पंढरीला जाण्यासाठी समूह नोंदणी केल्यास थेट गावातून बस! एस.टी.महामंडळाचा निर्णय; ‘प्रवाशी व पालक दिन’ही करणार साजरा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून ‘अच्छे दिन’ प्राप्त झालेल्या राज्य परिवहन महामंडळाने अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या उपायायोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतिकं असलेल्या पंढरपूरच्या वारीसाठी अतिरिक्त बसेसची व्यवस्था केल्यानंतर आता महामंडळाने आषाढी एकादशीसाठी राज्यातून तब्बल पाच हजार बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे आगाराच्या कार्यक्षेत्रातील ज्या गावांमधून 40 अथवा त्याहून अधिक प्रवाशांची एकत्रित मागणी असेल थेट त्या गावातूनच बस सोडण्यात येणार आहे. त्यासाठी समूह नोंदणी करणं आवश्यक असून अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक व महिला सन्मान योजनेतील पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ घेणार आहे. या शिवाय अधिक चांगली सुविधा देण्याच्या उद्देशाने महामंडळाकडून ‘प्रवासी राज दिन’ व ‘कामगार पालक दिना’चेही आयोजन करण्यात आल्याची माहिती संगमनेरचे आगारप्रमुख प्रशांत गुंड यांनी दिली.

सतत तोट्यात असणार्‍या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने गेल्याकाही वर्षात कात टाकण्यास सुरुवात केली असून खासगी वाहतुकदारांशी स्पर्धा करताना एसटीच्या ताफ्यात शिवशाहीसारख्या वातानुकुलित गाड्यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच महामंडळाकडून गेल्या अनेक वर्षांपासून 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्ध्या तिकिटांत प्रवासाची सवलत सुरु असताना दोन वर्षांपूर्वी 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळाच्या सर्व गाड्यांमधून मोफत प्रवास आणि गेल्या वर्षीपासून सरसकट सर्व महिलांनाही अधेर्र् तिकिट आकारुन प्रवास करण्याची सवलत देण्यात आली आहे. या योजनांचा महामंडळाला मोठा फायदा झाला असून आर्थिक स्थितीतही सुधारणा झाल्या आहेत.


त्यामुळे उत्साह संचारलेल्या परिवहन महामंडळाने विविध योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक प्रवाशांना आपल्याकडे आकर्षिक करण्यासाठी एकामागून एक योजनांची श्रृंखलाच उभी केली असून त्यात आता ‘पंढरपूर विशेष’ या सवलतीचाही समावेश झाला आहे. या अभिनव योजनेसंदर्भात राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी राज्यातील सर्व 31 विभागीय कार्यालयांना आदेश बजावले असून कोणत्याही गावातून 40 अथवा त्या पेक्षा अधिक प्रवाशांनी पंढरपूरसाठी समूह नोंदणीची मागणी केल्यास त्याची पूर्तता करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यासोबतच या ‘विशेष योजने’त महामंडळाच्या ज्येष्ठ नागरिक (अर्धे तिकिटं), अमृत ज्येष्ठ नागरिक (मोफत) आणि महिला सन्मान (अर्धे तिकिटं) या योजनेतील लाभार्थी त्यांच्या सध्याच्या लाभासह सहभागी होवू शकतील.


राज्य परिवहन महामंडळाने यंदाच्या आषाढी एकादशीसाठी जास्तीतजास्त भाविकांना सुखरुप आणि सुरक्षित प्रवासाच्या माध्यमातून पंढरीची वारी घडवण्याची योजना आखली आहे. त्यासाठी राज्यातील 31 विभागीय नियंत्रण कार्यालयांमार्फत यात्रा विशेष म्हणून तब्बल पाच हजार बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. आवश्यकता भासल्यास या संख्येत वाढ करण्याची तयारीही ठेवण्यात आली आहे. संगमनेर आगारातून दरवर्षी आषाढी एकादशीला 10 ते 15 बसेस सोडण्यात येतात. तर, वारीच्या कालावधीत अर्थात आषाढाची सुरुवात झाल्यानंतर सरासरी 3 ते 4 बसेस नियमितपणे पंढरपूर मार्गावर धावत असतात. संगमनेर आगारात एकूण 65 बसेस असून त्यातील 25 बसेस यावर्षी पंढरपूर यात्रेसाठी गृहीत धरण्यात आल्या आहेत.


भाविकांचा प्रवास अपघा निरहित घडावा यासाठी महामंडळाने ग्रामीणभागातील नागरिकांना मोठा दिलासा देणारी योजनाही यात्रा कालावधीसाठी लागू केली आहे. या नूतन योजनेनुसार कोणत्याही गावातील 40 अथवा त्याहून अधिक भाविकांनी समूह नोंदणी (ग्रुप बुकिंग) केल्यास त्यांना बसस्थानकात येण्याची गरज असणार नाही. महामंडळाची बस त्या गावातूनच सुटेल आणि पुन्हा त्या गावांतच प्रवाशांना सोडेल. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ पूर्वीच्या अर्ध्या आणि मोफत सवलतीच्या लाभार्थ्यांनाही मिळणार आहे. थोडक्यात 75 वर्षांवरील 40 ज्येष्ठ नागरिकांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांच्यासाठी पूर्णतः मोफत तर, 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व महिलांना अर्ध्या सवलतीमध्ये बसचे आरक्षण करता येईल. या योजनेतून महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणार्‍यांची संख्या वाढेल अशी अपेक्षा
महामंडळाला आहे.


यासोबतच प्रवाशांचा थेट संपर्क येणार्‍या बसस्थानकांमधील सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी महामंडळाकडून ‘प्रवासी राजा दिन’ आणि ‘कामगार पालक दिन’ साजरा करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. 15 जुलैपासून प्रत्येक आगारात राबवल्या जाणार्‍या या प्रयोगातून प्रवाशांच्या समस्या, तक्रारी व सूचना जाणून त्यानुसार बदल करण्याचा प्रयत्न केला जाईल. स्थानिक पातळीवरुन निराकरण होणार्‍या गोष्टी तत्काळ निकाली काढल्या जातील. आठवड्याच्या दर सोमवार व शुक्रवार अशा दोन दिवस हा उपक्रम राबवला जाईल. प्रवाशांसोबत महामंडळाच्या असंख्य कामगारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ‘कामगार पालक दिन’ ही संकल्पना मांडण्यात आली आहे. प्रवाशांप्रमाणेच त्यांच्याही समस्या व अडचणी सोडवण्याचा प्रयत्न होईल. कामगार संघटनांची बाजूही समजावून घेतली जाईल. या कार्यक्रमांना विभागीय नियंत्रकांनी उपस्थित रहावे असे स्पष्ट निर्देश महाव्यवस्थापकांनी आपल्या आदेशात दिले आहेत. संगमनेरला सोमवार 29 जुर्लैरोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत हा उपक्रम राबवला जाणार आहे.


राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून सुरक्षित प्रवासाचा विश्‍वास असतो. महामंडळाच्या निर्णयानुसार आषाढी एकादशीच्या निमित्ताने संगमनेर बस आगारातून 25 बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तालुक्यातील कोणत्याही गावातील 40 पेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित नोंदणी केल्यास त्यांच्या गावातून बस सोडण्यात येईल. या योजनेत यापूर्वीच्या सवलत योजनेतील लाभार्थीही पात्र आहेत. यात्रेपूर्वीही आगारातून रोज तीन ते चार बसेस पंढरपूर मार्गावर सुरु आहेत. प्रवाशांच्या संख्येनुसार त्यात वाढ केली जाईल. अधिकाधिक भाविकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधूनच प्रवास करावा, आम्ही आपल्या सेवेत तत्पर आहोत.
प्रशांत गुंड
आगार व्यवस्थापक, संगमनेर

Visits: 25 Today: 1 Total: 79373

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *