हवाल्याच्या कारणावरुन नगरसेवकाची ‘दमबाजी’! संगमनेरातील प्रकार; पोलिसांची भूमिकाही संशयास्पद..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
हवाल्याच्या माध्यमातून दिलेल्या पैशांना केवळ साक्षीदार असताना त्याच्या वसुलीसाठी चक्क माजी नगरसेवकाकडून मध्यस्थालाच शिवीगाळ करण्यात आली. भरदुपारी आणि भररस्त्यात घडलेल्या या घटनेत नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या ‘त्या’ माजी नगरसेवकाने फिर्यादीचा मोबाईलही काढून घेतला. यावेळी त्याने हवाल्याच्या माध्यमातून दिलेले अडीच लाख रुपये मिळाले नाहीत तर *** अशी धमकी भरीत त्या मध्यस्थाचा पानउताराही केला. नाहक अपमानित झाल्याने संतापलेला मध्यस्थ न्यायाच्या अपेक्षेने पोलीस ठाण्यात पोहोचला. मात्र दिलासा मिळण्याऐवजी पोलिसांनी त्यालाच दोनतास ताब्यात घेतल्यागत दाबून ठेवले. सरतेशेवटी या मध्यस्थाची ‘मध्यस्थी’ करण्यासाठी दोन माजी नगरसेवकांसह एका राजकीय पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्षांची एंन्ट्री झाली आणि प्रकरणं मिटलं. मात्र या प्रकरणातून ‘त्या’ माजी नगरसेवकासह पोलिसांची भूमिकाही संशयाच्या दृष्टीस आली आहे.


झालं असं की, कधीकाळी एका समाजाचे नेतृत्त्व म्हणून संगमनेरच्या राजकारणात प्रवेश करणार्‍या एका माजी नगरसेवकाने आपल्या कारकीर्दीत अनेक कारनामे केले. त्याची चर्चा आणि प्रकारणं आजही प्रसंगानुरुप चर्चीली जातात. खुद्द त्यांच्या समाजातील संस्थांमध्येही त्यांनी अशाच पद्धतीचे राजकीय डावपेच टाकल्याची अनेक उदाहरणे आहेत. पालिकेतही त्यांचा कारभार शुभ्र नव्हता, त्यामुळे नेहमीच ते चर्चेत राहिले. अशा या महाशयांचे राजकारणाशिवायचे उद्योगही अनेक आहेत. त्यातीलच हवाल्याचा हा प्रकार.


या महाशयांनी शहराच्या दक्षिणेकडील जुन्याभागात राहणार्‍या एका व्यावसायिकाला बुधवारी (ता.10) दुपारी साडेचारच्या सुमारास नायकवाडपूरा परिसरात भररस्त्यात अडवले. एकमेकांची नजरानजर होताच दोघांमध्ये हमतरीतुमरी सुरु झाली. माजी नगरसेवक असलेल्या या महाशयांनी भररस्त्यातच अतिशय घाणेरड्या भाषेत शिव्या देत त्याचा पानउतराही केला. यावेळी त्याने झटापट करीत त्या व्यावसायिकाच्या खिशातील मोबाईलही काढून घेतला आणि माझे पैसे मिळाले नाहीत तर *** चशी धमकीही भरली. हा सगळाप्रकार दिवसाढवळ्या आणि भररस्त्यात सुरु होता, त्यामुळे बघ्यांची संख्याही मोठी होती. त्यामुळे त्या व्यावसायिकाच्या मनात अपमान झाल्याची भावना निर्माण झाली.


प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. नुकतेच 1 जुलैरोजी पोलिसांनी मोठा गाजावाजा करीत नवीन न्याय कायद्यांचे स्वागत केले. प्रत्यक्षात मात्र हांडे रिकामेच असल्याचे या घटनेत दिसून आले. भररस्त्यात आडवून विनाकारण शिवीगाळ व धमकी देण्याचा प्रकार, तो देखील कशावरुन?, हवाल्याच्या पैशांवरुन. तरीही पोलिसांनी उलट तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणालाच दमात घेतले आणि आरोपीला ताब्यात घेवून डांबतात तसे तब्बल दोनतास बेकायदा दाबून ठेवले. या कालावधीत ‘त्या’ माजी नगरसेवकाने ठाण्यात हजर असलेल्या पोलीस निरीक्षकांच्या दालनात येरझर्‍या घालून तक्रारदरालाच गजाआड करण्याचे षडयंत्र शिजवायला सुरुवात केली होती.


मात्र ऐनवेळी मूळ ‘तक्रारदरा’ची बायकोही पोलीस ठाण्यात अवतरल्याने व त्यानंतर त्याच्याच परिसरातील दोघा माजी नगरसेवकांसह एका राजकीय पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्षांनी मध्यस्थी केली आणि न्याय कायद्यांचा जल्लोश होवून जेमतेम मावळलेल्या दहाव्याच दिवशी खर्‍या कायद्याचे दर्शन घडून या प्रकरणाची सांगता झाली. माजी नगरसेवक असलेल्या या महाशयांचा हवाला व्यवसाय असून त्याने तक्रारदाराला मध्यस्थ ठेवून एकाला अडीच लाख रुपये दिले होते. मात्र त्याची वसुली होत नसल्याने चिडून जावून त्याने मध्यस्थाकडूनच वसुलीसाठी तगादा लावला, त्यातूनच हा प्रकार घडला. या संपूर्ण प्रकरणात पोलीस निरीक्षक ठाण्यात असतानाही तक्रारदाराला मिळालेली वागणूक आणि आरोपीला मिळालेला सन्मान संशयास्पद असून पोलीस ठाण्यात न्याय मिळतो की विकला जातो असाही प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Visits: 6 Today: 2 Total: 15552

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *