प्रतिथयश व्यापारी मनोज भंडारी यांचे निधन! मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु असतांना घेतला अखेरचा श्‍वास..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील साई मार्बल्स या दालनाचे संचालक मनोज फुलचंद भंडारी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्या दरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. तरुण, तडफदार आणि हसतमुख व्यक्तिमत्त्व म्हणून ते संगमनेरात परिचयाचे होते. त्यांच्या निधनाने संगमनेरकर एका उमद्या तरुण व्यावसायिकाला मुकले आहेत.

संगमनेरातील भंडारी परिवार म्हणजे सर्वपरिचित असा आहे. समाजातील सर्व घटकांशी जिव्हाळ्याचे नाते असलेल्या या परिवाराने प्रामाणिकता आणि चिकाटीच्या जोरावर उद्योग व व्यवसायात मोठी भरभराट केली. संगमनेरची विकासाच्या दिशेने घोडदौड सुरु असतांना दोन दशकांपूर्वी श्रीनिवास व मनोज भंडारी या बंधुंनी शहरात साई मार्बल्स नावाने बांधकाम साहित्याचे मोठे दालन सुरु केले होते. त्या माध्यमातून शहरातील असंख्य नव्या वास्तुत त्यांच्याच दालनातील आकर्षक फरशा व अन्य साहित्य वापरले गेले.

तीन वर्षांपूर्वी त्यांनी भागीदारीतून कृष्णा टेक्सटाईल्स नावाचे कापडांचे दालनही सुरु केले. त्यालाही ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. साईबाबांवर निस्सीम श्रद्ध असलेल्या या परिवाराने आयुष्यभर आपल्या गोडवाणीतून माणसे जोडली, त्यात मनोज भंडारी यांचा मोठा वाटा होता. सतत हसतमुख राहणार्‍या मनोज भंडारी यांनी कमी वयातच व्यावसायिक उंची गाठण्यासह मोठा मित्रवर्ग निर्माण केला होता. गेल्या महिन्याभरापासून त्यांना आरोग्य विषयक समस्यांनी ग्रासल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असतांनाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, दोन मोठे भाऊ, भावजया व पुतणे असा मोठा परिवार आहे.

मुंबईतून त्यांचे पार्थीव संगमनेरात आणले जात असून सायंकाळी पाच वाजता येथील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मनोज भंडारी यांच्या अकस्मात निधनाने त्यांच्या परिवारासह मित्रमंडळींना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उद्योगपती राजेश मालपाणी यांच्यासह अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे.

Visits: 3 Today: 1 Total: 29594

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *