्रीनिवास पगडाल यांसह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना नामदार थोरात म्हणाले, कोरोनाच्या संकटानंतर संगमनेर तालुक्यात सातत्याने निधी मिळून विकासकामांचा वेग कायम आहे. शहरात हायटेक बसस्थानक, प्रांताधिकारी कार्यालय, न्यायालय इमारत, नगरपालिका इमारत, क्रीडा संकुल अशा अत्याधुनिक इमारती उभ्या राहिल्या आहेत. स्वच्छ व मुबलक पाणी, बंदिस्त गटार व्यवस्था, बगीचे, विविध रस्त्यांची कामे यामुळे शहराचे वातावरण हे अधिक चांगले झाले आहे. समता, बंधुभावामुळे येथे प्रत्येक नागरिकास राहण्यास प्राधान्य आहे. स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर, हरीत संगमनेर या संकल्पनेमुळे स्वच्छतेसह संगमनेरमध्ये हिरवाई वाढली आहे. शहरात येणारे चारही बाजूचे रस्त्यांचे चौपदरीकरण व सुशोभीकरण होणार आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय ते बसस्थानक या रस्त्यांमध्ये वायफाय सुविधा देण्यात येणार आहे. हा रस्ता स्मार्ट स्ट्रीट प्रकल्प हा अभिनव उपक्रम म्हणून राबवला जाणार आहे.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले, मुंबई, पुणे, नागपूर या मेट्रो शहरांप्रमाणे संगमनेरमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हायटेक सीसीटीव्ही सुरक्षारक्षक प्रणाली कार्यान्वित झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये नागरिकांची जागृकता जास्त असल्याने गुन्ह्यांचे रिपोर्ट जास्त होत आहे. जनतेला मदत करणे हे पोलिसांचे काम असून जिल्ह्यातील सर्वात चांगली यंत्रणा संगमनेरमध्ये नामदार थोरात यांनी सुरू केली आहे. या नव्या प्रणालीसह पोलीस प्रशासन अधिक चांगले काम करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. स्वागत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी केले. प्रास्ताविक नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर तहसीलदार अमोल निकम यांनी आभार मानले.


स्मार्ट स्ट्रीट प्रकल्पांतर्गत फ्री वाय फाय झोन..

संगमनेर शहरात अनेक अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या जाणार असून बसस्थानक ते अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय दरम्यानच्या चौपदरीकरण रस्त्याच्या सुशोभीकरणाबरोबर या रस्त्याच्या दुभाजकामध्ये ऑप्टिकल केबलद्वारे फ्री वायफाय झोनची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. याचबरोबर शहरात विविध ठिकाणी वायफाय झोनही असणार आहेत.

Visits: 14 Today: 1 Total: 117336

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *