पुणे पोलिसांकडून विद्युत रोहित्र चोरणारी टोळी जेरबंद! संगमनेर तालुक्यातील चौघांचा समावेश; अवघ्या सहा महिन्यांतच पन्नास चोर्‍या..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) लक्ष्य करुन ती लांबविणारी मोठी टोळी जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. पुणे जिल्ह्यातील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दित अक्षरशः धुमाकूळ घालणार्‍या या टोळीने अवघ्या सहा महिन्यांतच 48 चोर्‍या केल्याचे तपासातून उघड झाले असून पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल विकत घेणार्‍या अहमदनगरमधील व्यापार्‍यालाही गजाआड केले आहे. पकडण्यात आलेल्या नऊजणांकडून एक चारचाकी व सहा दुचाकी वाहनांसह 500 किलो वजनाची तांब्याची तार असा एकूण 14 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे पकडलेल्या चोरट्यांमध्ये चौघे संगमनेर तालुक्यातील रहिवाशी असून त्यातील एकजण शहरातील घोडेकरमळ्यात वास्तव्यास आहे.


याबाबत पुणे ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्याकाही महिन्यांत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दितून रोहित्र चोरी जाण्याच्या घटना वारंवार समोर येत होत्या. चोरट्यांकडून चक्क रोहित्रच गायब केले जाऊ लागल्याने शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान होण्यासह ग्रामीणभागातील चोरीच्या घटनांचा आलेखही उंचावला होता. त्याची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह शिरुर विभागातील पोलिसांची बैठक घेत ‘रोहित्र’ चोरीच्या घटनांचा आढावा घेतला व गुन्ह्याच्या वेळा आणि प्रत्येक गुन्ह्यातील एकसारखी हातोटी या अनुषंगाने तपासाच्या सूचना देत गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना पोलीस पथके स्थापण्याचे आदेश दिले.


त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तीन स्वतंत्र तपास पथके स्थापन करुन जिल्ह्यातील रोहित्र चोरीच्या घटनांचे संकलन केले. त्यातून एकट्या शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दितच 19 ठिकाणचे रोहित्र चोरीला गेल्याची माहिती समोर आल्यानंतर गुन्हेशाखेने तपासाचे केंद्र शिरुर निवडले व स्थानिक पोलिसांच्या मदतीने चोरी झालेल्या रोहित्राच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यांवरील सीसीटीव्ही फूटेज, अनोळखी व्यक्ति आणि वाहनांचा वावर अशा बारीकसारीक गोष्टींची माहिती मिळवण्यास सुरुवात केली. या दरम्यान गुन्ह्यातील काही आरोपी पोलिसांच्या अभिलेखावरील (रेकॉर्ड) असल्याचे समोर आल्यानंतर गुन्हे शाखेने खबर्‍यांचे जाळे निर्माण करुन अशा संशयितांच्या हालचालींवर लक्ष केंद्रीत केल्यानंतर पोलिसांना दिशादर्शक माहिती मिळाली.


मिळालेल्या माहितीनुसार विद्युत रोहित्र चोरी करणारी टोळी जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे परिसरात ‘रेकी’ करीत असल्याचे समोर आले. त्यानंतर मात्र पोलिसांच्या हालचाली वाढल्या आणि गुन्हे शाखेसह या प्रकरणाच्या तपासात दिवसरात्र एक करणार्‍या पोलिसांची विविध पथके तळेगाव ढमढेरेच्या संशयीत ठिकाणी जमा झाली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा माग काढीत सुनियोजित सापळा रचला आणि काही वेळातच चोरट्यांच्या रुपातील सावज अलगदपणे त्यात अडकले. या कारवाईत एका चारचाकी पिकअप वाहनासह आठजण पोलिसांच्या हाती लागले.


या कारवाईत हाती लागलेल्या चोरट्यांमध्ये मोटार सायकल चोरीच्या 11 गुन्ह्यांमध्ये ‘वॉटेंड’ असलेल्या विशाल खंडू पवार (वय 25, धंदा जेसीबी चालक, रा.तांबेवाडी, ता.पारनेर) या सराईत गुन्हेगारासह संगमनेर तालुक्यातील प्रदीप राजेंद्र शिंदे (वय 26, धंदा चालक, रा.साकूर), आदेश सयाजी भुजबळ (वय 19, धंदा शेती, रा.हळदेवस्ती, साकूर), हर्षल राजेंद्र शिंदे (वय 24, धंदा शेती, रा.गाडेकरमळा, साकूर), शहरातील घोडेकर मळा परिसरात राहणारा ओंकार अजित घोडेकर (वय 19, धंदा चालक) यांच्यासह श्रीकांत शिवाजी शिंदे (वय 22, धंदा मासे विक्री, रा.दहीवडी, ता.शिरुर), करण नाना माळी (वय 19, रा.दहीवडी, ता.शिरुर), सोनु विकास धुळे (वय 19, रा.आंबळे, ता.शिरुर) अशा आठजणांसह नागापूरचा भंगार विक्रेता दीपक पांडूरंग सांगळे (वय 27) अशा एकूण नऊजणांना अटक करण्यात आली आहे.


त्यासर्वांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे रोहित्र चोरीच्या घटनांबाबत चौकशी सुरु केली असता पोलिसही चक्रावले. 18 ते 27 वयोगटातील या चोरट्यांनी जानेवारी ते जून या अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीत महिन्याला सरासरी आठ याप्रमाणे 48 गुन्ह्यांची कबुली दिली. त्यातील सर्वाधीक 19 गुन्हे शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दित, 11 गुन्हे यवत पोलीस ठाणे, 10 गुन्हे शिक्रापूर पोलीस ठाणे, पाच गुन्हे रांजणगाव पोलीस ठाणे व खेड, दौंड आणि जेजूरी पोलीस ठाण्याच्या हद्दित प्रत्येकी एक गुन्हा केल्याचे समोर आले. चोरलेल्या रोहित्रातील तांब्याची तार, पट्ट्या व अन्य मुद्देमाल अहमदनगरच्या नागापूर परिसरातील दीपक पांडूरंग सांगळे (वय 24) याला विकल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथेही छापा घातला व त्याच्याकडून 500 किलो वजनाची तांब्याची तार जप्त करुन त्यालाही अटक करण्यात आली.


सध्या या सर्वांना शिरुर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांना अन्य पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात वर्ग केले जाणार आहे. या धडाकेबाज कारवाईत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, रमेश चोपडे, उपअधीक्षक प्रशांत ढोले, स्वप्निल जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर, ज्योतीराम गुंजवटे, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक राहुल गावडे, योगेश लंगुटे, उपनिरीक्षक अभिजीत सावंत, एकनाथ पाटील, अंमलदार तुषार पंधारे, दीपक साबळे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, अतुल डेरे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, संजू जाधव,


योगेश नागरगोजे, स्वप्निल अहिवळे, विजय कांचन, संदीप वारे, अमोल शेडगे, धिरज जाधव, सागर धुमाळ, अक्षय नवले, नीलेश सुपेकर, अक्षय सुपे, हनुमंत पासलकर, दत्ता तांबे, रामदास बाबर, राहुल पवार, विनोद पवार, समाधान नाईकनवरे, तुषार भोईटे, मंगेश भगत, महिला पोलीस नाईक सुजाता कदम, शिरुर पोलीस ठाण्याचे नितीन सुद्रीक, परशुराम सांगळे, नाथा जगताप, रघुनाथ हळनोर, नीतेश थोरात, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे किशोर तेलंग, प्रशांत गायकवाड व प्रतिक जगताप यांचा सहभाग होता. सध्या हे सर्व आरोपी शिरुर पोलिसांच्या कोठडीत आहेत.


पोलीस निरीक्षक शिळीमकरांची कामगिरी..
पूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये कर्तव्य बजावणार्‍या व सध्या पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख असलेल्या पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत रोहित्र चोरणार्‍या टोळीचा पर्दाफार्श करण्यात आला. या टोळीने पुणे जिल्ह्यातील शिरुर, शिक्रापूर, यवत, रांजणगाव, दौंड, खेड आणि जेजूरी या सात पोलीस ठाण्यांच्या हद्दित अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चोरट्यांकडील प्राथमिक चौकशीत त्यांनी अवध्या सहा महिन्यांतच 48 गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्यांच्या कोठडीतून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. स्थानिक गुन्हे शाखेने बजावलेल्या या धडाकेबाज कारवाईमूळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Visits: 53 Today: 1 Total: 113630

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *