छत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्यावरुन संगमनेरात रंगला कलगीतुरा! सरकारकडून एक कोटीचा निधी; अश्‍वारुढ की सिंहासनाधिश्‍वर यावरुन संभ्रम..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारतीयांचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह नियोजित स्मारकावरुन संगमनेरात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला आहे. संगमनेर नगरपरिषदेने 2018 साली सिंहासनाधिश्‍वर स्वरुपातील पुतळा बसवण्याबाबतचा ठराव केला होता. मात्र त्यानंतर सहा वर्ष कोणतीही कारवाई केली नाही. चार महिन्यांपूर्वी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरसह श्रीरामपूर व राहाता येथे छत्रपतींचा अश्‍वारुढ पुतळा उभारण्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आणि या स्मारकाच्या विषयाला राजकीय वळण मिळाले. आता या स्मारकासाठी राज्य परिवहन महामंडळाने सव्वादोनशे चौरस मीटर जागा देण्याची तयारी दाखवली असताना या विषयाला पुन्हा हवा मिळाली असून सदरची जागा आपल्या नेत्यांच्या पाठपुराव्यामुळेच प्राप्त झाल्याचे दावे दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाले आहेत.


याबाबत दैनिक नायकने केलेल्या पडताळणीत पालिकेने 9 जुलै 2018 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती राज्याभिषेकाच्या मुद्रेतील पुतळा बसविण्याचा ठराव केला होता. या ठरावानुसार नगराध्यक्षांच्या सूचनेवरुन सदरील स्मारकासाठी संगमनेर बसस्थानकातील जागा मिळावी यासाठी शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रस्ताव तयार करुन तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्याबाबत सविस्तर चर्चा झाली होती. या विषयाची सूचना तत्कालीन नगरसेविकास सुनिता गुंजाळ यांनी केली होती व त्याला विश्‍वास मुर्तडक यांनी अनुमोदन दिले होते. या ठरावानंतर तब्बल तीन वर्ष सत्ता असतानाही पालिकेकडून कोणतीही कारवाई झाली नाही.


मात्र पाच वर्षांनी 21 ऑगस्ट 2023 रोजी नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी स्मारकाबाबत पालिकेसोबत पत्रव्यवहार करुन या विषयात एंन्ट्री केली. त्यांच्या पत्रानंतर त्याचाच संदर्भ देत 25 ऑगस्ट 2023 रोजी प्रशासकराज असलेल्या पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी संगमनेरच्या आगारप्रमुखांना पत्र पाठवून बसस्थानकाच्या दर्शनीभागात राज्याभिषेक स्वरुपातील पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी जागेची उपलब्धता करुन देण्याची विनंती केली. याच पत्रात त्यांनी 3 जून 2019 रोजी महामंडळास सादर केलेल्या ठरावासह प्रस्तावाचाही उल्लेख केला होता. या पत्रातून पालिकेने 15 मीटर बाय 15 मीटर आकाराची एकूण 225 चौरस मीटर जागेची मागणी केली होती. या पत्राची प्रत महामंडळाच्या अहमदनगर विभागीय नियंत्रकांनाही पाठवण्यात आली होती.


या पत्रानंतर महिन्याभरातच 12 सप्टेंबर 2023 रोजी पालिकेच्यावतीने मुख्याधिकार्‍यांनी पुन्हा आगारप्रमुखांशी पत्रव्यवहार केला. या पत्रातही आमदार सत्यजीत तांबे यांच्या मागणीचा उल्लेख करुन मागील पत्रावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे सांगत या विषयाला त्वरीत मंजुरी मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या पत्रव्यवहाराचा व त्यावर त्यांनी ‘तपासून मंजुरी देण्याबाबत’ केलेल्या टीपणीचा संदर्भ देण्यात आला होता. या पत्रासोबत प्रस्तावित स्मारकाचा नकाशा जोडल्याचाही उल्लेख करण्यात आला होता. मात्र त्या उपरांतही संगमनेरातील शिवस्मारकाबाबत कोणतीच कारवाई झाल्याचे समोर आले नाही.


या दरम्यान गेल्या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने संगमनेरात आलेल्या महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरसह श्रीरामपूर व राहाता येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांसह स्मारक उभारण्यासाठी राज्य शासनाकडून प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. या नंतर भाजपचे विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष अमोल खताळ यांनी पाठपुरावा सुरु करीत मुंबईत जावून मंत्री विखे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयाला निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली. त्यावर निर्णय होवून गेल्या सोमवारी (ता.15) राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी (बांधकाम) अहमदनगरच्या विभाग नियंत्रकांना पत्र पाठवले. त्यानुसार तातडीचा विषय म्हणून महामंडळाच्या संचालकांच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचे व प्राप्त ठरावानुसार जागा उपल्बध करुन देण्याचे आदेश देण्यात आले.

तब्बल सहा वर्षांपूर्वी पालिकेने पूर्णाकृती पुतळ्यासह स्मारकाचा ठराव केला. त्यासाठी लागणार्‍या जागेसाठी 2019 मध्ये राज्य परिवहन महामंडळाला प्रस्तावही सादर झाला. दरम्यानच्या कालावधीत अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकारही येवून गेले. मात्र स्मारकाच्या विषयाला चालना मिळाली नाही. त्यानंतर 2023 मध्ये पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी या विषयात उडी घेतली आणि पालिकेचा पाच वर्षांपूर्वी झालेला ठराव मागे पडून प्रत्येक पत्रव्यवहारात त्यांच्याच मागणीचा संदर्भ देण्यास सुरुवात झाली. मात्र निर्णय कोणताही होवू शकला नाही. चार महिन्यांपूर्वी स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागणीवरुन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरात येवून स्मारकासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली.


त्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्या मागणीचा पाठपुरावाही केला. अमोल खताळ यांनी मुंबईत जावून मंत्री विखे यांच्याकडे जागेसाठी आग्रह धरला. त्यानंतर फाईलींची हालचाल वाढली आणि अखेर पालिकेच्या ठरावाला तब्बल सहा वर्ष उलटल्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने संगमनेरातील शिवस्मारकासाठी 225 चौरस मीटर जागा देण्यास मंजुरी दिली. मात्र मंजुरीच्या या पत्रावरही छत्रपतींच्या राज्याभिषेक मुद्रेतील पुतळ्याचाच उल्लेख करण्यात आला होता, तर भाजप व त्यांच्या समर्थकांकडून मात्र अश्‍वारुढ प्रतिमा उभारणार असल्याच्या सोशल जाहिराती झळकावण्यात आल्या. त्यामुळे स्मारक तर होणार पण प्रतिमा कोणती असणार? यावरुन संगमनेरात संभ्रम निर्माण झाला आहे.


संगमनेर नगरपरिषदेने केलेला ठराव आणि त्यानंतर झालेला पत्रव्यवहार शिवरायांच्या राज्याभिषेक स्वरुपातील मुद्र्ा समोर ठेवून करण्यात आला आहे. तर, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या घोषणेनुसार संगमनेरात अश्‍वारुढ प्रतिमा उभारली जाणार आहे. पालिका हद्दितील पुतळ्यांबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठरावाला अधिक महत्त्व असते. त्यामुळे संगमनेरातील नियोजित शिवस्मारकात छत्रपतींची अश्‍वारुढ प्रतिमा बसवली जाते की पालिकेच्या ठरावानुसार सिंहासनाधिश्‍वर याबाबत संगमनेरात मोठी उत्कंठा दाटली आहे.

जिल्ह्यात संगमनेर, श्रीरामपूर व राहाता येथे शिवरायांची अश्‍वारुढ प्रतिमा उभारण्याचा निर्णय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला होता व त्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधीही जाहीर करण्यात आला होता. या स्मारकासाठी आवश्यक असलेल्या परिवहन महामंडळाच्या जागेचा प्रश्‍न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने पालकमंत्री विखे पाटील यांनी मार्गी लावला आहे. स्मारकासाठी आवश्यक जागेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचा ठरावही पाठवण्यात आला होता. त्याला आता मंजुरी मिळाली असून लवकरच संगमनेर बसस्थानकाच्या दर्शनी भागात छत्रपती शिवरायांची भव्य अश्‍वारुढ प्रतिमा आणि त्याला साजेसे स्मारक उभारण्यास सुरुवात होईल.
अमोल खताळ
विधानसभा मतदारसंघ प्रमुख, संगमनेर

Visits: 20 Today: 1 Total: 79372

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *