शहरालगतचा परिसर दुर्गंधीयुक्त करण्याचे पद्धतशीर षडयंत्र! कापलेल्या जनावरांचे अवशेष; आता गुंजाळवाडीचा परिसर होतोय लक्ष्य..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्याकाही वर्षांपासून शहरातील अधिकृत कसाई व बेसुमार वाढलेल्या हॉटेल व्यावसायिकांच्या आस्थापनांमधून निघणारा कचरा आता शहराभोवतीच्या नद्यांच्या पात्रासह आसपासच्या वसाहतींच्या परिसरात फेकून पसार होण्याच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शहरात प्रवेश करताच जाणवणारी प्रचंड दुर्गंधी आता गुंजाळवाडी, कासारादुमाला, घुलेवाडी व वेल्हाळे सारख्या गावांमध्येही पसरु लागली आहे. बुधवारी शहरातील अशाच मांसाहारी हॉटेलांमधून गोळा केलेला दुर्गंधीयुक्त कचरा आणि घाण गुंजाळवाडी शिवारात फेकून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या एकाला पकडल्यानंतर सदरचा प्रकार उघड झाला आहे. हॉटेल चालकांसह काही कसायांच्या या कृतीने प्रचंड दुर्गंधीचा सामना करणार्या रहिवाशांचा संताप झाला असून अशाप्रकारे गुपचूप दुर्गंधीयुक्त घाणीची विल्हेवाट लावणार्यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करीत त्यांचे व्यावसायिक परवाने रद्द करण्याची मागणी गुंजाळवाडी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या संगमनेर शहराचा विस्तार गेल्याकाही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे कधीकाळी जेमतेम लोकवस्ती असलेल्या गुंजाळवाडी, घुलेवाडी, कासारादुमाला, सुकेवाडी, वेल्हाळे, सायखिंडी अशा अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दित नागरी वसाहती, वेगवेगळ्या आस्थापना आणि छोट्या-मोठ्या उद्योगांची दाटी वाढली आहे. त्यातून एकीकडे या गावांच्या महसुली उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसत असले तरीही दुसरीकडे प्रचंड विस्तारलेल्या क्षेत्रामुळे नागरीकांना पाणी आणि आरोग्य विषयक सुविधा देण्यात या सर्वच ग्रामपंचायती कमी पडत असल्याचेही वेळोवेळी समोर आले आहे. प्रत्येक वसाहत आणि त्या भोवतीचा परिसर स्वच्छ राहीला तरच नागरीकांचे आरोग्य उत्तम राहील याची जाणीव असल्याने संसाधनांची कमतरता असतानाही बहुतेक ग्रामपंचायती आपल्या हद्दितील रहिवाशांना किमान मुलभूत सुविधा देण्याची धडपड करतानाही दिसून येतात.
मात्र शहरालगतच्या अशाकाही ग्रामपंचायतींच्या प्रयत्नांना संगमनेर शहरातील काही कसाई व हॉटेलचे चालक पानं पुशीत असून त्यांच्या दुकान अथवा हॉटेलातून निघणारी घाण, खरकटे व कसायांच्या छोटेखानी कत्तलखान्यातून बोकड, कोंबड्या यांचे अनावश्यक भाग, पीस अशा गोष्टी गोण्यांमध्ये भरुन चक्क शहरालगतच्या प्रवरा व म्हाळुंगी या नद्यांसह म्हानुटी, नाटकी, लेंडी या नाल्यांच्या प्रवाहांमध्ये टाकण्यासह आतातर चक्क आसपासच्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात जावून रात्रीच्या अंधारात गुपचूप फेकून पळून जाण्याच्या प्रकारांमध्येही वाढ झाली आहे.
बुधवारी (ता.8) रात्री असाच प्रकार शहरालगतच्या गुंजाळवाडी शिवारातून समोर आला. या घटनेत टाटा कंपनीच्या छोट्या टेम्पोमधून (क्र.एम.एच.17/ए.जी.6964) शहरातील मांसाहारी हॉटेलमध्ये गोळा झालेला कचरा प्लॅस्टिकचे ड्रम व गोण्यांमध्ये भरुन आणून तो फेकून पळण्याच्या तयारीत असलेल्या एकाला ग्रामस्थांनी पकडले तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला. त्यातून शहरातील काहीजण पालिकेद्वारा कचरा संकलन आणि त्याचे पद्धतशीर निर्मुलन करण्याची व्यवस्था असतानाही असे उद्योग करुन आसपास राहणार्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचे तर षडयंत्र राबवित नाहीत ना? अशी शंकाही निर्माण झाली आहे.
यापूर्वी अकोले रस्त्यावरील म्हाळुंगी नदीचे पात्र आणि जाजू पेट्रोल पंपाशेजारुन जाणार्या रस्त्यासह चंद्रशेखर चौकातून शांती घाटाकडे जाणार्या रस्त्यावरही अशाचप्रकारे कापलेल्या जनावरांचे दुर्गंधीयुक्त अवशेष टाकून नागरिकांना त्रास देण्याचा प्रकार वेळोवेळी समोर आला आहे, मात्र प्रशासनाने आजवर त्याची कोणतीही दखल न घेतल्याने त्यात आता वाढ झाली असून शहरातील अशाकाही विकृतांनी आता सभोवतालच्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील मानवी वसाहती लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने रहिवाशांमधून संताप खद्खद्त आहे. प्रशासनाने वेळीच या षडयंत्राची दखल घेवून अशाप्रकारे मानवी आरोग्यावरच घाव घालणार्या आणि जाणीवपूर्वक नागरिकांना त्रास देणार्यांविरोधात कठोर पावलं उचलण्याची गरज आहे, अन्यथा काळ सोकावण्यास वेळ लागणार नाही.
संगमनेर शहराचा विस्तार वाढताना शहरालगतच्या घुलेवाडी आणि गुंजाळवाडी या दोन ग्रामपंचायत क्षेत्रात प्रचंड मानवी वसाहती वाढल्या आहेत. कधीकाळी अवघ्या साडेतीन हजार लोकवस्तीच्या गुंजाळवाडी शिवारात आजच्या स्थितीत 35 हजारांहून अधिक नागरीक रहात आहेत. त्यावरुन मानवी वस्त्यांच्या वाढीचा वेग लक्षात येतो. मात्र अपूर्या संसाधनांमुळे या ग्रामपंचायती नव्याने वाढलेल्या वसाहतींना पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधा देण्यात कमी पडत असून त्यात शहरातील काही कसाई आणि हॉटेल व्यावसायिकांनीही भर घातल्याने या ग्रामपंचायतीही आता संतप्त झाल्या असून अशाप्रकारे कचरा फेकून पहून जाणार्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वाढत आहे.