भंडारदर्‍याचा पाणीसाठा साडेचार टीएमसी! भात लागवडीची लगबग; लाभक्षेत्रातही बरसल्या धारा..


नायक वृत्तसेवा, अकोले
पाणलोटात जेमतेम तर लाभक्षेत्रात खडखडाट असलेल्या वरुणराजाने रविवारी चित्रा नक्षत्राच्या पूर्वार्धात जिल्ह्यातील बहुतेक सर्व भागात हजेरी लावली. कोठे अधिक तर कोठे कमी प्रमाणात कोसळलेल्या आषाढ सरींनी हवालदील झालेला बळीराजा सुखावला आहे. रविवारी दिवसभर धरणांच्या पाणलोटातही जोरदार पाऊस झाल्याने अवघ्या बारा तासांतच भंडारदरा धरणात 214 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. मात्र रात्री पावसाचा जोर पूर्णतः ओसल्याने वेगात सुरु असलेली पाण्याची आवक मंदावली. आज सकाळी सहा वाजता भंडारदरा धरणाचा पाणीसाठा साडेचार टीएमसीवर पोहोचला असून आजही जोरदार पावसाचा अंदाज आहे. गेल्या दोन दिवसांपासून जोर चढलेल्या पावसामुळे आदिवासी खोर्‍यात भात लागवडीची लगबग सुरु झाल्याचे चित्रही सर्वत्र बघायला मिळत आहे.


पंधरवड्यापूर्वी पाणलोट क्षेत्रात पुनगरागमन करणार्‍या पावसाने चार दिवसांच्या झंझावातानंतर विश्रांती घेतली होती. तर, गेल्या पंधरवड्यापासून लाभक्षेत्रात केवळ ढगाळी वातावरण असल्याने बळीराजा काहीसा हवालदील झाला होता. मात्र पंढरीच्या वाटेवरील पालख्या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताच राज्यातील बहुतेक भागात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून गेल्या दोन दिवसांपासून मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोटात जोरदार आषाढसरी कोसळत आहेत. शनिवारी रात्रीपासून जोर चढलेल्या पावसाने दोन दिवस सातत्य ठेवल्याने 48 तासांत धरणात 613 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असून आज सकाळी धरणातील पाणीसाठा 4 हजार 493 दशलक्ष घनफूट (40.70 टक्के) झाला आहे.


जिल्ह्यातील सर्वाधीक क्षमतेच्या मुळा धरणाच्या पाणलोटातही रविवारी पावसाला चांगलाच जोर चढला होता. हरिश्‍चंद्रगडाच्या डोंगररांगा, पेठेचीवाडी, कोथळे, पाचनई, खडकी, कुमशेत अशा सर्वदूर आषाढसरींनी फेर धरल्याने परिसरातील जलप्रपातांमध्ये जोश संचारला होता. त्यामुळे रविवारी सायंकाळी लहितजवळील मुळापात्रातून तब्बल साडेपाच हजार क्यूसेकहून अधिक वेगाने पाणी धावत होते. मात्र सायंकाळनंतर पावसाचा जोर ओसल्याने त्यात मोठ्या प्रमाणात घट होवून आज सकाळी मुळेचा प्रवाह 2 हजार 829 क्यूसेकपर्यंत खाली आहे. एकीकडे भंडारदरा व मुळा धरणांच्या पाणलोटात पावसाला जोर चढत असताना दुसरीकडे निळवंडे धरणाचा प्रमुख आधार असलेल्या कळसूबाईच्या शिखरांवर मात्र रिमझीम सुरु असल्याने वाकी जलाशयावरुन अवघा 197 क्यूसेकचा प्रवाह निळवंडे धरणाच्या दिशेने णेपावत आहे.


पाणलोटातील पावसाला जोर चढल्याने आदिवासी पाड्यात उत्साह असून आदिवासी बांधव आपल्या कबिल्यासह भात लागवडीच्या कामात व्यस्त झाल्याचे चित्र आता पाणलोटातील बहुतेक सर्वच भागात दिसू लागले आहे. त्याचवेळी गेल्या मोठ्या कालावधीपासून केवळ ढगाळी वातावरण अनुभवणार्‍या लाभक्षेत्रातही पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली असून बहुतेक संपूर्ण जिल्हा चिंब झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा सुखावला असून पुढील तीन दिवस जिल्ह्यातील पाऊस टिकून राहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.


आज सकाळी 6 वाजता संपलेल्या 24 तासांत पाणलोटातील घाटघर येथे 40 मि.मी., रतनवाडीत 35 मि.मी., पांजरे येथे 33 मि.मी., भंडारदर्‍यात 24 मि.मी. व निळवंडे येथे 10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यासोबतच लाभक्षेत्रातील शेवगाव येथे 32 मि.मी., नेवासा येथे 30.7 मि.मी., श्रीरामपूर येथे 21.2 मि.मी., राहाता येथे 10.3 मि.मी., संगमनेर येथे 9.6 मि.मी., राहुरीत 6.6 मि.मी. व अकोले येथे 4.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळी मुळा धरणात 8 हजार 99 दशलक्ष घनफूट (31.15 टक्के), भंडारदरा 4 हजार 493 दशलक्ष घनफूट (40.70 टक्के), निळवंडे 1 हजार 490 दशलक्ष घनफूट (17.91 टक्के) व आढळा धरणात 487 दशलक्ष घनफूट (45.66 टक्के) इतका पाणीसाठा होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *