महिला बचत गटांच्या उत्कर्षासाठी मी खंबीरपणे पाठिशी ः गडाख

महिला बचत गटांच्या उत्कर्षासाठी मी खंबीरपणे पाठिशी ः गडाख
मुकिंदपूर येथील बचत गटांना सुनीता गडाखांच्या हस्ते कर्जाचे वितरण
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील मुकिंदपूर येथील दोन बचत गटांना जिल्हा बँकेने मंजूर केलेल्या कर्जाचे वितरण महिला बचत गटाच्या मार्गदर्शिका सुनीता गडाख यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुक्यात महिला बचत गटांची यशस्वी वाटचाल सुरू असून महिला बचत गटांच्या उत्कर्षासाठीच्या मी महिला सदस्यांच्या मागे खंबीरपणे पाठिशी असल्याचे प्रतिपादन सुनीता गडाख यांनी यावेळी बोलताना केले.

नेवासा बाजार समितीच्या जिल्हा बँकेच्या टाऊन शाखेच्या सभागृहात सामाजिक अंतराचे पालन करत झालेल्या छोटेखानी बचत गटांच्या कर्ज वितरण कार्यक्रमात गडाख या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, पंचायत समितीचे सदस्य विक्रम चौधरी, गटविकास अधिकारी शेखर शेलार, जालिंदर गवळी, दीपक धनगे, तालुका विकास अधिकारी बाळासाहेब वाकचौरे, बचत गटाचे गट समन्वयक व नोडल ऑफिसर विष्णू हारदे, बाबासाहेब हारदे, श्री.चौधरी, अरुण वल्ले उपस्थित होते.
नोडल ऑफिसर हारदे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. तालुक्यातील बचत गटांची त्यांनी माहिती दिली. मुकिंदपूर येथील तुळजाभवानी महिला बचत गटाला तीन लाखांचे तर अन्नपूर्णा महिला बचत गटाला दोन लाख असे एकूण पाच लाखांच्या कर्जाचे वितरण सुनीता गडाख यांच्या हस्ते धनादेशाद्वारे करण्यात आले.

यावेळी बोलताना गडाख म्हणाल्या, नेवासा तालुक्यात महिला बचत गट अग्रेसर आहे. बचत गटाचे कोरोनाच्या महामारीत अनेक प्रकरणे प्रलंबित होती. मात्र परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर गटांच्या कर्ज प्रकरणांच्या कामाला टप्प्याटप्प्याने गती देण्यात येईल, बचत गटांच्या सर्व महिला भगिनी या कष्टाळू असल्याने त्यांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा केला जाईल अशी ग्वाही त्यांनी शेवटी दिली. पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर नोडल ऑफिसर हारदे यांनी आभार मानले. प्रारंभी जिल्हा बँकेच्या अधिकारी वर्गासाठी असलेल्या पन्नास लाख रुपये मेडिक्लेम योजनेचा शुभारंभर् गडाख यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा बँकेमार्फत कोरोनाच्या संकटातही मोठी आर्थिक उलाढाल झाली. सभासदांची गैरसोय होऊ दिली नाही. अधिकार्‍यांच्या या कार्याबद्दल त्यांनी बँकेच्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना धन्यवाद देत आभार मानले.

 

Visits: 17 Today: 1 Total: 117151

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *