मुलांचा खून करणार्‍या आईसह प्रियकराचा जामीन फेटाळला! हिवरगाव पावसा बुडित प्रकरण; संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अनैतिक संबंधांना अडथळा ठरत असलेल्या आपल्या दोन मुलांना शेततळ्यात बुडवून त्यांचा खून करण्याच्या आरोपाखाली गेल्या महिनाभरापासून गजाआड असलेल्या नराधम आईसह तिच्या प्रियकराचा जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. तीन महिन्यांपूर्वी 17 एप्रिलरोजी सदरची धक्कादायक घटना तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे घडली होती. सुरुवातीला हा घात नसून अपघात असल्याचे चित्र या दोघांनी उभे केले होते. मात्र मयत बालकांचे आजोबा आणि अन्य नातेवाईकांनी हा खुनाचाच प्रकार असल्याचा आरोप केल्याने व त्यांना गावाचीही साथ मिळाल्याने तब्बल दोन महिन्यानंतर या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता, तेव्हापासून ‘ते’ दोघेही कारागृहात कैद आहेत.


तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे 17 एप्रिल रोजी रितेश सारंगधर पावसे (वय 12) व प्रणव सारंगधर पावसे (वय 8) या दोन सख्ख्या भावांचा त्यांच्या राहत्या घरापासून काही अंतरावर असलेल्या डॉ.माधव गडाख यांच्या शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला दोन्ही मुलं खेळत असताना त्यांचा पाय घसरुन ती दोघे शेततळ्याच्या पाण्यात बुडून मरण पावल्याचे चित्र मयत मुलांची आई कविता सारंगधर पावसे व तिचा प्रियकर सचिन बाबजी गाडे यांनी उभे केले होते. मात्र हा अपघात नसून आपल्या दोन्ही नातवांचा त्यांच्या आईने प्रियकराच्या मदतीने खून केल्याचा आरोप सुरुवातीपासूनच मयतांचे आजोबा व अन्य नातेवाईकांनी केला होता.


मात्र सदरचा खून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्याने पोलिसांना तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आली नाही. त्यामुळे वारंवार मागणी होवूनही पोलिसांकडून गुन्हा दाखल होत नसल्याने अखेर हिवरगाव पावसा येथील ग्रामस्थांनी महामार्गावरच ठिय्या देत या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्याला अखेर यश मिळाले आणि जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. पोलिसांच्या तपासात मयत मुलांची आई आणि गाडे यांच्यात सातत्याने मोबाईलवरुन संपर्क झाल्याचे व घटनेच्या दिवशीही दोघांचा एकमेकांशी संवाद झाल्याचे समोर आल्यानंतर 19 जूनरोजी या दोघांवरही खुनाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती, तेव्हापासून ते दोघेही कारागृहात आहेत.


दाखल प्रकरणात जामीन मिळावा यासाठी आरोपी कविता पावसे व तिचा प्रियकर सचिन गाडे यांनी 29 जूनरोजी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर बुधवारी (ता.24) फिर्यादी पक्षाचे वकिल सुशांत कवडे यांनी मांडलेले मुद्दे ग्राह्य धरुन दोन्ही आरोपींचे जामीनअर्ज फेटाळले आहेत. त्यामुळे वासनेसाठी आपल्या पोटच्या दोन मुलांचा जीव घेणार्‍या नराधम आईसह तिच्या प्रियकराचा तुरुंगातील मुक्काम वाढला असून आता त्यांना जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे दाद मागावी लागणार आहे.


चार महिन्यांपूर्वी 17 एप्रिलरोजी दुपारी तीनच्या सुमारास ही वेदनादायक घटना घडली होती. विशेष म्हणजे शेततळ्यात ब्ुडालेल्या दोन्ही मुलांना वाचवण्याचे नाटक करताना शेततळ्यात उतरलेल्या सचिन बाबजी गाडे याचाच जीव धोक्यात आला होता. त्यावेळी बुडित मुलांपेक्षा कविता पावसे हिला त्याचीच अधिक काळजी वाटल्याचे उपस्थितांच्या नजरेतून सुटले नाही. त्यातच या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचे प्रकरणही संपूर्ण गावाला माहिती असल्याने सदरचा प्रकार अपघात नसून खुनच असल्याबाबत संपूर्ण हिवरगाव पावसा मयत मुलांच्या आजोबाच्या पाठीशी उभे राहिले आणि शेवटी दोन महिन्यांच्या विलंबाने पोलिसांना खुनाचा गुन्हा दाखल करावा लागला होता. आता या दोन्ही आरोपींचा जामीनही फेटाळला गेल्याने हिवरगाव पावशातून समाधान व्यक्त होत आहे.

Visits: 21 Today: 1 Total: 79339

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *