बिहारनंतर जखणगावमध्ये होणार जातनिहाय जनगणना! ग्रामपंचायतीचा धाडसी निर्णय; गुरुवारी सादर करणार अहवाल


नायक वृत्तसेवा, नगर
बिहारमध्ये जातनिहाय जनगणना झाल्यानंतर त्याची देशभर चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही तशी मागणी होत आहे. मात्र केंद्र आणि राज्य सरकार यावर सावध भूमिका घेत आहेत. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील जखणगाव (ता. नगर) या गावाने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा ठराव मंजूर झाल्यानंतर आजपासून काही सुरू करण्यात आले असून नऊ दिवसांत ते पूर्ण करून राज्याच्या मुख्य सचिवांना अहवाल सादर करण्यात येणार आहे.

नगर तालुक्यातील जखणगावने ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसंसदेच्या ३० ऑक्टोबरला झालेल्या मासिक बैठकीत हा निर्णय घेतला. आजपासून जातगणना सुरूही केली. जखणगावचे लोकनियुक्त सरपंच डॉ. सुनील गंधे यांनी बैठकीत गावातील सर्व नागरिकांची जातनिहाय जनगणना करण्यासंदर्भात प्रस्ताव मांडला. मराठा आरक्षणासंबंधी तांत्रिक बाजूंची पूर्तता करण्यासाठी जातनिहाय गणना होणे आवश्यक असल्याचे म्हणणे त्यांनी मांडले. त्याला गावातील सेवा सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब कर्डिले यांनी अनुमोदन दिले. सर्व ग्रामस्थांनी हा ठराव सर्वानुमते संमत केला. गावातील सर्व जातीधर्माच्या लोकांनी मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनुकूलता दर्शवली.

गावातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी, मानधनावर काम करणारे सर्व सेवक आणि पदाधिकारी यांच्यामार्फत जनगणनेचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. गुरुवारी (ता.९) मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना त्याचा अहवाल सादर केला जाणार आहे. जातगणनेच्या कामात हयगय करणार्‍या कर्मचार्‍यांचा आणि अडथळे निर्माण करणार्‍या नागरिकांचा अहवाल ग्रामपंचायत कार्यालयाला सादर करण्याच्या सूचना सरपंच डॉ. सुनील गंधे यांनी ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना दिल्या आहेत.

बिहार राज्यात अशाप्रकारे जनगणना करून तिचा अहवालही प्रसिद्ध झाला आहे. त्यावर उलटसुलट प्रतिक्रियाही उमटत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारमधील धुरीणांनी सुध्दा याबाबत विचार करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र जखणगावने राज्यात पहिल्यांदाच असे धाडस दाखवून जातनिहाय जनगणना करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. गावपातळीवर जातनिहाय असा सर्व्हे झाल्याने आरक्षण मुद्यातील वास्तव लक्षात येईल. भविष्यात देशाला एक निर्णायक पाऊल उचलावे लागेल. तरच सामाजिक एकोपा टिकेल, असे जखणगावचे सरपंच डॉ. सुनील गंधे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *