मुलांनो बुढ्ढीकें बाल खरेदी करताय? सावधान! विषारी रंगाचा होतोय वापर; अन्न व औषध प्रशासन मात्र झोपेत..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पूर्वीपासून यात्रा-जत्रांसह शाळांच्या परिसरात सहज मिळणार्या बुढ्ढीकें बाल अर्थात कॉटन कँडीच्या माध्यमातून मुलांना चक्क साखरेतून ‘विष’ देण्याचा अतिशय संतापजनक प्रकार संगमनेरातून समोर आला आहे. घासबाजार परिसरात हातगाडीवरुन विक्री होणार्या मुलांच्या या आवडत्या पदार्थात सदरील विक्रेता चक्क रंगपंचमीला वापरला जाणारा घातक रासायनिक रंग मिसळत असल्याची बाब काही जागृक नागरिकांच्या लक्षात आली. याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता ‘त्या’ विके्रत्याने ‘आम्ही हेच रंग वापरतो आणि ते खाण्यासाठी वापरले जातात’ असे उद्दाम उत्तर देतं प्रश्न उपस्थित करणार्यांना टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र हा रंग खाल्ल्याने मुलांवर किती गंभीर परिणाम होवू शकतात याची कल्पना असल्याने तेथे जमलेल्या नागरिकांनी विक्री बंद करण्यास भाग पाडीत त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. शहर पोलिसांनीही त्याचा संपूर्ण माल जप्त करुन त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियमातंर्गत कारवाई केली आहे.
गेल्याकाही दिवसांपासून शहरातील वेगवेगळ्या शाळा, देवालयंं व गर्दीच्या ठिकाणी इंग्रजीत कॉटन कँडी म्हणून तर मराठीत म्हातारीचे केस म्हणून ओळखल्या जाणार्या व साखरेपासून तयार केल्या जाणार्या पदार्थाचे विक्रेते दृष्टीस पडत आहेत. बांबूच्या काडीला कापसाप्रमाणे गुंडाळलेला आणि केवळ मुलंच नव्हेतर मोठ्यांच्याही जीभेला पाणी सोडणारा हा पदार्थ गेली अनेक वर्ष अबालवृद्धांमध्ये चवीने खाल्ला जातो. पांढर्या साखरेचे दाणे तप्त झालेल्या भांड्यातील फिरत्या मशिनवर टाकून त्याला गुलाबी रंग यावा यासाठी खाण्याचा (जिलेबीचा) रंग त्यावर भुरकावला जातो. आजवर अशीच पद्धत कायम असताना संगमनेरात सध्या हा पदार्थ विकणारे मात्र लहान मुले आणि नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे समोर आले आहे.
घासबाजार परिसरात असाच एक बुढ्ढीचे बाल विकणारा इसम हातगाडी लावून हा पदार्थ तयार करीत होता. या परिसरात सराफ विद्यालयासह, ओहरा कॉलेज, आदर्श व अहिल्यादेवी होळकर विद्यालय आहेत. त्यामुळे घासबाजार परिसरात नेहमीच विद्यार्थी व लहान मुलांची वर्दळ असते. सदरील इसम बुढ्ढीकें बाल तयार करीत असताना जवळच बसलेल्या काही नागरिकांची नजर त्याच्यावर खिळली. तापलेल्या भांड्यात साखरेचे दाणे टाकल्यानंतर त्याने इकडेतिकडे बघत हळूच प्लॅस्टिकच्या पिशवीत हात घालून डब्यातील रंग काढला व तो पाहणार्यांची नजर चुकवून ‘त्या’ भांड्यात टाकला. त्यामुळे तयार होणारा पांढरा पदार्थ गुलाबी झाला आणि तो घेण्यासाठी मुलांची गर्दीही होवू लागली.
मात्र बराचवेळ या विक्रेत्याचा हा सगळा उद्योग पाहून काही नागरिकांना शंका आल्याने त्यांनी त्याच्याजवळ जावून बुढ्ढीकें बाल गुलाबी होण्यासाठी तो कोणता रंग वापरतोय याची तपासणी केली असता त्यांना धक्काच बसला. त्या इसमाने पिशवीत एक डबा दडवून ठेवला होता, त्या डब्यात जिलेबीचा अथवा खाण्याचा रंग नव्हेतर चक्क रंगपंचमीला वापरला जाणारा आणि अलिकडच्या काळात घातक असल्याने त्याचाही वापर मोठ्या प्रमाणात कमी झालेला रंग असल्याचे व त्याचाच वापर तो करीत असल्याचे समोर आले. याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याला या गोष्टीचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचेही दिसून आले.
या रंगामुळे एखाद्याचा जीव जावू शकतो किंवा पोटात गेल्याने कर्करोग होण्याचाही धोका असतो. मात्र त्या विक्रेत्याला त्याच्याशी काही एक घेणं नसल्याचे त्याच्या बोलण्यातून दिसून येताच तेथे जमलेल्या लोकांनी त्याला दुकान बंद करण्यास सांगितले. त्यावेळी त्याने आपण आजवर हाच रंग वापरत असल्याचे सांगत एकप्रकारे आजपर्यंत शेकडों मुलांना रासायनिक घातक रंग खाऊ घातल्याची कबुलीच दिली. इतकं सगळं होवूनही त्याच्या चेहर्यावरील भाव मात्र अढळ होते. त्यामुळे जमलेल्यांचा पारा चढला. यावेळी त्यातील एकाने शहर पोलिसांना कळविले.
त्यानंतर काही वेळातच तेथे पोलिसांचे वाहन पोहोचले. त्यांनी प्राथमिक चौकशी केली असता त्यांना बुढ्ढीकें बालमध्ये रासायनिक गुलाबी रंगाचा सर्रास वापर होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याचे संपूर्ण सामान जप्त करुन त्याला पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनीही विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियमातंर्गत कारवाई करण्यात येवून त्याला चौकशीकामी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या वृत्ताने शहरातील ‘बूढ्ढीके बाल’ विकणारे संशयाच्या फेर्यात आले आहे. मात्र अहमदनगरच्या अन्न व औषध प्रशासनाची झोप अद्यापही मोडलेली नसून कोणी काहीही आणावं आणि मुलांना विकून त्यांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकारही वाढत आहे.
सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या या प्रकरणातील व्हिडिओत बनावट कॉटन कँडी विकणार्या या इसमाकडे स्थानिकांनी वापरल्या जाणार्या रंगाबाबत विचारणा केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवी केली. मात्र काही वेळातच तेथे असंख्य नागरिक गोळा झाल्याने त्याला वापरीत असलेला रंग उघडून दाखवणं भाग पडलं. मात्र त्यानंतरही बोलणार्यांकडे दुर्लक्ष करीत त्याने आपला धंदा सुरु ठेवल्याने अखेर नागरिकांनी पोलिसांना बोलावून त्याला त्यांच्या ताब्यात दिले. त्यावरुन ‘त्या इसमावर कारवाई करण्यात आली आहे.