पुरोहित संघ संगमनेरसाठी वरदान ः मालपाणी
पुरोहित संघ संगमनेरसाठी वरदान ः मालपाणी
ऑनलाईन कुंकूमार्चन सोहळा उत्साहात संपन्न
नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘पुरोहित संघ संगमनेरसाठी वरदान आहे. त्यांच्या सामाजिक धार्मिक उपक्रमातील सातत्य वाखाणण्याजोगे आहे. कितीही गंभीर संकट असले संगमनेरमध्ये संकट जाणवत नाही, त्याला कारण मंत्र ऊर्जेचे महत्त्व. त्यामुळे संगमनेर सतत जागृत राहतं. संघाचे कार्य असेच पुढे जात रहावे यासाठी मालपाणी परिवार नेहमीच सहकार्य करीत राहील अशी ग्वाही सामाजिक कार्यकर्त्या व सुप्रसिद्ध प्रेरक व्याख्यात्या रचना मालपाणी यांनी दिली.

पुरोहित प्रतिष्ठानच्या पुढाकाराने संगमनेरात मंगळवारी (ता.20) ऑनलाईन कुंकूमार्चन सोहळा उत्साहात संपन्न झाला. विविध समाजातील अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने सोहळ्याला व्यापक स्वरूप आले. मागील काही वर्षांपासून मालपाणी लॉन्सच्या सभागृहात भरगच्च उपस्थितीत कुंकूमार्चन सोहळा उत्साहात संपन्न होत असे. यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर सभागृहात सोहळा आयोजित करणे अशक्य असल्याने पुरोहित प्रतिष्ठानच्यावतीने ऑनलाईन कुंकूमार्चन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी लाईव्ह कार्यक्रमात शुभेच्छा देताना मालपाणी यांनी वरील उद्गार काढले.

या सोहळ्याची माहिती समाज माध्यमातून दोन दिवस अगोदरच माता भगिनींना देण्यात आली होती. सायंकाळी पाच वाजता वेदमंत्रांच्या घोषात सुरू झालेला हा सोहळा सहा वाजेपर्यंत सुरु होता. शहरातील असंख्य महिला सायंकाळी पाच वाजता आपापल्या घरी देवापुढे आसनावर बसणे, एका वाटीत कूंकू घेऊन तसेच आपल्याकडील देवीची प्रतिमा आपल्या कुलस्वामिनीचा टाक, अन्नपूर्णा महालक्ष्मी श्री यंत्र आणि दिवाळीच्या पूजेतला नाणे अशा विविध साधनांसह त्यात सहभागी झाल्या. ब्रह्मवृंद सांगतील त्यानुसार मंत्रोच्चारासह आदिशक्ती देवीचे नामोच्चार, स्तवन करून कुंकूमार्चन करण्यात आले. त्यानंतर महिलांनी नैवेद्य दाखवून आपापल्या घरी आरती केली. आशीर्वाद मंत्राने सोहळ्याची सांगता झाली. अशा रितीने संगमनेरमध्ये प्रथमच कुंकुमार्चन सोहळा झाल्याने सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे. ऑनलाईन आयोजन करून परंपरा अखंड राखल्याबद्दल महिलांनी पुरोहित प्रतिष्ठानला धन्यवाद दिले आहेत. विशेषतः पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक, अहमदाबाद अशा विविध महानगरातील भगिनींसह साता-समुद्रापारहून इंग्लंडमधील भगिनीही या सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.

