कोल्हेवाडी रोडवरील गुटखा गोदामावर छापा! तीन लाखांचा गुटखा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
साखर झोपेतून अचानक जाग आलेल्या अहमदनगरच्या अन्न व औषध प्रशासनाला आपल्या कर्तव्याची जाणीव झाली की काय असे वाटणारी घटना संगमनेरातून समोर आली आहे. गेल्या दीड दशकांपासून राज्यात गुटख्याचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक व विक्रीला बंदी असतानाही आजवर कधीही तुटवडा न भासलेल्या गुटख्याचा मोठा साठा प्रशासनाने जप्त केला असून सदरची कारवाई शहरातील कुप्रसिद्ध गुटखा तस्कर रईस सरदार पठाण याच्या कोल्हेवाडी रस्त्यावरील गोदामावर करण्यात आली आहे. या तस्कराने गुटख्याचा संपूर्ण माल आपल्या शौचालयात दडवून ठेवला होता. या कारवाईत हिरा पानमसाला आणि सुगंधीत तंबाखू असा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने संगमनेरात गुटख्याचा सुकाळ असल्याचे स्पष्ट झाले असून उर्वरीत तस्कर सावध झाले आहेत.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई बुधवारी (ता.10) दुपारी एकच्या सुमारास करण्यात आली. कुंभारआळ्यावर चोरटी गुटखा विक्री करणार्‍या रईस तांबोळी याचे कोल्हेवाडी रस्त्यावर अतिरीक्त घर असून त्याचा वापर गुटख्याचा साठा करण्यासाठी होत असल्याची माहिती अहमदनगरच्या अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांनी शहर पोलिसांच्या मदतीने संयुक्तपणे छापा घालून सदरची कारवाई केली. यावेळी घराची तपासणी करीत असताना पथकाला शौचालयात गुटखा लपवून ठेवल्याचे आढळले. अतिशय घाणेरड्या ठिकाणावर ठेवलेला हाच गुटखा तो बाजारात वितरित करणार होता.

सापडलेल्या मुद्देमालाची मोजदाद केली असता रईस तांबोळी याच्या घरातील शौचालयात हिरा पान मसाल्याचे 2 लाख 40 हजार रुपये किंमतीचे दोन हजार पॅकेट व त्यासाठी वापरल्या जाणार्‍या रॉयल सुगंधीत तंबाखूचे 60 हजार रुपये किंमतीचे पुडे असा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रईस सरदार तांबोळी (वय 49, रा.कुंभारआळा) याच्या विरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 188, 272, 273, 328 सह अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील विविध तरतुदीन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने शहरातील अन्य गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

रईस तांबोळी याच्यावर यापूर्वीही अनेकदा पोलीस व अन्न सुरक्षा अधिकार्‍यांनी छापे घालून कारवाया केलेल्या आहेत. शहरातील प्रमुख गुटखा तस्करांमध्ये समावेश असलेल्या तांबोळीवर मात्र तडीपारी अथवा प्रवेश मनाईसारखी कारवाई झालेली नाही. खरेतर गुटख्याच्या सेवनाने कर्करोग होण्याचे प्रमाण खूप मोठे आहे, त्यासाठीच राज्यात गुटखाबंदी लागू करण्यात आली होती. मात्र ही बंदी शासनाच्या महसुलाचे नुकसान करुन अधिकार्‍यांच्या तिजोर्‍या भरण्याचे माध्यम बनल्याने लागू झाल्यापासूनच गुटखा बंदीचा राज्यात सर्वत्र फज्जा उडाला आहे. अन्न व औषध प्रशासनाने यापूर्वी क्वचितच मोठ्या तस्करांवर कारवाई केली आहे. प्रत्येकवेळी किरकोळ विक्रेते अथवा ‘संपर्कात’ नसलेल्यांना हेरुन झालेल्या चार-दोन पुड्यांवरील कारवाया चर्चेतही आल्या होत्या. मात्र या कारवाईत मोठा मासाच जाळ्यात अडकवल्याने काही प्रमाणात समाधानही निर्माण झाले आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *