विधानपरिषदेचे उपसभापतीपद मिळवण्यास पंचावन्न वर्ष लागली : डॉ. गोर्‍हे महिलांची स्थिती आजही ‘खुर्ची की मिर्ची’ भोवतीच फिरणारी असल्याचीही टीका..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
एका बाजूला देशातील महिलांनी मोठी प्रगती केली आहे. अनेक महिला डॉक्टर, इंजिनिअर, न्यायाधीश, वकील, उच्चपदस्थ अधिकारी बनल्या आहेत. राज्यात आज बारा महिला जिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. मात्र दुसरीकडे त्याच महिलेला विधान परिषदेचे सभापतीपद मिळविण्यासाठी तब्बल 55 वर्ष प्रतीक्षा करावी लागली. या पदासाठी आरक्षण नाही, कदाचित शिवसेनेने ठरविले नसते तर पुढील शंभर वर्ष ही संधी महिलेला मिळाली नसती अशी टीका विधान परिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी आज संगमनेर येथे केली.

येथील लोकपंचायत संचलित महिला आधार केंद्रातील वंचित, निराधार व एकट्या महिलांच्या स्वावलंबन व शाश्वत उपजीविकेसाठी सॅनिटरी पॅड निर्मिती प्रकल्पाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले, यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिसच्या संचालिका नीरजा भटनागर, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, एकविरा फाऊंडेशनच्या डॉ. जयश्री थोरात, एस.एस.एम.एफ.च्या संचालिका मोनिका जैन, पंचायत समितीच्या सभापती सुनंदा जोर्वेकर, उपविभागीय अधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व पांडुरंग पवार आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना डॉ. गोर्‍हे म्हणाल्या की, आमच्या पक्षावर काहीजण टीका करतात, त्या दिवशी ते माझा चेहरा व्यवस्थित बघतात. उलट अशा दिवशी मी अधिक हसतमुख दिसत असते. कारण प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनविण्याचे मोठे आव्हान राजकारणात असते. ज्यादिवशी लोक आपल्याला दगड मारणार आहेत, त्यादिवशी आपण अशा तयारीत असायला पाहीजे की दगड मारणार्‍याला तो मारुन काहीही फायदा होणार नाही हे त्यांना समजलं पाहिजे असे त्या भाजपचे नाव न घेता म्हणाल्या.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी आरक्षण नसतानाही आपली निवड झाल्याचे सांगताना त्यासाठी एका महिलेला तब्बल 55 वर्ष प्रतीक्षा करावी लागल्याचे त्या म्हणाल्या. कदाचित शिवसेनेने ठरविले नसतं आणि इतर पक्षांनी पाठिंबा दिला नसता तर पुढील शंभर वर्ष या पदापासून महिला दूरच राहिली असती. आजही देशातील महिलांची अवस्था खुर्ची की मिर्ची अशीच असून ती एका दाराने जावू लागली की ते बंद होत असल्याचे त्या म्हणाल्या. अर्थात महिलांनी मोठी प्रगतीही केली असल्याचे सउदाहरण पटवून देतांना त्यांनी देशातील अनेक महिला आज डॉक्टर, इंजिनिअर, न्यायाधीश, वकील, उच्चपदस्थ व सरकारी अधिकारी असल्याकडे उपस्थितांचे लक्ष्य वेधले, यावेळी राज्यात बारा जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी महिला असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

साखर पट्ट्यात रोजच उद्घाटनांचे कार्यक्रम सुरु असतात, अगदी शौचालयांचीही उद्घाटने होतात, मात्र आजही सॅनिटरी पॅड हा शब्द उच्चारण्यासाठी धाडस लागते अशी टीका करताना त्यांनी लोकपंचायतने राबविलेल्या उपक्रमाचे भरभरुन कौतुक केले. आज समाजात ज्याप्रमाणे मी दात घासत नाही असे म्हणणार्‍याला वेडं ठरविले जाईल, त्याप्रमाणे एखादी महिला सॅनिटरी पॅड वापरत नाही म्हटल्यास तिलाही वेडं ठरवलं जाईल. त्यामुळे या उपक्रमाचा ग्रामीण भागातील महिलांना मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

Visits: 177 Today: 3 Total: 1103797

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *