वाळूमाफियांचे पाठीराखे कोण हे जिल्ह्याला माहितीये ः कानवडे आमदार थोरातांच्या टीकेला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आमदार बाळासाहेब थोरात हे दीड महिना दवाखान्यात उपचार घेऊन प्रथमच संगमनेरला आले असता थोरात समर्थकांनी त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला होता. या दरम्यान थोरात यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर टीका करताना म्हटले की, अहमदनगर जिल्ह्यात सध्या दहशतीचे राजकारण सुरू आहे, वाळूमाफियांची पाठराखण केली जात आहे, पक्ष अडचणीत असताना दुसर्या पक्षात निघून गेले. अखेर मी एकट्याने खिंड लढवली असा घणाघात विखे-पाटील यांच्यावर केला. याला भाजपचे तालुकाध्यक्ष सतीष कानवडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महसूल व पालकमंत्री पदाची धुरा हाती घेताच संगमनेर तालुक्याला कधी नव्हे इतका भरघोस निधी मंजूर केला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी जलजीवन मिशन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या योजनांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे. दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत शेकडो गावांना निधी मंजूर करुन आणत सध्या काम सुरू आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून विविध गावांना जोडणारे रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण होत आहे असे विकासाचे समाजकारण विखे-पाटील यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात होत आहेत. याचाच धसका आमदार बाळासाहेब थोरात यांनी घेतला असावा म्हणूनच अशी बोचरी टीका होत आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या माध्यमातून राज्यात गौण खनिज उत्खननासाठी प्रथमच ऑनलाइन प्रणाली विकसित करुन होत आहे. यामुळे शासनाच्या महसूलात वाढ होऊन पारदर्शकता येईल. बगलबच्यांची गुन्हेगारी, मक्तेदारी संपुष्टात येणार आहे. सर्वाधिक काळ महसूल मंत्री पदावर थोरात असताना प्रचंड गुन्हेगारी फोफावली होती. सर्वसामान्य जनतेपासून ते शासकीय अधिकार्यांना आमदार थोरात यांच्या कार्यकाळात जीव मुठीत धरून काम करावे लागत असे. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी यांच्यावर अनेकदा प्राणघातक हल्ले झाले. महसूल कर्मचारी व अधिकार्यांच्या अंगावर वाहने घालण्याचे काम तुमच्या काळात झाले, इतकी दहशत त्या कार्यकाळात माजली होती. सध्या असा प्रकार विखे-पाटील यांच्या काळात कधीच झाला नाही आणि होणारही नाही अशी संगमनेरकरांना खात्री आहे. वाळूमाफियांचे, अवैध उत्खनन करणार्यांचे पाठीराखे कोण आहेत आणि दहशतीचे राजकारण करणारे कोण आहे हे संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे असा टोलाही कानवडे यांनी लगावला आहे.
