संगमनेरकरांना मिळाली ‘मोनोरेल’ची अनुभूती! चालकाचे नियंत्रण सुटले; ‘कार’ तरंगली रस्तादुभाजकावर..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पावसाळ्यात ओल्या होणार्‍या रस्त्यांमुळे वाहनचालकांची कशी तारांबळ उडते हे दाखवणारी घटना बुधवारी रात्री संगमनेरातून समोर आली. रात्री नऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेत मोमीनपूर्‍याकडून नाशिककडे निघालेल्या ‘टाटा सफारी’ या वाहनाच्या चालकाला रस्त्याच्या मधोमध असलेला दुभाजकच दिसला नाही. परिणामी भरधाव वेगाने आलेले हे वाहन थेट रस्तादुभाजकावर चढून जवळपास 15 ते 20 फूट सरळ पुढे गेल्याने हवेतच तरंगले. या वाहनातून काही महिला, मुले व वृद्ध प्रवाशी प्रवास करीत होते, सुदैवाने त्यातील कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र या विचित्र घटनेत अतिशय अलिशान समजल्या जाणार्‍या या कारचे अतोनात नुकसान झाले. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केल्याने अतिशय वर्दळीच्या या रस्त्यावरील वाहतूक काहाकाळ रेंगाळली होती.


संगमनेर व परिसरात काल दुपारपासून रिमझीम पाऊस सुरु होता. त्यामुळे सर्वच रस्ते दिवसभर ओलेचिंब झालेले होते. त्यातच जोशी पॅलेस ते हॉटेल काश्मिरपर्यंतच्या भागात रस्त्यात दुभाजक असले तरीही पथदिव्यांची कोणतीही व्यवस्था नसल्याने आणि बसस्थानक चौक व जोशी पॅलेस या दरम्यान असलेल्या दुभाजकाचे रंग गायब झाल्याने रात्रीच्यावेळी या भागातील दुभाजक लक्षातच येत नाही. त्यातही बुधवारी झालेल्या पावसाने रस्ता आणि दुभाजक एकसारखेच दिसू लागल्याने वाहनचालकांची मोठी तारांबळ उडत असल्याचे दिसत होते.

रात्री नऊच्या सुमारास रिमझीम पाऊस सुरु असतानाच मोमीनपूर्‍यातून नाशिककडे जाणार्‍या टाटा सफारी (क्र.एम.एच.31/एफ.ई.0103) या वाहनाच्या चालकाला रस्तादुभाजक आणि रस्ता यातील फरकच समजला नाही. त्यातच या परिसरात नेहमीप्रमाणे अंधार असल्याने परिस्थिती आणखीनच बिकट होती. त्यामुळे भरधाव निघालेले हे वाहन जोशी पॅलेसच्या बाजूने थेट रस्तादुभाजकावर चढले. यावेळी वाहनाचा वेग अधिक असल्याने चालकाला काही समजण्याच्या आंतच ही अलिशान कार दुभाजकावर मधोमध चढून जवळपास 15 ते 20 फूटांहून अधिक अंतर कापून पुढे गेली आणि दुभाजकावरच तरंगली.


बसस्थानकाचा परिसरात अहोरात्र गजबजलेला असल्याने या अपघाताच्या आवाजाने क्षणात अनेकजणांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व अपघातग्रस्त वाहनातील प्रवाशांना बाहेर काढले. सुदैवाने सदरचे वाहन बळकट असल्याने आतील प्रवाशांना किरकोळ मूकामार वगळता दुखापत झाली नाही, मात्र वाहनाचे अतोनात नुकसान झाले. संबंधितांनी काही वेळातच पर्यायी व्यवस्था करुन दुसरे वाहन बोलावल्यानंतर त्यातून प्रवाशी मार्गस्थ झाले, मात्र अपघातग्रस्त वाहन दुभाजकावरुन बाजूला घेण्यासाठी ‘क्रेन’ बोलवावी लागली. या दरम्याने बघ्यांनीही मोठी गर्दी केल्याने या रस्त्यावरील वाहतूक सुमारे तासभर रेंगाळली होती. दुभाजकावर चढलेले हे वाहन पाहून संगमनेरकरांना ‘मोनोरेल’ची अनुभूती मिळत असल्याची चर्चाही यावेळी मिश्किलपणे सुरु होती.


हॉटेल जोशी पॅलेसपासून हॉटेल काश्मिरपर्यंतच्या रस्त्याच्या मधोमध दुभाजक असले तरीही पथदिव्यांची मात्र वाणवा आहे. त्यातच या भागातील दुभाजक जुनाट आणि पडझड झालेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरील चिखल आणि दुभाजकांचा रंग एकसारखाच दिसत असल्याने वाहनचालकांचा गोंधळ होतो. रात्रीच्यावेळी तर नव्या चालकांचा हमखास गोंधळ उडण्याची शक्यता असते. बुधवारी रात्री घडलेला प्रकारही अशाच गोंधळातून घडला आहे. त्यामुळे या भागातील दुभाजक आता वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असून आणखी एखादी घटना घडण्यापूर्वी या दुभाजकांची दुरुस्ती करुन त्यावर रंगाच्या पट्ट्यांसह दुभाजक सुरु होतात तेथे रेडियमचे फलक लावण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *