मताधिक्क्य देणार्‍या संगमनेरचा ‘भाऊसाहेबांना’ विसर! पुणे-नाशिक रेल्वेसाठी पुढाकाराची अपेक्षा; मागणी मात्र श्रीरामपूर-परळीची..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिर्डी लोकसभेच्या सहा विधानसभा मतदारसंघातील केवळ अकोले आणि संगमनेर विधानसभा मतदार संघांनी मताधिक्क्य दिल्याने उद्धवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे दुसर्‍यांदा लोकसभेत पोहोचले. त्यामुळे या दोन्ही मतदार संघातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावलेल्या असताना त्यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या निवेदनातून मात्र त्याला फाटा देत केवळ ‘श्रीरामपूर-परळी’ रेल्वेमार्गाचा आग्रह धरल्याने संगमनेरात नाराजी निर्माण झाली आहे. पुणे-नाशिक व्हाया संगमनेर या रेल्वेमार्गाची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे. रेल्वेबोर्डाच्या मंजुरीनंतर या रेल्वेमार्गासाठी तिनही जिल्ह्यातून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरु झाली आहे. मात्र अचानक ‘खर्चिक’ असल्याची बाब समोर करुन नियोजित रेल्वेमार्गात बदल करुन तो शिर्डीकडे वळवण्याचा घाटही घातला जात आहे. अशावेळी दुसर्‍यांदा लोकसभेत जाण्याचा मार्ग विस्तृत करणार्‍या संगमनेरच्या मागणीकडे दुर्लक्ष करुन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ‘श्रीरामपूर-परळी’ रेल्वेमार्गाचा विषय पुढे रेटल्याने संगमनेरात नाराजी पसरली आहे.


दोन दिवसांपूर्वी खासदार वाकचौरे यांनी दिल्लीत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची घेतली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी शहापूर-घोटी, अकोले-संगमनेर या राज्यमार्गासह श्रीरामपूर-नेवासा-शेवगाव राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषित करुन तातडीने या रस्त्यांच्या चौपदरीकरणाच्या कामाला भरीव निधी देण्याची मागणी केली. वाकचौरे 2009 साली पहिल्यांदा लोकसभेत पोहोचले तेव्हा त्यांनी अकोले-शहापूर व्हाया तोलारखिंड मार्गाची जोरदार मागणी लावून धरली होती. मात्र या मार्गात कळसूबाई-हरिश्‍चंद्रगड अभयारण्याचा इको-सेन्सिटीव्ह झोनही येत असल्याने त्यांच्या त्यावेळच्या मागणीला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्याच कार्यकाळात त्यांनी शिर्डी-शहापूर व्हाया संगमनेर-अकोले अशा रेल्वेमार्गाची मागणीही केली होती.


मात्र त्यानंतरच्या सलग दोन निवडणुकांमध्ये अवेळी केलेल्या पक्षांतराचा फटका बसून त्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांनी मांडलेल्या या मार्गांसह रेल्वेमार्गाचाही विषय मागे पडला. त्यातच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सगळे अंदाज फोल ठरवित त्यांनी पुन्हा लोकसभा गाठली. त्यांच्या या यशात सर्वात मोठा 54 हजार 379 मतांचा वाटा एकट्या अकोले विधानसभेने तर त्या खालोखाल 30 हजार 573 मतांचा निर्णायक वाटा संगमनेर विधानसभा मतदार संघाने उचलला. या दोन्ही विधानसभा मतदार संघांनी भरभरुन मतदान करताना त्यांच्या पारड्यात टाकलेल्या 84 हजार 952 मताधिक्क्याच्या बळावरच ते दुसर्‍यांदा लोकसभेत पोहोचले. मात्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेल्या पहिल्याच मागणीत या दोन्ही तालुक्यांचा कायापालट करणार्‍या प्रकल्पाला एकप्रकारे तिलांजली देत भलत्याच मागणीला जोर लावल्याने संगमनेर तालुक्याने दिलेल्या प्रचंड मताधिक्क्याचा त्यांना विसर पडलाय की काय अशी शंका उपस्थित झाली आहे.


अर्थात श्रीरामपूर-बीड-परळी या रेल्वेमार्गाला ब्रिटीशांनी मंजुरी देत या रेल्वेमार्गाच्या भुसंपादनासह मार्गाच्या अस्तरीकरणाचे कामही सुरु केले होते. त्यावेळी या मार्गावरुन औद्योगिक विकास साधण्याची आणि त्यातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळवण्याची ब्रिटीश सरकारची योजना होती. मात्र स्वातंत्र्यानंतर हा विषय मागे पडून या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे महत्त्वही कमी झाले. तर गेल्या तीन दशकांपासून पुणे-नाशिक व्हाया संगमनेर या नवीन रेल्वेमार्गाचा विषय समोर येवून त्याची मागणीही होवू लागल्याने वेगवेगळ्या अडथळ्यांची शर्यत पार करीत अखेर केंद्र व राज्य सरकारने या प्रकल्पाला मंजुरीही दिली. राज्यातील सत्तेत राष्ट्रवादीचा समावेश झाल्यानंतर उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवार यांनीही या प्रकल्पाला वेग देण्यासाठी आढावा बैठकांचा धडाका लावला.


केंद्रीय रेल्वेबोर्ड आणि राज्य सरकारच्या प्रत्येकी 20 टक्के सहभागासह 60 टक्के खासगी क्षेत्रातून प्रस्तावित असलेल्या आणि नाशिक, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त तालुक्यांच्या विकासात मैलाचा दगड ठरु पाहणार्‍या या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षणासह रेखांकन आणि प्रत्यक्ष भूसंपादनाची प्रक्रियाही सुरु झाली. मात्र अचानक मध्यंतरी राज्य शासनाकडून हा प्रकल्प बासनात गुंडाळून राजगुरुनगरपासून शिर्डीकडे वळवण्याचा घाट घालण्यास सुरुवात झाल्याने संगमनेर तालुक्यात मोठी नाराजी निर्माण झाली आहे. त्यातच आता खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही आपल्याला मिळालेल्या मताधिक्क्याचा विसर पडल्यागत या रेल्वेमार्गाला फाटा देत पंतप्रधानांकडे ‘श्रीरामपूर-बीड-परळी‘ रेल्वेमार्गाचा आग्रह धरल्याने संगमनेरकरांच्या नाराजीत भर पडली आहे.


श्रीरामपूर-परळी रेल्वेमार्ग व्हायलाच हवा, त्याला विरोध असण्याचे कारण नाही. मात्र ज्या रेल्वेमार्गाचे प्रत्यक्षात भूसंपादन सुरु आहे, शेकडों हेक्टर जमिनी थेट खरेदीखताद्वारा शासनाने घेतल्या आहेत, त्या बदल्यात कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत त्या मार्गाकडे दुर्लक्ष करणं संगमनेरकरांच्या पचनी पडलेले नाही. या रेल्वेमार्गामुळे संगमनेर तालुक्यातील दुष्काळी भागांचा कायापालट होण्यासह बेरोजगारी, शेती उत्पादन व व्यापार या सारख्या विषयांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे खासदारांनी मिळालेल्या मताधिक्क्याची जाण ठेवून त्यांच्या कार्यकाळात हा बहुप्रतिक्षीत पुणे-नाशिक व्हाया संगमनेर रेल्वेमार्ग तडीस नेण्यासाठी झोकून देण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रीया आता संगमनेरातून समोर येत आहेत.


तीन जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांचा कायापालट करणार्‍या ‘पुणे-नाशिक’ व्हाया संगमनेर सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाची मागणी गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून होत आहे. सध्या या मार्गासाठी ‘महारेल’कडून भूसंपादनाची प्रक्रियाही राबवली जात आहे. मात्र असे असतानाही राज्य शासनाकडून ‘खर्चिक’ असल्याचे कारण पुढे करुन हा मार्ग शिर्डीकडे वळवण्याची चाचपणी सुरु झाल्याने जुन्नर, आळेफाटा, संगमनेर व सिन्नर तालुक्यातील नागरिकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी नागरिकांच्या मागणीचा विचार करुन या रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा करण्याची आणि तो तडीस नेण्याची मागणी आता पुढे येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *