म्हाळादेवी येथे मायलेकीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू परिसरातून हळहळ; अकोले पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील म्हाळादेवी येथे गुरुवारी (ता.22) दुपारी प्रवरा नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आईचा मृतदेह सापडला. मात्र तीन वर्षीय चिमुरडीचा मृतदेह सापडण्यास अंधार पडल्याने अडथळे आले. त्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू केली असता साडेनऊ वाजेच्या सुमारास चिमुरडीचा मृतदेह सापडला.
पूनम किरण भोसले (वय 27, रा. कोल्हार खुर्द) व आर्या किरण भोसले (वय 3) अशी मृतांची नावे आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी की, पूनम भोसले या माहेरी आपले वडील नारायण महादू संगारे यांच्याकडे म्हाळादेवीला आल्या होत्या. गुरुवारी दुपारी पूनम व त्यांची मुलगी आर्या कपडे धुण्यासाठी स्मशानभूमीलगत असलेल्या धोबी घाटावर गेल्या होत्या. तर वडील नारायण हे अकोले येथे आठवडे बाजारात गेले होते. ते दुपारी चार वाजता घरी आल्यानंतर लेक व नात घरी दिसली नसल्याने त्यांनी शोधाशोध केली.
त्यांनी तत्काळ धोबी घाटावर धाव घेतली. तेथे त्यांना मायलेकींच्या चपला व धुण्यासाठी आणलेले कपडे दिसले. त्यानंतर गावकर्यांनी प्रवरा नदीत शोध घेतला असता, पूनम भोसले यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात पाठविला. परंतु, आर्याचा मृतदेह शोधण्यासाठी अंधार पडल्यामुळे अडथळे येत होते. त्यामुळे शोधमोहीम थांबविली. शुक्रवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू केली असता साडेनऊ वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह सापडला. कामगार पोलीस पाटील अशोक संगारे यांनी दिलेल्या खबरीवरुन अकोले पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.