शाश्‍वत सिंचनासाठी उभारलेली शेततळी ठरताहेत जीवघेणी! समृद्धी आली मात्र सुरक्षेचे काय?; संगमनेर तालुक्यात चार हजार शेततळी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील पर्जन्यमानाच्या प्रमाणात निर्माण झालेल्या अनिश्‍चिततेमुळे पावसावर पुर्णतः अवलंबून असलेल्या पिकांवर आणि त्यांच्या उत्पादनांवर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे कर्जबाजारी होणार्‍या शेतकर्‍यांनी मरणाची दारं उघडण्यास सुरुवात केल्याने जाग आलेल्या शासनाने शाश्‍वत सिंचनाचे पर्याय निवडतांना राज्याच्या दुष्काळीभागातील शेतीसाठी सिंचनाचा पर्याय म्हणून शेततळ्यांची संकल्पना मांडून त्यासाठी सरकारी अनुदानाची योजना कार्यान्वित केली. त्यातून हजारों शेतकर्‍यांनी आपल्या जमिनींमध्ये शेततळ्यांची निर्मिती करुन दुष्काळावर मातही केली. मात्र शेततळं बांधताना ज्या जीवांच्या सुखासाठी ते बांधलं जातयं त्याची सुरक्षा मात्र वार्‍यावर सोडली गेल्याने आणि शासनानेही सदरची योजना सुरु करताना सुरक्षेला महत्त्वच न दिल्याने शाश्‍वत सिंचनाच्या हेतूने उभारलेली शेततळी आज शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी जीवघेणी ठरत आहेत. राज्यात शेततळ्यात बुडून होणारे मृत्यू वारंवार व्यवस्थेचे लक्ष वेधीत असून त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.


गुरुवारी (ता.26) सायंकाळी चारच्या सुमारास शहरापासून अगदी जवळच असलेल्या वेल्हाळे शिवारातील पिंपळमळा परिसरातील शेततळ्यात साडेतीन वर्षांचा नातू पडल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तळ्यात उडी घेणार्‍या आजोबांचाही बळी गेला. गेल्या पंधरवड्यात संगमनेर तालुक्यातीलच मेंढवण शिवारात शाळा संपवून शेळ्या चारण्यासाठी माळरानावर गेलेल्या तिघा चिमुकल्या मुलींचाही अर्धवट अवस्थेतील शेततळ्यात पाय घसरुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अद्यापही ताजीच आहे. त्यापूर्वीही सातत्याने संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यात आणि राज्यातही अशा घटना वारंवार घडल्या आहेत आणि त्यातून निष्पापांचे बळीही गेले आहेत. घटना घडतात त्यावेळी त्यावर बर्‍याच चर्चाही होतात, मात्र अशा घटना रोखण्यासाठी आजवर ना कोणी प्रयत्न केले, ना प्रबोधन त्यामुळे निष्पाप नागरिक समृद्धीच्या तळ्यात बुडून नाहक आपले जीव गमावतच आहेत.


राज्यातील शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्यांमागील कारणांची मीमांसा करताना शेती उत्पादनांमध्ये शाश्‍वतता निर्माण करुन दुष्काळावर मात करण्यासाठी राज्याने अशा भागातील शेतकर्‍यांसाठी ‘शेततळ्यां’चा पर्याय समोर आणला. केवळ पावसावर अवलंबून असलेल्या कोरडवाहू शेतीसाठी व जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढवणे, संरक्षित व शाश्‍वत सिंचनाची सुविधा निर्माण करणे या उद्देशाने राज्य सरकारने ‘मागेल त्याला शेततळे’ ही व्यापक योजना हाती घेतली. निकषांच्या आधारे लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी विभागीय पातळीपासून तालुकास्तरापर्यंत समितीची साखळी निर्माण करण्यात आली.


या साखळीत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय पातळीवर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदस्यपदी असलेल्या आणि जिल्हा कृषी अधिक्षक सदस्य सचिव असलेल्या समितीची रचना केली गेली. तर, तालुकास्तरावर लाभार्थ्यांचे अर्ज दाखल करुन घेणे, त्याची छाननी करणे, पात्रतेनुसार निवड यादीस मान्यता देणे, योजनेची अंमलबजावणी, संनियंत्रण, अनुदान अदायगी व आढावा घेण्यासाठी उपविभागीय अधिकार्‍यांच्या (प्रांताधिकारी) अध्यक्षतेखाली उपविभागीय कृषी अधिकारी (सहअध्यक्ष), तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपअभियंता लघुसिंचन (जिल्हा परिषद), उपअभियंता लघुसिंचन जलसंधारण, उपअभियंता जलसंपदा, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा प्रतिनिधी, सामाजिक वनीकरण प्रतिनिधी यांची सदस्य म्हणून तर, तालुका कृषी अधिकारी सदस्य सचिव असलेली समिती कार्यान्वित करण्यात आली.


गेल्या दीड दशकांत संगमनेर तालुक्यातील कमी पावसाच्या आणि दुष्काळी भागातील शेतकर्‍यांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घेतला. अनेक शेतकर्‍यांनी योजनेला पात्र ठरत नाहीत म्हणून खासगी पातळीवर शेततळी उभारली. आजच्या स्थितीत 174 गावांच्या संगमनेर तालुक्यामध्ये शासकीय योजनेसह गैरयोजनेतून आकाराला आलेली सुमारे चार हजार शेततळी निर्माण झाली आहेत. त्यातून पावसाळ्यातील पाणी आडवून कोट्यवधी लिटर पाणी साठवण्यात आल्याने पिढ्यान् पिढ्या दुष्काळाशी लढणार्‍या बळीराजाच्या मनगटात बळही आलं. पण, जगण्यासाठी शाश्‍वत पर्यायांची व्यवस्था करताना त्याच्या सुरक्षेकडे मात्र कोणत्याही घटकाने फारसे गांभीर्याने बघितले नाही. त्यामुळे एकीकडे पाण्याअभावी हातचे गेल्याने कर्जबाजारी झालेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या कमी करण्यात यश मिळत असताना, दुसरीकडे त्यांच्या समृद्धीसाठी निर्माण झालेल्या शेततळ्यांमधील पाण्यांमध्येच त्यांचे जीव जावू लागले.


गेल्याकाही महिन्यांत संगमनेर तालुक्याच्या विविध भागातून समोर येणार्‍या बुडिताच्या या घटना सून्न करणार्‍या ठरत आहेत. मात्र या घटनांनंतर त्यातून बोध घेवून कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने दुर्दैवाने त्यातील सातत्यही टिकून आहे. या गोष्टीचा शासन आणि प्रशासन या दोन्ही पातळीवरुन गांभीर्याने विचार होण्याची गरज आता प्रकर्षाने समोर आली आहे. शासनाने शेततळ्यासाठीच्या योजनेत काही नियम अंतर्भूत करण्याची आवश्यकता असून त्यातून मानवी सुरक्षेला अधिक महत्त्व देण्याची गरज आहे. अर्थात गुरुवारच्या घटनेत वेल्हाळ्यातील ‘त्या’ शेततळ्याला सुरक्षाजाळी (कंपाऊंड) निश्‍चितच होती, मात्र तरीही त्या तळ्यात साडेतीन वर्षांच्या लहान्या मुलासह त्याच्या आजोबांचा बळी गेला. त्यामुळे या मागील कारणांचा विचार करुन त्यावरील उपाय योजन्याची नितांत गरज आहे.


शेततळ्यात पडलेल्या व्यक्तिला पोहता येत असलं तरीही त्याला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तळ्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नसतो. परिणामी पडलेल्या व्यक्तिबाबत कोणाला माहिती नसेल तर अशी व्यक्ति हातपाय मारतामारता अखेर दमून बडून मरत पावत असल्याचे अशा अनेक घटनांमधून समोर आले आहे. या घटनांचा गांभीर्याने विचार करताना हजारों रुपयांचा खर्च करुन उभारलेल्या शेततळ्याला सुरक्षा कंपाऊंडसह प्रत्यक्ष तळ्यात वेगवेगळ्या चारही कोपर्‍यात आणि मध्यात ‘दोर’ सोडण्यासह साठवलेल्या पाण्यात वाहनांच्या हवा भरलेल्या काही ट्यूब सोडणंही आवश्यक बनलं आहे. त्यासाठी शेततळ्याला परवानगी देतानाच अशा नियमांची सक्ति करण्याची आणि त्याची पूर्तता झाली की नाही याची पडताळणी करुनच अनुदानाचा अंतिम हप्ता देण्याची तरतूद करण्याची आवश्यकता आहे.


याशिवाय ज्या शेतकर्‍यांनी यापूर्वीच शेततळ्यांची निर्मिती केली आहे त्या सर्वांमध्ये घडणार्‍या घटनांबाबत जागृती निर्माण करुन आवश्यक असलेल्या पूर्तता तत्काळ करुन घेण्यासाठी त्यांचे प्रबोधन होण्याची गरज आहे. त्यासाठी स्थानिक पक्ष, संघटना, स्वयंसेवी संस्था, शासन व प्रशासन अशा सगळ्यांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. अन्यथा अशा घटना घडतच राहतील आणि त्यातून निष्पापांचे बळीही जातच राहतील.


गुरुवारी (ता.25) तालुक्यातील वेल्हाळे शिवारातील शेततळ्यात घडलेल्या बुडित घटनेत नातवाला वाचवण्यासाठी तळ्यात उडी घेणार्‍या 66 वर्षीय आजोबांचाही दुर्देवाने मृत्यू झाला. या घटनेची मीमांसा करताना पोहता येणार्‍या आजोबांना तळ्यातून बाहेर पडण्यासाठी संसाधनांची उपलब्धता असती तर कदाचित दोघांचाही जीव वाचला असता असा निष्कर्ष समोर आला. तालुक्याच्या विविध भागात यापूर्वी घडलेल्या घटनांकडे बघितले तरीही अशा बहुतेक घटनांमध्येही हाच निष्कर्ष समोर येतो. त्यामुळे याची गांभीर्याने दखल घेवून तालुक्याच्या लोकप्रतिनिधींपासून सरपंचापर्यंत आणि जिल्हाधिकार्‍यांपासून ग्रामसेवकापर्यंतच्या घटकांनी प्रत्येक शेततळ्यात जीवरक्षक उपाय योजले जातील यादृष्टीने शेतकर्‍यांमध्ये प्रबोधन करण्याची अथवा त्याची सक्ति करण्याची गरज आहे, अन्यथा अशा घटना आणि त्यातून प्रासंगिक शोक सुरुच राहतील.

Visits: 70 Today: 1 Total: 112959

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *