प्रवरानगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; सात बंगले फोडले दागिने, रक्कमसह लॅपटॉप चोरला; नागरिकांत भीतीचे वातावरण

नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील प्रवरानगर येथे शनिवारी (ता.12) रात्री सहा ते सात बंगल्यांचे कडी-कोयंडे तोडून घरातील कपाटाची उचकापाचक करून लाखो रुपयांचे दागिने व रोख रकमेसह एक लॅपटॉप चोरीला गेल्याची घटना घडली आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्रवरानगर येथील प्रवरा डावा कालव्याच्या कडेला असणार्‍या कारखाना परिसरातील ए टाईप व बी टाईप कॉलनीमधील सहा ते सात बंगल्यांची कडी-कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी शनिवारी रात्री घरातील कपाटात उचकापाचक करुन रोख रक्कम, सोन्याचे दागिने, लॅपटॉप असा लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. चोरट्यांनी जे बंगले फोडले तेथे नेमके रात्रीच्या वेळी कोणीही घरात नव्हते. हे काम पाळत ठेवून झाले की काय, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

दरम्यान, चोरी झाल्याची माहिती मिळताच लोणी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण चोरी झालेल्या बंगल्यांची पाहणी केली. नगर येथून श्वानपथक फिंगर प्रिंट पथक बोलावण्यात आले होते. यामध्ये संतोष वाघमोडे, राजेंद्र विखे, संकेत कुकडे, जयसिंगराव तांबे, नितीन दळे यांचे घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन हे बंगले फोडण्यात आले असल्याचे पुढे आले. पुढील तपास लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, उपनिरीक्षक योगेश शिंदे, सहा. उपनिरीक्षक फटांगरे, पोलीस नाईक शिंदे, पोलीस नाईक सय्यद, शिपाई नरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

Visits: 94 Today: 1 Total: 1105056

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *