संगमनेर तालुक्यातील स्वस्तधान्य दुकानांमध्ये मोठा गैरव्यवहार? हजारों किलोंचे शिल्लक धान्यसाठे गुडूप; पुरवठा विभागाचे मात्र कानावर हात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशभरात गेल्या दहा वर्षांपासून ‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यातंर्गत’ अंत्योदय आणि प्राधान्य गटातील गोरगरीबांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचे वितरण केले जाते. कोविड संक्रमणापासून केंद्र सरकारने या दोन्ही गटांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा सुरु केला आहे. ही वितरण प्रणाली पारदर्शक पद्धतीने चालावी यासाठी बायोमेट्रीक प्रणालीसह गेल्या जानेवारीत राज्यातील सर्व स्वस्तधान्य दुकानांना जून्या शिल्लक नोंदवहिच्या जागी नवीन ई-पॉस मशिन देण्यात आले होते. या मशिनद्वारा वितरणाचे कामकाज सुरु होणे अपेक्षित असताना तालुक्यातील 164 स्वस्तधान्य दुकानदारांमधील काहींनी मागील शिल्लक असलेल्या धान्यसाठ्याची परस्पर विल्हेवाट लावल्याचे आता समोर येत असून पठारावरील बोटा येथील एका दुकानात तब्बल आठ हजार किलो अन्नधान्याचा गैरव्यवहार झाल्याचा पहिला प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे तपासणी पथकाने अन्नधान्याची तफावत निदर्शनास आणल्यानंतर संबंधिताने अन्य काही दुकानदारांशी संपर्क करुन तात्पूरता धान्यसाठा देण्याची विनंती केल्याचा धक्कादायक प्रकारही उजेडात आला आहे. याबाबत संगमनेरच्या पुरवठा अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता चक्क त्यांनी आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगत कानावरच हात ठेवले आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेवून गोरगरीबांच्या वाट्याचे अन्नधान्य लुबाडणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.


याबाबत विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोरगरीबांच्या अन्नधान्याचा हा गैरव्यवहार पठारभागातील बोटा येथे कार्यरत स्वस्तधान्य दुकानातून झाल्याचा संशय आहे. याबाबत बोट्याच्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव सचिन आहेर व संचालक सुखदेव शेळके यांनी संशयावरुन तेथील धान्य दुकानातील शिल्लक साठ्याची पडताळणी केली. यावेळी हा सगळा गैरव्यवहार उजेडात आला. त्यांच्या पडताळणीत सदरील धान्य दुकानात 3 हजार 203 किलो गहू व 4 हजार 652 किलो तांदूळ शिल्लक दिसत असताना प्रत्यक्षात मात्र तो कोठेही आढळून आला नाही. याबाबत त्यांनी दुकानातील मदतनिस सौरभ शेळके याच्याकडे विचारणा केली असता त्याने सदरील मालाची पूर्तता करुन देण्याचे त्यांना आश्‍वासन दिले. मात्र नोंदवहीत शिल्लक साठा दिसत असताना प्रत्यक्षात जवळपास 7 हजार 855 किलो धान्य गेले कोठे याचे उत्तर मात्र त्याला देता आले नाही.


वास्तविक स्वस्तधान्य दुकानांमधील अशा प्रकारचे गैरव्यवहार कमी करण्यासाठी शासनाने गेल्या जानेवारीमध्ये तालुक्यातील सर्व 164 धान्य दुकानांना नवीन ई-पॉस मशिन दिले आहेत. नव्याने दिलेल्या या मशिनमध्ये सुरुवातीची शिल्लक घेवून संबंधितांनी कामकाज सुरु करण्याची गरज असताना त्यावेळी पुरवठा विभागातील काहींनी अशाकाही धान्य दुकानदारांकडून ठराविक रक्कम घेवून शून्यापासूनच धान्याची नोंदणी सुरु केली. त्याचा परिणाम ही तफावत कायम राहून ती सातत्याने वाढत राहीली. असाच प्रकार बोट्यासह तालुक्यातील अन्यकाही स्वस्तधान्य दुकानांमध्येही झाल्याची जोरदार चर्चा आहे. सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी केवळ संशय म्हणून तपासणी केली असता हा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.


बोट्यातील तपासणीनंतर हे प्रकरण आपल्यावर शेकणार याची कल्पना आल्याने संबंधित दुकानदाराने पठारावरील अन्यकाही दुकानदारांशी संपर्क साधून केवळ दाखवण्यासाठी म्हणून काही दिवस त्यांच्याकडील धान्यसाठा देण्याची विनंती केली. मात्र नसती झंझट नको म्हणून त्यांच्याकडून असाप्रकार करण्यास नकार देण्यात आल्याने बोट्याचा स्वस्तधान्य दुकानदार प्रचंड अडचणीत सापडला आहे. बोट्याच्या माध्यमातून गोरगरीबांच्या मुखातील धान्यावर कशाप्रकारे ‘डल्ला’ मारला जातो हे आता समोर येवू लागल्याने तालुक्यातील स्वस्तधान्य दुकानदारांचे धाबे दणाणले असून त्यांनी आपापल्या गोदामातील धान्यसाठ्यांची मोजदाद आणि त्याची शिल्लक जुळवणीही सुरु केल्याचे वृत्त आहे.

कोविड संक्रमणापासून देशभरातील अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना सवलतीऐवजी पूर्णतः मोफत धान्याचे वितरण केले जाते. या योजनेनुसार अंत्योदय गटातील पिवळ्या शिधापत्रिकाधारक एका कुटुंबाला 20 किलो तांदूळ व 15 किलो गहू असे 35 किलो तर प्राधान्य गटातील केशरी शिधापत्रिकाधारकांना माणशी तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू असे एकूण पाच किलो धान्याचे वितरण केले जाते. त्यासाठी बायोमेट्रीक पद्धत अवलंबली जात असल्याने पूर्वीप्रमाणे लाभार्थ्याशिवाय होणारा परस्पर धान्याचा झोल बंद झाला, मात्र त्यावर शक्कल लढवून आता बहुतेक स्वस्तधान्य दुकानदार लाभार्थ्यांनाच प्रत्येकी दोन-चार किलो धान्य वरतूनच कमी आल्याचे सांगत कमी देत असून त्यातूनही मोठा गैरव्यवहार होत असल्याची जोरदार चर्चा आहे.


संगमनेर तालुक्यातील स्वस्तधान्य दुकानांमधील हे प्रकार नवीन नाही. मात्र गेल्या चार वर्षांपासून मोफत धान्य मिळत असताना त्याची लुट करणार्‍यांची संख्याही वाढली असून पुरवठा विभागाच्या गोदामापासूनच आलेल्या धान्यावर दरोडा पडण्यास सुरुवात होत असल्याचे समजते. त्यातूनच हा प्रकार थेट लाभार्थ्यांच्या वितरणापर्यंत पोहोचला असून गोरगरीबांच्या मुखातील अन्न परस्पर विकून मलिदा लाटण्याच्या या भयंकर प्रकाराची जिल्हाधिकार्‍यांनी गांभीर्याने दखल घेवून संगमनेर तालुक्यातील सर्व स्वस्तधान्य दुकानांची सखोल तपासणी करण्याची गरज आहे.


बोट्यातील स्वस्तधान्य दुकानामध्ये आढळून आलेल्या शिल्लक धान्य साठ्याबाबत माझ्यापर्यंत कोणतीही माहिती आलेली नाही व हा प्रकारही अद्याप आमच्या कार्यालयाकडे आलेला नाही. तेथील सेवा सोसायटीच्या संचालकांनी केलेल्या तपासणीबाबतचे व शिल्लक साठ्यातील तफावतीचे पत्र मला मिळालेले नाही. या प्रकरणाची तपासणी मला स्वतःलाच जावून करावी लागणार आहे, त्यामुळे मी स्वतः जावून बोट्यातील प्रकार तपासतो.
गणेश भालेराव
पुरवठा अधिकारी, संगमनेर

Visits: 6 Today: 2 Total: 18857

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *