अहमदनगर जिल्ह्याने पटकाविला राज्य योगासन स्पर्धेचा किताब! चौदा सुवर्णपदकांची कमाई; पाच खेळाडूंना चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा बहुमान
नायक वृत्तसेवा, संगमनेर
आळंदी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय योगासन व जनरल चॅम्पियनशिप स्पर्धेत अहमदनगरच्या योगासन संघाने अप्रतिम सादरीकरणाच्या जोरावर अजिंक्यपदाचा किताब पटकाविला. एमआयटी शिक्षण संकुलात पार पडलेल्या या स्पर्धेच्या दोन्ही गटात अहमदनगरच्या संघाने योगासनांच्या चारही प्रकारात सरस कामगिरी करतांना चौदा सुवर्ण, सहा रौप्य व चार कांस्यपदकांसह 23 पदकांची कमाई केली. जिल्ह्याच्या संघातील तिघा मुलींसह पाच खेळाडूंना चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा बहुमान देवून सन्मानीत करण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेवर वर्चस्व गाजवणार्या अहमदनगर जिल्हा संघाला जनरल चॅम्पियनशिपचा किताब देवून गौरविण्यात आले. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन व बृहन्महाराष्ट्र योग परिषदेच्यावतीने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
पारंपरिक योगासनांमध्ये मुलींच्या सबज्युनिअर गटात अहमदनगरच्या तृप्ती डोंगरेने पहिला तर नीरल वाडेकर व देवांशी वाकळे यांनी अनुक्रमे चौथे आणि पाचवे स्थान मिळवले. याच प्रकारात मुलांच्या गटातील आर्यन खरात, प्रणव साहु व अंश मयेकर यांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा आणि चौथा क्रमांक पटकाविला. मुलींच्या ज्युनिअर गटात जिल्हा संघातील तन्वी रेडिज व रुद्राक्षी भावे यांनी पहिला व दुसरा तर मृणाली बाणाईतने चौथे स्थान मिळविले. सुमीत बंडाळे, रुपेश सांगे व प्रीत बोरकर यांनी याच प्रकारातील मुलांच्या गटासाठी असलेली तिनही पदके पटकावित या स्पर्धेवर जिल्ह्याचे वर्चस्व निर्माण केले.
मुलींच्या सब ज्युनिअर गटातील कलात्मक प्रकारातही अहमदनगरच्या तृप्ती डोंगरे व नीरल वाडेकर यांनी पहिला व दुसरा क्रमांक मिळवला. याच प्रकारात मुलांच्या गटातील आर्यन खरात व अंश मयेकर यांनीही दुसरे व तिसरे स्थान पटकावताना अहमदनगर जिल्ह्याचा पदक तक्ता हलता ठेवला. मुलींच्या ज्युनिअर गटातही जिल्ह्याच्या संघाने आघाडी घेत रुद्रांक्षी भावे व स्वरा गुजर यांच्या माध्यमातून प्रथम व द्वितीय क्रमांक तर मुलांच्या गटात निबोध पाटील याने पहिला क्रमांक पटकावतांना आपल्या संघाच्या पदकांत भर घातली.
कलात्मक योगासनांच्या दुहेरी प्रकारात सबज्युनिअर गटात तृप्ती डोंगरे व नीरल वाडेकर यांच्या जोडीने सुवर्णपदकासह पहिले स्थान प्राप्त केले. याच प्रकारातील मुलांच्या गटात आर्यन खरात व प्रणव साहु या जोडीनेही सुवर्णपदक मिळवले. मुलींच्या ज्युनिअर गटात तन्वी रेडीज व रुद्रांक्षी भावे तर मुलांच्या गटातील निबोध पाटील व प्रीत बोरकर या जोडीने सुवर्णपदकांसह या प्रकाराचे विजेतेपद पटकावले. योगासनांच्या तालात्मक प्रकारांमध्येही अहमदनगर जिल्ह्याच्या खेळाडूंनी विजयाची घोडदौड कायम राखतांना पदकांची लयलुट केली.
मुलींच्या ज्युनिअर गटातील तृप्ती डोंगरे व देवांशी वाकळे या जोडीने या प्रकारातील सुवर्णपदक मिळवले. मुलांच्या दुहेरी गटात नानक अभंग व अंश मयेकर यांनी पहिले स्थान पटकाविले, तर यश लगड व तन्मय म्हाळणकर या जोडीला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तालात्मक योगासनांच्या ज्युनिअर गटातही अहमदनगरच्या संघातील गीता शिंदे व स्वरा गुजर यांनी तर मुलांच्या गटातील रुपेश सांगे व सुमीत बंडाळे यांनी सुवर्णपदके मिळविताना अहमदनगरच्या योगासन संघाला राज्यस्तरीय स्पर्धेच्या विजेतेपदासह जनरल चॅम्पियशिपचा किताबही मिळवून दिला. या संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी बजावणार्या तृप्ती डोंगरे, तन्वी रेडिज, रुद्राक्षी भावे, सुमीत बंडाळे व निबोध पाटील यांना चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा बहुमान देत गौरविण्यात आले.
आळंदी येथील एमआयटी शिक्षण संस्थेच्या क्रीडा संकुलात पार पडलेल्या या स्पर्धेसाठी एमआयटी विश्व शांती विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड यांच्या मार्गदर्शनाखाली योग विभाग प्रमुख प्रा. डॉ. निरंजन खेरे यांनी विशेष परिश्रम घेतले. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बापू पाडळकर, सचिव डॉ. संजय मालपाणी, पुणे जिल्हा क्रीडाधिकारी महादेव कासगवारे, बृहन्महाराष्ट्र योग परिषदेचे सचिव डॉ. अरुण खोडस्कर व डॉ. सुनंदा राठी यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. सतीश मोहगावकर यांनी या स्पर्धेच्या तांत्रिक समितीची, राजेश पवार यांनी स्पर्धा संयोजनाची तर नीलेश पठाडे यांनी तंत्रज्ञान समितीची जबाबदारी सांभाळली. सुमारे साडेपाचशे खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धांचे परीक्षण 65 पंचांनी केले.
राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचा किताब पटकविणार्या अहमदनगर जिल्ह्याच्या संघातील सर्व योगासन खेळाडू संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचे विद्यार्थी आहेत. योगासनांचा खेळात समावेश झाल्यापासून देशभरात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत एकामागून एक किताब पटकाविणार्या या सर्व योगासन खेळाडूंनी राज्यासह अहमदनगर जिल्ह्याचा बहुमान वाढविला आहे.