संगमनेरातील नामांकित डॉक्टर अडकले ‘हनी’च्या जाळ्यात! त्या ‘हनी’ने अनेकांना गंडवले; लाखो रुपये देवून ‘प्रतिष्ठा’ वाचवल्याचीही चर्चा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्याला परिचयाच्या असलेल्या ‘हनीट्रॅप’चा विळखा आता संगमनेर भोवतीही आवळला जावू लागला असून गेल्या काही महिन्यांमध्ये समोर आलेल्या घटनांमधून ते स्पष्टपणे दिसू लागले आहे. या प्रकरणात अतिशय उच्च राहणी असलेल्या आणि संगमनेरातील बहुतेकांना ‘ओळखी’च्या असलेल्या ‘हनी’ने मागील दोन वर्षांच्या काळात प्रचंड आर्थिक उलाढाल झालेल्या वैद्यकीय क्षेत्रातील काहींना लक्ष्य करीत प्रेमजाल अंथरला होता. त्यात अडकलेल्या शहरातील एका नामांकित वैद्यराजांना आजवर कमावलेल्या आपल्या ‘प्रतिष्ठे’सह त्यातून बाहेर पडण्यासाठी तब्बल 40 लाखांची रक्कम मोजावी लागल्याची जोरदार चर्चा सध्या संगमनेरात सुरु आहे. याच हनीने यापूर्वीही शहर व परिसरातील काहींना नागवले असून त्यात काही अधिकार्यांचाही समावेश आहे. आता तिच्या जाळ्यात संगमनेरचे स्वास्थ टिकवणार्या गटातील डॉक्टरच फसल्याने या हनीचे कारनामे आणि तिने यापूर्वी चतुर्भूज केलेल्या व्यक्तींची चर्चा पुन्हा उफाळली आहे.

विश्वसनीय सूत्रांकडून याबाबतची माहिती प्राप्त झाली आहे. संगमनेरात राहणार्या या हनीने गेल्या काही वर्षात शहरातील काही प्रतिष्ठीत नागरिक, व्यापारी व चक्क अधिकार्यांना आपल्या सौंदर्याची भुरळ घालून त्यांना आपल्या जाळ्यात ओढले. त्यातून परस्परांशी संवाद सुरु झाल्यानंतर हाती लागलेले ‘सावज’ आर्थिकदृष्ट्या कापण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टीही तिने ‘सेव्ह’ करुन ठेवण्यास सुरुवात केली. कालांतराने त्यातून आणखी जवळीक वाढल्यानंतरच्या गोष्टी, छायाचित्रे आदीही सुरक्षित केल्यानंतर योग्यवेळी कायद्याचा धाक दाखवून त्या हनीने अनेकांना लाखो रुपयांना गंडवल्याची चर्चा यापूर्वीही वेळोवेळी समोर आली आहे, मात्र तिच्याकडून फसवली गेलेली व्यक्ती प्रत्येकवेळी ‘प्रतिष्ठीत’च असल्याने आजवर तिचे कारनामे बेदिक्कतपणे सुरुच आहेत.

सर्वसामान्य पालकांच्या पोटी जन्मलेल्या या हनीचे राहणीमान, अतिशय महागडी सौंदर्य प्रसाधने वापरण्याची सवय, अलिशान वाहनांमध्ये ‘महानगरांच्या’ वार्या करण्याची हौस आणि या सगळ्या गोष्टी सार्वजनिक मंचावर मांडण्याची पद्धत यामुळे अनेकजण तिच्या निरागस चेहर्याला भुलून आजवर फसले आहेत. प्रेमाचे खोटे नाटक करुन अडकलेल्या व्यक्तीचे आपल्याशी संबंध असल्याचे भक्कम पुरावे जमा होईपर्यंत ही हनी आपल्या ‘प्रेमलीला’ सुरु ठेवते. एकदा या सगळ्या गोष्टी साठवण्यात ती यशस्वी ठरली की मग सुरु होतो पैसे उकळण्याचा ‘धंदा’. अशाचप्रकारे यापूर्वीही तिच्या जाळ्यात काहीजण अडकले होते व शहरात त्याची जोरदार चर्चाही झाली होती.

मध्यंतरीच्या काळात जवळे कडलग येथील एक पदाधिकारीही अशाच प्रकारच्या मात्र चक्क शासकीय सेवेत असलेल्या एका ‘हनी’च्या जाळ्यात अडकले होते आणि त्यातून सुटका करुन घेण्यासाठी त्यांना तब्बल 70 लाखांचे घबाड तिच्यावर ओतावे लागले होते. तर, मध्यंतरी याच हनीने एका सामाजिक कार्यकर्त्यालाही आपल्या जाळ्यात गुरफाटले होते. मात्र त्यानेही इभ्रत वाचवण्यासाठी होते ते तिच्या पदरात टाकून आपली सुटका करवून घेतली होती. या सगळ्या घटनांमधून स्वतःला प्रतिष्ठीत म्हणवून घेणारे बोध घेतील व शहाणे होतील असा सर्वसामान्यांचा समज होता, मात्र आता चक्क डॉक्टरलाच आपल्या प्रेमपाशात अडकवून संगमनेरच्या ‘त्या’ हनीने तो पूर्णतः फोल ठरवला आहे.

गेली दोन वर्ष जगाने महामारीचा हाहाकार अनुभवला. या कालावधीत संगमनेर शहर म्हणजे कोविड उपचारांचे जिल्ह्यातील मोठे ‘हब’ बनले होते. संगमनेरातील अनेक रुग्णालये या कालावधीत कोविड बाधितांनी अक्षरशः ओसांडून वाहत होती. या कालावधीत संगमनेरातील वैद्यकीय क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली हे कोणापासूनही लपून राहिलेले नाही. त्यामुळे आपले सौंदर्य आणि उच्च राहणीमानाच्या प्रदर्शनातून प्रतिष्ठितांना सहज हेरणार्या या ‘हनी’ने वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी जाळे अंथरले होते. मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर तिच्या जाळ्यात शहरातील एक नामांकित डॉक्टर फसले.

एकमेकांशी ओळख झाल्यानंतर मोबाईलवरील संभाषण, एकमेकांशी संदेशाची देवाण-घेवाण आणि नंतर वाढलेली जवळीक यातून ‘त्या’ वैद्यराजाकडून पैसे उकळण्याइतके ‘मटेरियल’ जमा होताच तिने आपला ‘रंग’ दाखवला. त्यातून तिच्या प्रेमाला भुललेल्या ‘त्या’ डॉक्टरांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यांना आपले पद, प्रतिष्ठा आणि कौटुंबिक संबंधाची जाणीव झाल्यानंतर या जाळातून सुटण्यासाठी त्यांची धडपड सुरु झाली. मात्र त्यासाठी त्यांना थोडी न् थिडकी तब्बल चाळीस लाख रुपयांची रक्कम मोजावी लागल्याची जोरदार चर्चा सध्या संगमनेरात सुरु आहे. त्या हनीला अपेक्षित असलेली तडजोड करुन या वैद्यराजांनी आपली सुटका करुन घेतली असली तरीही त्यातून या हनीचे कारनामे थांबणार नसल्याने प्रतिष्ठेचा बुरखा पांघरुन समाजात वावरणार्यांनी वेळीच सावध व्हायला हवे इतका सल्ला यानिमित्ताने आम्ही देवू शकतो.

जनमानसात घडणार्या चर्चांना हात-पाय नसतात असे सांगितले जाते. मात्र दैनिक नायकने कधीही सनसनी निर्माण करण्यासाठी तशा प्रकारचे वृत्त कधीही प्रसिद्ध केलेले नाही. या प्रकरणाबाबत मिळालेल्या माहितीचा स्त्रोत अत्यंत विश्वासार्ह आणि ‘त्या’ वैद्यराजांच्या वर्तुळातीलच असल्याने आम्ही सदरचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. अशाप्रकारच्या वृत्तातून शहराची बदनामीही होते हे वास्तव असले तरीही त्यातून चांगली माणसं फसवली जावू नयेत व त्यांच्यावर अशाप्रकारचे प्रसंग ओढावू नयेत यासाठी अशा घटना समाजासमोर येण्याची गरज लक्षात घेवूनच सदरचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.

